दुखापत आणि कळवळा

    01-Apr-2024   
Total Views |
West Bengal CM Mamata Banerjee


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच बर्‍या झाल्या. त्यानंतर त्यांनी आराम करणे गरजेचे असतानाही, लागलीच लोकसभा निवडणुकीचा प्रचारदेखील सुरू केला. विशेष म्हणजे, दुर्दैवाने कोणतीही निवडणूक आली की, ममतांना दुखापत होते. २०२१ साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही ममतांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांनी चक्क व्हिलचेअरवरून प्रचार केला होता. त्यावेळी दीदींनी ‘खेला होबे’ची घोषणा दिली होती. त्यानंतर मात्र तृणमूलच्या नेत्यांना आणि पक्षालाही चांगलीच उतरती कळा लागली. तृणमूल सरकारमधील मंत्र्यांनाही भ्रष्टाचारामुळे तुरुंगाची हवा खावी लागली. दरम्यान, नुकत्याच कृष्णनगरमधील सभेमध्ये ममतांनी बंगालमध्ये डाव्या पक्षांना आणि काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला मतदान करण्यासारखे आहे असे सांगितले. त्याचबरोबर सीपीएम आणि काँग्रेस यांची युती ही युती नसून, केवळ गोंधळ असल्याचेही दीदी म्हणाल्या. त्याचबरोबरीने ममतांना केजरीवालांचा कळवळा नाही आला तर नवलच! केजरीवालांना अटक केली; परंतु त्यांना काम करण्यापासून कोणीही रोखू शकले नाही. सध्या ते तुरुंगातून काम करताहेत, अशी कौतुकाची मुक्ताफळे ममतांनी उधळली. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. सुरुवातीला ममतांनी काँग्रेससहित ’इंडी’ आघाडीला झुलवत ठेवले. एवढेच नव्हे, तर ‘इंडी’ आघाडीच्या सुरुवातीच्या काही बैठकांना खुद्द ममतांनी हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी सपचे अखिलेश यादव आणि इकडे उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा सुरू केली होती. राहुल गांधी यांच्या ’भारत जोडो न्याय यात्रे’पासूनही ममता चार हात लांबच राहिल्या. ममता सरकारमधील अनेक मंत्र्यांची आणि आमदारांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांची बाजू घेणार्‍या ममतांनी केजरीवालांची बाजू घेणे, मुळात हास्यास्पद आहे. संदेशखाली प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. पण, ममतांना त्याचे कुठलेही सोयरेसुतक नव्हते. उलट, संदेशखालीतील पीडित महिलांची भेट घ्यायला जाणार्‍यांनाही ममतांच्या पोलिसांनी अडवले. भाजपने एका संदेशखाली पीडित महिलेलाच लोकसभेचे तिकीट दिलेले आहे, त्यामुळेच चवताळलेल्या ममतांनी आता थेट मतदान कुणाला करावं, याचेच धडे लोकांना द्यायला सुरुवात केली आहे.

आघाडी आणि शिव्या
 
लोकसभेची निवडणूक आली की, दोन गोष्टी हमखास होतात म्हणजे होतातच. त्याची प्रचिती मागील लोकसभा निवडणुकीदरम्यानही आली होती. पहिली गोष्ट म्हणजे, लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, याची धास्ती वाटल्यामुळे, विरोधी पक्ष आघाडी करतात. भाजपला नव्हे तर मोदींना हरविण्यासाठी, सगळे एकत्र येतात खरे. मात्र, त्यातील अनेक सहकारी नंतर त्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे सुरुवातीला कितीही शक्तिप्रदर्शन केले, तरी त्यातील फोलपणा अवघ्या काही महिन्यांतच समोर येतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येते, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होणारी टीका अधिक तीव्र आणि खालच्या पातळीवर घसरत जाते. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून नरेंद्र मोदींना फक्त अपशब्द नव्हे, तर अगदी शिव्यांची लाखोलीदेखील वाहिली जाते. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी संयमाने आपल्या कामातून आणि प्रचंड विजयातून उत्तर देतात. मागे द्रमुकच्या नेत्याने पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरत, शिवीसुद्धा दिली होती. आता तृणमूल काँग्रेसचे नेते पिजूष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जातीयवादी टिप्पणी केली. सर्वधर्मसमभाव आणि माँ, माटी आणि मानुष यांचा नारा देणार्‍या ममतांनी मात्र यावर सोयीस्करपणे मौन बाळगले आहे. पांडा यांनी पंतप्रधान मोदी तेली असून, अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कशी करू शकता, असा सवाल केला. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चहा विकण्यावर आणि त्यांच्या पदवीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ममतांची एकूण भाषा आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारामुळे पांडांसारख्या नेत्यांकडून काहीतरी चांगलं काम नाही; परंतु कमीत कमी चांगलं बोलण्याची तरी अपेक्षा कशी करता येईल म्हणा. पंतप्रधान मोदी गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकत होते आणि हे चहाचे दुकान आजही सुरक्षित आहे, हे पांडा यांना ठाऊक नसेल. नुकतीच तामिळनाडू सरकारमधील मंत्री टीएम अनबरसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन तुकड्यांमध्ये फाडण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिव्यांची लाखोली मोदींसाठी नवीन नाही. मात्र, जेव्हा ’अबकी बार चारसौ पार’ प्रत्यक्षात खरे ठरेल, तेव्हा या वाचाळवीरांना तोच धक्का पुरेसा ठरेल.
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.