निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेले, सबइन्सपेक्टर गायतोंडे अर्थात अभिनेते कमलेश सावंत. अगदी खरेखुरे पोलीस वाटावे, अशी सावंत यांची शरीरयष्टी आणि एकूणच देहबोली. तेव्हा, कमलेश सावंत यांचा खाकी वर्दीतला प्रवास, ‘दृश्यम’ चित्रपटादरम्यानचा अनुभव याविषयी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
निशिकांत कामत यांच्यामुळेच ‘दृश्यम’ घडला...
२०१५ साली ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला. अजय देवगण, तब्बू यांच्यासोबत अभिनेते कमलेश सावंत मोठ्या पडद्यावर एका दमदार भूमिका दिसले. पण, नेमकी भूमिका पदरी कशी पडली, याबद्दल सांगताना कमलेश सावंत म्हणाले की, “निशिकांत कामत यांच्या सोबत काम करण्याची संधी मला १९९८ पासून मिळाली होती. त्यामुळे एक नट म्हणून मी काय करू शकतो आणि काय नाही, याची जाणीव निशिकांत कामत यांना होती आणि मुळात त्यांचा अट्टहास होता की, ते दिग्दर्शित करत असलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात मी सबइन्सपेक्टर कमलाकर गायतोंडे ही भूमिका साकारावी. पण, माझी ’स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘लक्ष्य’ ही पोलिसांचीच एक मालिका सुरू असल्यामुळे, मला तो चित्रपट करण्यात अडचण येत होती. पण, कालांतराने अडचणी दूर झाल्या आणि मी ऑडिशन देऊन आल्यानंतर, १०-१२ दिवसांत मला एक फोन आला आणि मला सांगितलं की, गायतोंडे तुम्ही करत आहात आणि अशाप्रकारे निशिकांत कामत यांचा माझ्या कामावरील विश्वास यशस्वी ठरला आणि मला ’दृश्यम’ चित्रपटाचा भाग होता आलं,“ असा किस्सा सांगत, कमलेश यांनी त्यांच्या वाट्याला ‘दृश्यम’ चित्रपट आणि गायतोंडे भूमिका कशी आली, त्याबद्दल सांगितले.
आम्ही लालबाग-काळाचौकीची माणसं, आम्हाला मागणं जमत नाही!
आजवर कित्येक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये पोलिसांची भूमिका करणार्या, कमलेश सावंत यांनी पहिल्यांदा साकारलेली पोलिसाची भूमिका ही केवळ दोन संवादांपुरती मर्यादित होती. याबद्दल आठवण सांगताना कमलेश म्हणाले की, ”अभिनेता सुशांत शेलार आणि इतर आमच्या सहकारी कलाकार मित्रांचा एक ग्रुप होता. त्याअंतर्गत आम्ही कामं करायचो. त्यावेळी मुकुल अभ्यंकर हे जर्मनीवरून शिकून आलेले, एक लेखक होते. त्यांच्या ’गुब्बारे’ या एका मालिकेसाठी त्यात एका पोलिसाची भूमिका करायची होती. मला सुशांतने फोन करून सांगितलं की, “एक काम आहे. दोन संवाद आहेत ये.” मी गेलो आणि माझं काम करून आलो. त्यानंतर सुशांतने मला यावेळी लहान भूमिका केली, पुढच्या वेळी मोठी भूमिका द्या, असं मुकूल यांना बोलून ये, असं सांगितलं. मी त्यावर त्याला म्हणालो की, ”हे मला जमणार नाही. आपण लालबाग- काळाचौकीची माणसं आहोत, समाधानी आहोत, असं मागणं मला जमणार नाही.“ कमलेश सावंत यांच्या या वाक्यावरून आपल्या संस्कृतीशी, मातीशी त्यांचे किती घट्ट नाते आहे, हेदेखील सिद्ध होते.
वक्तशीरपणा आणि अमिताभ बच्चन
“ ‘खाकी’, ‘दिवार’ आणि ‘फॅमिली’ असे लागोपाठ तीन हिंदी चित्रपट मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले. त्यापूर्वी मी मराठी चित्रपटात काम केलं नव्हतं. अमिताभ बच्चन म्हणजे व्यासपीठ आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे वेळेची किंमत. ‘खाकी’च्या सेटवर ते ७ वाजेच्या कॉल टाईमला बरोबर ७ वाजता वेशभूषेसह तयार असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून शिस्तबद्धपणा, कामाप्रति आपुलकी आणि निष्ठा या बाबी नक्कीच शिकलो,” असे म्हणत त्यांनी अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले.
अभिनयाचे व्यासपीठ
‘खाकी’ चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा सांगताना कमलेश म्हणाले की, “ ‘खाकी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, चाहते बच्चन साहेबांच्या सह्या घेण्यासाठी सेटवर आले होते. एकामागोमाग एक सर सह्या करत होते. अचानक त्यांच्यासमोर कुणीतरी १०० रुपयांची नोट पुढे केली. नोट पाहून ते आपल्या व्हॅनिटीमध्ये निघून गेले. अमिताभ बच्चन यांची ती कृती पाहून, अक्षय कुमार यांना उत्सुकता लागली की, त्यांनी असं का केलं. अक्षय यांनी जाऊन बच्चन सरांना विचारलं; त्यावर ते म्हणाले की, ”कसं आहे ना अक्षय, भारतीय नोटांवर फक्त देशाच्या गर्व्हर्नरची सही असते.“ त्यांचे हे बोल ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो. त्यामुळेच कोणत्याही भाषेत काम करणारा कलाकार असो, त्यांच्यासाठी अमिताभ बच्चन म्हणजे आदर्श आणि अभिनयाचे व्यासपीठ आहे,“ असेही कमलेश म्हणाले.
पोलिसांचं जीवन सोप्पं नाही!
“मुंबईतील काळाचौकी-लालबाग परिसरात बालपण गेल्यामुळे, लहानपणापासूनच समोर पोलीस चौकी असल्यामुळे, त्याच वातावरणात मोठा झालो. तेव्हापासूनच पोलिसांचं जीवन काही सोप्पं नाही, हे दिसत होतं. आज आपण म्हणतो की, पोलिसांची शरीरयष्ठी सुदृढ नाही आहे. पण, २४ किंवा ४८ तास सलग ड्यूटी केल्यानंतर, त्यांचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष कसे लागणार आहे? बर्याचदा पोलिसांना अशा ठिकाणांवर नाकाबंदीसाठी जावं लागतं, जिथे त्यांच्या अन्नाची देखील गैरसोय असते,” असे म्हणत कमलेश यांनी पोलिसांप्रतीच्या भावना व्यक्त केल्या.
समोर येईल, ते काम प्रामाणिकपणे करा
कमलेश सावंत अभिनय क्षेत्रातील कलाकारांना सल्ला देताना सांगतात की, “माझ्या गुरुंनी मला एक शिकवण दिली होती की, तुम्ही ज्या मनोरंजन क्षेत्रात आहात, तिथे काम करताना अभिमान बाळगू नका. आपली रंगदेवताच एका पायावर उभी आहे. याचा अर्थच हा होतो की, या मनोरंजनसृष्टीत आज काम आहे, तर उद्या नसेल. त्यामुळे गर्वाने मान उंच न करता, समोर येईल, ते काम प्रामाणिकपणे करावे.”