मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीकडून रोहित पवारांचा कन्नड येथील साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने हा कारखाना खरेदी करण्यात आला असून यावर आता ईडीने मोठी कारवाई केली आहे.
औरंगाबादमधील कन्नड येथील हा कारखाना एकून ५० कोटी २० लाखांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये १६१ एकर जमिनीचा समावेश आहे. याआधी दि. ५ जानेवारी २०२४ रोजी बारामती अॅग्रो कंपनीवर गैरव्यवहारा प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने कारवाई केली होती. तसेच बारामती अॅग्रो गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना गेल्यावर्षी ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर आता कन्नड येथील कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.
बारामती अॅग्रो लिमिटेड उत्पादने विशेषत: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. बारामती अॅग्रो कंपनी प्राणी आणि पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग, साखर आणि इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्पादने या क्षेत्रात काम करते.