दि.५ जानेवारी २०२४ रोजी रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने कारवाई केली. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं नंतर सांगण्यात आलं. पण आता दि. ८ मार्च रोजी संध्याकाळी बारामती अॅग्रोने लिलाव प्रक्रियेत खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावरही ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे या कारखान्याचं आणि रोहित पवाराचं कनेकश्न काय आहे? कन्नड साखर कारखाना जप्त करताना ईडीने कोणते दावे केले आहेत. रोहित पवारांना या कारखान्याच्या जप्तीनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे.गेल्या काही वर्षांपासून बारामती एग्रो, शिखर बँक घोटाळा, कन्नड सहकारी साखर कारखाना हे शब्द तुमच्या वारंवार कानावर येत असतील. दरम्यान या नावात तुम्ही रोहित पवारांचं नाव ही ऐकलं असेलचं. त्यात आता ईडीने बारामती एग्रोच्या ताब्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला. त्यामुळे हा वाद नेमका आहे तरी काय ? त्यांचे एकमेकांशी संबंध तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुळात मागच्या काही दिवसांपुर्वी कन्नड साखर कारखाना अवसायनात निघाला होता. त्यामुळे शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या ५० कोटी रुपयांनी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती एग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक ५ कोटी रुपये जमा केले ते, बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे. त्यामुळेच ईडीकडून १६१ एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आरोपी करण्यात आल्याचं काही माध्यमसमुहांनी सांगितले आहे.
दरम्यान रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड साखर कारखाना जप्त करण्यात आला. मुळात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली. तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचादेखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ईडीने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केलीयं.मुळात याप्रकरणी २ जुलै २०२१ रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवारांच्या कन्नड साखर कारखाना खरेदीची चौकशी करा, अशी मागणी केली होती. त्यावेळीच राज्य सरकारी बॅकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करून गडबड करून ५० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतल्याचे आरोप सोमय्यांनी केले होते. कारण यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेचा मोठा तोटा झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान त्यावेळी वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील म्हणाल्या होत्या की, देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक होता. म्हणून त्यांनी आमचा कारखाना विकला, असा टोला ही रोहित पवारांना आणि शरद पवारांना शालिनीताईंनी लगावला होता. कारण त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर्स या कारख्यान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर ईडीने जप्ती आणल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली गेली होती.दरम्यान कन्नड साखर कारख्यान्याप्रकरणी रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान आता याप्रकरणी ईडीने दावा केला आहे की, शिखर बँक घोटाळा झाल्याचा आरोप पूर्वीपासून करण्यात येत आहे. याप्रकरणात ईडीने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी एका कंपनीला बारामती एग्रोने कॅश क्रेडिट खात्यातून ५ कोटी रुपये दिले आणि बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. पण बोली लावण्यात आलेली रक्कम ही बारामती एग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने दिल्याचा ईडीने म्हटले आहे. पण कर्ज रुपी रक्कम बारामती एग्रोने दुसऱ्या कारणासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिखर बँकेच्या कथित २५,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पण चर्चा यानिमित्ताने होत आहे. कारण कन्नड सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. २०१२ मध्ये कारखान्याने बँकेकडून ५० कोटींचे कर्ज घेतल्याचा दावा ही ईडीने केला आहे.