अभिनेत्री श्रेया बुगडे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या मालिकेत मराठीसह हिंदी अभिनेत्रींची उत्तम मिमिक्री करते. त्यापैकी सई ताम्हणकरची मिमिक्री करताचा अनुभव तिने सांगितला.
मुंबई : चला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेल्या श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच बऱ्याच हिंदी, मराठी अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. कंगना राणावत, रवी टंडन, शुभांगी गोखले, उषा कुलकर्णी आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चौघींची मिमिक्री तर मन जिंकून जाते. परंतु, ज्यावेळी मिमिक्री करण्यास सुरुवात केली तेव्हा सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही सई वाटायचीच नाही, असे श्रेया महाएमटीबीशी बोलताना म्हणाली. नेमकी ती असं का म्हणाली जाणून घेऊयात...
अभिनयाची आवड कशी निर्माण झाली आणि निरीक्षणाचा कसा फायदा झाला याबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, “लहानपणापासून मला निरीक्षण करण्याची खुमखुमी होती. मिठीबाई कॉलेजमध्ये शिकायला असल्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करताना कोणतंही सामान विकायला येणाऱ्या लोकांकडे, स्त्रीयांकडे मी टक लावून पाहायचे. ते कसे बोलतात, त्यांची कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची पद्धत कशी आहे, कोणता शब्द कसा उच्चारतात, शारिरिक हावभाव कसे असतात. तर या सगळ्यांचे निरीक्षण मला आज ‘चला हवा येऊ द्या’ असेल किंवा कोणत्या कार्यक्रमात मिमिक्री करताना असेल उपयोगी पडतात. पण सुरुवातीला ज्यावेळी सई ताम्हणकर किंवा शुभांगी गोखले यांची मिमिक्री करत होते त्यावेली सई ही सई वाटत नव्हती. पण सातत्याने ज्यावेळी मी अभिनयाचा रियाज केला, निरीक्षण केलं त्यानंतर ज्या अभिनेत्रीची मिमिक्री मी करते ती तंतोतंत वाटायला लागली”.
श्रेया बुगडे हिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमामुळे श्रेया महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. मात्र, श्रेयाने अभिनयाची सुरुवात बालनाट्यांपासूनच केली होती. मुळची पुण्याची असणाऱ्या श्रेया शालेय जीवनातच आपली अभिनयातील रुची ओळखून त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती. २०१२मध्ये श्रेयाने ‘तू तिथे मी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'फू बाई फू' या कार्यक्रमातून श्रेयाला विनोदी अभिनेत्री असा टॅग लागला. आणि आज महिला विनोदी कलाकारांमध्ये तिचे नाव अग्रेसर आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.