ठाणे येथील नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उदघाटन
07-Mar-2024
Total Views | 33
ठाणे : रोजगार हा तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा विषय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बुधवारी ठाणे येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तसेच आज जवळपास ३० हजारापेक्षा जास्त तरुण याठिकाणी येऊन गेले आहेत आणि ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यामधून निवड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
ठाण्यातील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट येथे विभागस्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा जनसामान्यात वावरणारा आणि त्यांच्या व्यथा जाणणारा आणि त्यांच्या भल्यासाठी अविरत काम करणारा नेता लाभला, हे आपले भाग्य आहे. राज्यातील युवक युवतींना रोजगार मिळावा या भावनेने त्यांनी अतिशय समर्पितरित्या काम केले आहे. त्यामुळे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जोपर्यंत या मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या शेवटच्या उमेदवाराला रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करू आणि या उपक्रमाला यशस्वी करू," असे ते म्हणाले.
दोन दिवसीय या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी ३० हजारपेक्षा जास्त तरुणांनी आपला सहभाग नोंदवला असून ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यातून निवड झाली. तसेच त्यांना नेमणुकीचे प्रमाणपत्रही मिळाले. १५०० पेक्षा जास्त कंपनी आणि उद्योजकांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला आहे.