लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडाला असून, प्रचाराचा नारळही फुटला आहे. भाजपने एकीकडे १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून रणनीतीक आघाडी घेतलेली दिसते, तर दुसरीकडे ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप रखडलेलेच. आता निवडणूक म्हटल्यावर, राजकीय वार-प्रतिवार हे ओघाने आलेच. पण, हल्लीच्या राजकीय भाषणबाजीत विचारधारा, विकासकामांपेक्षा वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि हेवेदाव्यांवरच नेतेमंडळी घसरताना दिसतात. त्यातच काँग्रेस असेल किंवा पराभूत मानसिकतेने लढणार्या विरोधकांचा मोदींविषयी बोलताना संयम अन् तोल सुटतो. जे बोलू नये, तेच ते बोलून मोकळे होतात. परिणामी, भाजपकडून विरोधकांच्या मोदींवरील वैयक्तिक टीकेचे पुरेपूर भांडवल करून, उलट प्रतिप्रचार केला जातो. यंदाही तसेच आणि निवडणुकीच्या रणधुमाळीच्या अगदी प्रारंभीच्या टप्प्यातच घडल्याने, त्याची मोठी किंमत विरोधकांना चुकवावी लागेल, हे निश्चित.“मोदी घराणेशाहीच्या राजकारणावर बोलतात; पण घराणेशाहीचे राजकारण म्हणजे काय, हे मोदींना कसे माहिती असेल? जास्त मुले झालेले कुटुंब हे चेष्टेचा विषय ठरते. पण, मोदींना तर मुलेही नाहीत.” इति लालूप्रसाद यादव. लालूंच्या याच अभद्र टीकेनंतर भाजपने अख्खा देशच मोदींचे कुटुंब असल्याचा संदेश देत, ‘मोदी का परिवार’ ही मोहीम ऑनलाईन माध्यमांत अगदी पद्धतशीरपणे राबविली. फेसबुकपासून ते ट्विटरपर्यंत मोदी समर्थकांनी आम्हीच मोदीजींचा परिवार असल्याच्या पोस्ट्स, फोटो शेअर केले. त्यामुळे बडबोल्या लालूंची ही टिप्पणी ‘बूमरँग’ झाली आणि विरोधकांचेच हसे झाले. आधीच विरोधक कमकुवत आणि त्यात त्यांचा हा वाचाळपणा. म्हणजे बघा, २०१४ मध्ये मोदींना ‘चायवाला’ म्हणून काँग्रेसने हिणवले. त्यानंतर मोदी आणि भाजपने ‘चाय पे चर्चा’ मोहीम राबविली. एवढेच नाही, तर भाजपमध्ये एक साधा चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो, असे सांगत काँग्रेसवर पलटवार केला. पुढे २०१९ मध्ये ‘चौकीदार चोर हैं’ म्हणून राहुल गांधींनी ‘राफेल’मधील भ्रष्टाचाराच्या फुसक्या मुद्द्याला हवा दिली. त्यावरही ‘में भी चौकीदार हूँ’ अशी घोषणा देत, भाजपने प्रचारात प्राण फुंकले. यंदा काँग्रेसपूर्वीच लालू भाजपच्या हाती आयते कोलित देऊन मोकळे झाले. पण, आता प्रतीक्षा काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मोदीविरोधी अशाच मूर्खपणाच्या वक्तव्यांची!
आपल्या यापूर्वीच्या कित्येक भाषणांमध्ये आणि परवादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला. ‘त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आणि माझ्यासाठी राष्ट्र प्रथम’ हे मोदींनी पुनश्च स्पष्ट केले. एवढेच नाही, तर संसदेच्या अखेरच्या सत्रातही मोदींनी घराणेशाहीवर आसूड ओढला होता. पण, जेव्हा-जेव्हा विषय घराणेशाहीचा येतो, तेव्हा-तेव्हा विरोधकांकडून भाजपमध्येही घराणेशाही असल्याचा सर्रास अपप्रचार होताना दिसतो. हे करताना मग केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांसारख्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला जातो. म्हणजे, भाजपच्या कित्येक नेत्यांची मुलंही सक्रिय राजकारणात आहेत, त्याचे दाखले दिले जातात. नुकतेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराजला दिल्लीमधून भाजपतर्फे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर एकीकडे भाजप घराणेशाहीला कडाडून विरोध करते आणि दुसरीकडे भाजपचे नेतेमंडळी त्यांच्याच परिजनांचा राजकीय उद्धार करतात, असे टीकेचे सूर विरोधकांनी आळवले. पण, विरोधकांना वाटते तितकी जनता या अपप्रचाराला भुलणारी नाही. राजकारणातील घराणेशाही म्हणजे एकाच कुटुंबाचे एखाद्या पक्षावर असलेले एकहाती वर्चस्व. काँग्रेसचे गांधी, सपचे-राजदचे यादव, दक्षिणेतील स्टॅलिन, महाराष्ट्रातील ठाकरे, तृणमूलचे बॅनर्जी, अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स वगैरे. आता या पक्षांमधील घराणेशाही आणि भाजपमधील कथित घराणेशाही यामध्ये जमीन-आस्मानचे अंतर. कारण, भाजप कुठल्याही कुटुंबाच्या दावणीला कधीही बांधला गेला नाही. भाजप नेत्यांची मुलं राजकारणात जरूर उतरली; पण म्हणून पक्षाचे नियंत्रण, निर्णय प्रक्रिया यांमध्ये त्यांना विशेष प्राधान्य किंवा सर्वाधिकार मिळाले नाही. मग ठाकरे-यादवांच्या पुढच्या पिढींनी राजकारणात येणे चुकीचे का? तर तसे अजिबात नाही. भाजप नेत्यांच्या मुलांप्रमाणे ठाकरे-यादवांच्या पुढच्या पिढ्यांनीही राजकारणात जरूर यावे. पण, दुर्दैवाने ही मंडळी सामान्य कार्यकर्ते किंवा नेते न राहता, पक्षाचे पुढचे वारसदार म्हणूनच थेट पक्षात दाखल होऊन, त्यांची पक्षाध्यक्षपदाकडे वाटचाल सुरू होते. ‘एक पक्ष, एक परिवारा’ची ही घराणेशाही. तेव्हा ‘घराण्यातील राजकीय परंपरा’ आणि ‘घराणेशाहीची परंपरा’ यातील हा फरक समजण्याइतकी जनता नक्कीच सूज्ञ आहे.