कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या; अहमदाबाद-मडगाव वसई रोड मार्गे धावणार
06-Mar-2024
Total Views | 50
मुंबई : कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा २३ मार्चपासून शिमग्याला सुरुवात होत आहे. ज्या चाकरमान्याना रेल्वेची तिकिटे मिळाली नाहीत, त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरून वसई रोड येथून जाणाऱ्या या विशेष सेवेमुळे काही प्रमाणात का होईना पण गर्दी नियंत्रणात येईल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांची गर्दी पाहता अजून सेवा वाढवण्यात येऊ शकते, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
सदर गाड्यांचे आरक्षण शुक्रवार, दि. ८ मार्च पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वेबसाइटवर सुरू होईल. थांबण्याच्या वेळा आणि रचना यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाड्यांचा तपशील :
- गाडी क्र. ०९४१२/०९४११ अहमदाबाद-मडगाव विशेष सेवा (मार्गे-वसई रोड) [४ फेऱ्या]
गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद – मडगाव विशेष अहमदाबाद येथून दि. १९ आणि २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच गाडी क्र. ०९४११ मडगाव-अहमदाबाद विशेष मडगावहून दि. २० आणि २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता अहमदाबादला पोहोचेल.