मुंबई: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर निसर्गसौंदर्यतेने नटलेले गणपतीपुळे हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. कोकणातील जुनी मंदिरे आणि विशाल समुद्रकिनारे पाहण्यसाठी पर्यटक हमखास गणपतीपुळेला पहिली पसंती देत आहे. गणपतीपुळेला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाल्याने पर्यटकांचा ओघ अजूनच वाढू लागला आहे. कोकणातील मंदिर स्थापत्य शैलीचे दर्शन घडवणाऱ्या गणपतीपुळेला आता वाढत्या पर्यटनामुळे नवी ओळख मिळाल्याची माहिती गणपतीपुळे येथील ‘वेस्ट बे रिसॉर्ट एन्ड स्पा’ रिसॉर्टचे संचालक चैतन्य तेंडुलकर यांनी दिली आहे.
राज्यभरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने नुकताच पर्यटनवृद्धीसाठी महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्याला लाभलेला कोकण किनारा हे पर्यटनाचे नंदनवन समजले जाते. कोकणातील गणपतीपुळे हे गेल्या काही वर्षात प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गणपतीपुळेत सांस्कृतिक समृद्धताही लाभली आहे. गणपतीपुळेचा पर्यटन व्यवसायात सर्वतोपरी विकास व्हावा, गणपतीपुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्व सुख सोयींनी समृद्ध असावे, याचा ध्यास चैतन्य तेंडुलकर यांनी घेतला आहे. गणपतीपुळे येथे पर्यटनाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तेंडुलकर हिरीरीने प्रयत्न करत आहेत.
पूर्वी गणपतीपुळे येथे पर्यटकांना राहण्यासाठी निवासाच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. परिणामी, पर्यटकांचा ओघ कमी दिसून यायचा. त्याचा थेट परिणाम स्थानिक रोजंदारीवर झाला. कालांतराने गणपतीपुळेच्या विशाल निसर्ग सौंदर्यतेत भर घालण्यासाठी चैतन्य तेंडुलकर यांच्या दूरदृष्टीतून ‘वेस्टबे रिसॉर्ट एन्ड स्पा’ची उभारणी करण्यात आली. नवनव्या सोयीसुविधा, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी साहसी खेळ थेट रिसॉर्टमध्येच उपलब्ध आहेत.
'वेस्टबे रिसॉर्ट एन्ड स्पा’ या रिसॉर्टची उभारणी राज्य सरकारच्या पर्यटन विकासाच्या संकल्पनेला साजेशी आहे. या रिसॉर्टला भेट देणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सोयी सुविधांसह ऐशोआरामाच्या आरामदायी सुविधाही पुरवल्या जातात. कोकण किनारपट्टीवरील सांस्कृतिक गतवैभव, स्थानिक आर्थिक सुबत्ता यांचा सुरेख मिलाप रिसॉर्ट रचनेत पाहायला मिळतो.
राज्यातले स्थानिक पर्यटन वृद्धिंगत व्हावे यासाठी ‘आई योजना’ राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पर्यटन कार्यक्रमात महिलांचा समावेश करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. महिलांचा पर्यटन व्यवसाय समावेश केल्यास संस्कृती आणि समृद्धीची पर्यटकांना सुयोग्य माहिती मिळेल , परिणामी व्यवसाय वाढीस मदत होईल अशीदेखील आई योजना मागील संकल्पना आहे. गणपतीपुळे येथील पर्यटन विकासाचा विचार करता चैतन्य तेंडुलकर यांनी नवनव्या संकल्पनांवर भर दिला आहे.
रस्त्याचे दुरुस्तीकरण आणि चौपदरी महामार्ग –
गणपतीपुळे येथे पर्यटन वृद्धीला खड्डे पडलेले रस्ते, निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम मोठा अडथळा ठरत आहे. गणपतीपुळेला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम, जुन्या रस्त्यांचे दुरुस्तीकरण केले जावे, ही प्रमुख मागणी चैतन्य तेंडुलकर यांनी केली आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर चौपाटी कुटी (बीच शॅक्स) उभारणे –
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक म्हणजे चौपाटी कुटी गणपतीपुळे येथे उभारल्यास किनारपट्टीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली सोय उपलब्ध होईल, असे तेंडुलकर सूचवतात. पर्यटकांना समुद्रकिनारी आरामदायी सुविधा उपलब्ध झाल्यास झाल्यास हळूहळू त्यांची संख्यादेखील वाढेल.
पर्यटनाशी संबंधित इतर कार्यक्रम –
गणपतीपुळे येथे मोठ्या आकाराचे मनोरंजन पार्क उभारल्यास येथील पर्यटन व्यवसायाचा कायापालट होईल. पर्यटकांचा ओघ वाढण्यासही मदत होईल.
रत्नागिरी विमानतळ येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवणे -
रस्त्यांच्या बांधकामात सुधारणा केल्यानंतर पर्यटकांसाठी हवाईमार्गही सुखकर असावा. पर्यटकांना गणपतीपुळे येथे पोहोचणे सोईस्कर ठरेल यासाठी रत्नागिरी विमानतळावर विमानांचे मोठ्या संख्येने ये-जा होणे गरजेचे आहे. केवळ देशभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय विमानांना रत्नागिरी विमानतळावर उतरण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.
जलवाहतुकीचा वेग वाढवावा –
गणपतीपुळे हे कोकण किनारपट्टीवरील पर्यटन केंद्र असल्याने जलवाहतुकीनेही येथे सहज पोहोचता येते. जलवाहतूक उपलब्ध झाल्यास पर्यटकांना गणपतीपुळेला पोहोचणे सोप्पे होईल. प्रसिद्ध जहाजांच्या माध्यमातून पर्यटकांना थेट गणपतीपुळेचे दर्शन घडवणे ही अभिनव संकल्पना असेल. पर्यटकांना नजीकच्या स्थळांना भेट देणेही शक्य होईल.
गणपतीपुळे हे सर्वतोपरी पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणुकीची आवश्यकता आहे. येथील स्थानिक उपक्रमांची, सांघिक कार्यक्रमांची सर्व स्तरावर जाहिरात होणे गरजेचे आहे. राज्य सरकार, व्यापारी वर्ग तसेच स्थानिक समूहांना एकत्र घेऊन गणपतीपुळेचा सर्वांगीण विकास साधला जावा, पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यास येथे रोजगाराची भरभराहट होईल, असा विश्वास चैतन्य तेंडुलकर यांनी व्यक्त केला.