अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून, कोट्यवधी भारतीयांची इच्छापूर्ती केल्यामुळे, मोदी सरकारवर मतांचा पाऊस पडण्याची सारी चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने विरोधक बिथरले आहेत. पण, ज्या विरोधकांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अव्हेरले, नंतरही दर्शनाला जाण्यास नकार दिला, त्यांना जनमानस समजलेच नाही. पण, ही चूक आपल्याला चांगलीच भोवणार आहे, हे लक्षात आल्याने, आता ते रामालाच दूषणे देत आहेत. अशाने जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्यांना कसे मिळतील?
जगातील सर्वात प्राचीन धर्म असलेल्या सनातन धर्मावर अश्लाघ्य आणि निरर्थक टीका केल्यामुळे लोकांच्या रोषाला पात्र ठरलेले तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे कान सर्वोच्च न्यायालयानेही उपटले. सनातन धर्माला नष्ट करण्याची आणि त्याची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करणारी उदयनिधी स्टॅलिन यांची वक्तव्ये हा मूलभूत अधिकारांचा दुरुपयोग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. “तुम्ही अडाणी, सामान्य माणूस नाही, तर मंत्री आहात. त्यामुळे आपल्या वक्तव्याचे काय परिणाम होतील, याची तुम्हाला पुरेशी आणि योग्य जाणीव आहे,” असे सांगत न्यायालयाने उदयनिधी यांची याचिका फेटाळून लावली.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे उदयनिधी हे पुत्र व राज्याचे कॅबिनेट मंत्री. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-काश्मीरमध्ये तसेच बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यांच्या या वक्तव्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
या सर्व याचिकांची सुनावणी एकाच न्यायालयात व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उदयनिधी यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संबंधित राज्यांतील उच्च न्यायालयात आधी दाद मागावी, अशी सूचना केली.‘मुळात उदयनिधी यांनी आधी आपल्याला मिळालेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून, सामान्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, हा सामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांचाही भंग ठरतो,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. “दुसर्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून, आता तुम्ही आमच्याकडे दाद मागायला कसे येता,” असा स्पष्ट प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला. “तुम्ही मंत्री असल्याने, आपल्या वक्तव्याचे काय परिणाम होतील, याची तुम्हाला चांगली जाणीव आहे,” असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना आधी संबंधित उच्च न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागण्याची सूचना केली आहे. त्यामुळे येते काही महिने तरी उदयनिधी यांना अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयांत हेलपाटे घालावे लागतील, असे दिसते.
उदयनिधी यांच्या वक्तव्याबद्दल जनता आणि न्यायालयांची भूमिका काय आहे, हे दिसत असतानाही, द्रमुकचेच एक खासदार ए. राजा यांनी त्यातून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा बहुसंख्याक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले. “आपल्याला रामाचे शत्रू समजावे, आपण ‘जय श्रीराम’ मानीत नाही आणि आपण ‘भारतमाता की जय’ असेही बोलणार नाही,” अशी मुक्ताफळे या राजा यांनी उधळली आहेत. त्यांनी ही वक्तव्ये कोणत्या संदर्भात केली आहेत, हे महत्त्वाचे नाही; कारण कोणत्याही संदर्भात प्रभू रामविरोधी वक्तव्ये ही स्वीकारार्ह नाहीत. एवढ्यावरही न थांबता, या राजांनी “भारत हा देश नाही, उपखंड आहे.प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी, त्यामुळे हा देश एकत्र नाही,” अशी पुन्हा एकदा भारताच्या विभाजनाची राष्ट्रद्रोेही भाषा केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात जाती, धर्म, प्रादेशिकतेच्या नावावर फूट पाडण्याचे षड्यंत्रच अशा विधानांमधून झळकताना दिसते. पण, केवळ ए. राजा यांनीच बेताल वक्तव्ये केली आहेत, असे नव्हे, तर प. बंगालमधील तृणमूलचे आमदार रामेंदू रॉय यांनीही अशाच प्रकारची रामविरोधी वक्तव्ये केल्याचे, सोशल मीडियातील व्हिडिओंमधून दिसून येते.
“अयोध्येतील राम मंदिर हे अपवित्र असून तेथे कोणत्याही हिंदूने पूजा करू नये,” असे वक्तव्य रॉय यांनी केले. द्रमुक, तृणमूल, समाजवादी पक्ष वगैरे विरोधी पक्षांचे नेते रामाच्या विरोधात का वक्तव्ये करीत आहेत, हे सांगणे अवघड. पण, बहुदा राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न राहण्याची केलेली चूक आपल्याला भोवते आहे, हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि त्याचा राग ते रामावरच काढीत असावेत!देशभरात रामाची लहर असून, ती निर्माण करण्याचे महत्कार्य नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले. त्याचा लाभ त्यांच्या सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत मिळणार असल्याचे लक्षात आल्यामुळेच विरोधी पक्ष पिसाटले आहेत. मोदी यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका विरोधकांवरच उलटते, हा आजवरचा अनुभव असतानाही, विरोधक ही चूक पुन:पुन्हा करीत असतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आता याचा पुन्हा एकदा अनुभव येत आहे. मोदी हे घराणेशाहीवर टीका करतात, म्हणून संतापलेल्या लालूप्रसाद यांनी मोदी यांना ‘स्वत:चा परिवार नाही आणि ते हिंदूही नाहीत,’ अशी खालच्या दर्जाची वैयक्तिक टीका त्यांच्यावर केली होती. मोदी यांनीही लगेच ‘१४० कोटी भारतीय हाच माझा परिवार आहे,’ असे सांगत लालूंच्या टीकेला सणसणीत प्रत्युत्तर देत, लालूंचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत. त्यानंतर देशभरातील केवळ भाजप कार्यकर्तेच नव्हे, तर लक्षावधी सामान्य लोकांनी आपल्या सोशल मीडियावर आपण मोदी यांच्या परिवाराचे सदस्य असल्याच्या ओळी प्रदर्शित केल्या. काही राज्यांमध्ये तर लोकांनी आपल्या घराच्या बाहेरही याच ओळी लिहिलेल्या पाट्याही टांगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशातील जनतेच्या मनात मोदी यांचे स्थान काय आहे, हेच दिसून आले.
एक दिवस असा जात नाही की, जेव्हा प्रमुख विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन, भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनीही काँग्रेसला अखेरचा राम राम केला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पडझड होत असल्याने, संतापलेले नेते आता प्रभू रामांवरच आपला राग काढत असल्याचे दिसते. कारण, मोदी यांच्या सरकारवर नाव ठेवण्यासारखा कोणताच मुद्दा दिसत नाही. मोदी दररोज प्रत्येक राज्यात हजारो कोटी रुपयांच्या विकास योजनांचा शुभारंभ करताना दिसत आहेत. या स्थितीत आपली धोरणे आणि कृती यात सुधारणा करण्याऐवजी वैफल्यग्रस्त झालेले विरोधी नेते रामालाच दोष देत आहेत. आपली हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता, त्याबद्दल देवालाच जबाबदार धरणार्या कर्तृत्वशून्य माणसासारखी विरोधकांची स्थिती झाली आहे. मात्र, त्यांच्या अशा अपरिपक्व वर्तनाने भाजपला आपले ‘अब की बार चारसौ पार’चे लक्ष्य गाठणे अधिकच सोपे जात आहे.