ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंती माला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत भेट घेतली.
चेन्नई : ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंती माला यांनी अयोध्या राम मंदिर आवारात वयाच्या ९० व्या वर्षी केलेल्या नृत्याची प्रशंसा आणि चर्चा चांगलीच रंगली होती. वैजयंतीमाला (Padmavibhushan Vaijayantimala) यांना भरतनाट्यम नृत्य सादर करत उपस्थितींना थक्क करणारा नृत्याविष्कार सादर केला होता. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (
Pm Narendra Modi) यांनी वैजयंती माला (Padmashri Vaijayantimala) यांची सदिच्छा भेट चेन्नईत घेतली. निमित्त होते ते नुकतेच त्यांना जाहिर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर वैजयंती माला यांना हात जोडून प्रणाम करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भावना देखी व्यक्त करत लिहिले आहे की, “वैजयंती माला (Vaijayantimala) यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहिर झाला असून भारतीय चित्रपट क्षेत्रात त्यांचे असणारे योगदान हे मोठे आहे. या निमित्ताने त्यांची चेन्नईमध्ये भेट घेता आली”.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी वैजयंती माला यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. यापुर्वी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहेत.
१३ ऑगस्ट १९३६ रोजी तमिळनाडूतील एका गावात तमिळ अय्यंगर ब्राम्हण कुटुंबात वैजयंती माला यांचा जन्म झाला. त्यांची आई वसुंधरा देवी या देखील ४० च्या दशकातील तमिळ अभिनेत्री होत्या. वैजयंती यांनी अगदी लहानपणापासून भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. एकीकडे नृत्याचे धडे घेत असताना दुसरीकडे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी १९४९ साली त्यांनी ‘वाकझाई’ या तमिळ चित्रपटातून अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली. त्यानंतर १९५० साली ‘जीविथम’ या तेलुगू आणि त्याच वर्षात ‘विजयाकुमारी’ या तमिळ चित्रपटात त्यांनी काम केले. तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावारुपास आल्यानंतर त्या हिंदी चित्रपसृष्टीकडे वळल्या. १९५१ वैजयंती यांनी ‘बहार’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एकाहून एक सदाबहार चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. ‘देवदास’, ‘नागिन’, ‘आम्रपाली’, ‘मधुमती’, ‘नया दौर’, ‘संगम’, ‘लिडर’, ‘ज्वेल थीफ’, ‘गंगा जमुना’, ‘जिंदगी’, ‘साधना’, हे वैजयंती माला यांचे गाजलेले चित्रपट.
वैजयंती या केवळ एक अभिनेत्रीच नव्हत्या तर नृत्यांगना, गायिका आणि निर्मात्या देखील होत्या. १९६४ साली त्यांनी ‘लिडर’ आणि ‘संगम’ या दोन हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी कॉरिओग्राफी केली होती. तसेच, १९६७ साली वैजयंती यांनी ‘हतै बजारे’ या बंगाली चित्रपटासाठी मृणाल चक्रवर्थी यांच्यासोबतीने बंगाली भाषेत पार्श्वगायन केले होते. याशिवाय, १९८२ साली एका तमिळ चित्रपटाची सहनिर्मिती देखील त्यांनी केली होती. कलाविश्वातील प्रत्येक क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिल्यानंतर १९७० साली ‘गनवार’ या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर वैजयंती माला यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली.
वैजयंती माला यांनी अनेक हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका सादर केल्या, त्यापैकी गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘साधना’. या चित्रपटाची एक खास गोष्ट आहे. तर पंडित मुखराम शर्मा यांच्या कथानकांवर आधारित अनेक हिंदी चित्रपट तयार झाले. दिग्दर्शक. बी.आर.चोप्रा यांनी ‘साधना’ चित्रपटाचे कथानक ऐकले आणि यावर चित्रपट तयार करण्याचे ठरवले. सुरुवातीला या चित्रपटात भारत भूषण आणि मधुबाला यांनी काम करावे अशी शर्मा यांची इच्छा होती. परंतु, चोप्रा यांना दिलीप कुमार आणि निम्मी यांनी चित्रपटात आपले योगदान द्यावे अशी इच्छा होती.
मात्र, काही कारणास्तव अभिनेत्री निम्मी देखील या चित्रपटातून बाद झाल्या आणि वैजयंती माला यांचा विचार या भूमिकेसाठी करण्यात आला. चोप्रा यांनी वैजयंतींची भेट घेत त्यांना चित्रपटाचे कथानक ऐकवले आणि त्यांनी लागलीच होकार कळवला. पण चित्रपट करण्यापुर्वी त्यांनी एक अट घातली. ती अट अशी होती की, या चित्रपटाच्या कागदपत्रांवर मी माझ्या घरातील इष्टदेवतांसमोर रात्री बारा वाजता सही करेन. याचे कारण चोप्रा यांनी विचारले असता वैजयंती म्हणाल्या, मला हिंदी चित्रपसृष्टीत येऊन ७-८ वर्ष झाली, आजवर मला नृत्यांगना असल्यामुळे त्याच पद्धतीच्या भूमिका मला मिळाल्या. परंतु, या चित्रपटातील भूमिका माझ्यासकट अभिनय कलागुणांना पाहून मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. आणि त्याचमुळे माझ्या गुरुंनी मला सांगितल्याप्रमाणे मी देवासमोर सही करण्याचा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडला. त्यानंतर वैजयंती यांच्या या श्रद्धेचा मान ठेवून चोप्रा यांनी ती अट मान्य केली आणि ‘साधना’ चित्रपटात वैजयंती माला झळकल्या.