‘बस्तर’ चित्रपटाचा ह्रदयद्रावक ट्रेलर प्रदर्शित, अदा शर्मा पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
05-Mar-2024
Total Views | 118
'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar: The Naxal Story) चित्रपटाचा मन सुन्न करणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : 'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar: The Naxal Story) या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. नक्षलवादाचा काळा चेहरा प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या या चित्रपटाची टीझरमुळे अधिक उत्सुकता वाढली होती. नुकताच 'बस्तर: द नक्षल स्टोरी' (Bastar: The Naxal Story) या चित्रपटाचा ह्रदय पिळवटून टाकणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचारासोबतच शहरी नक्षलवाद देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे कथानक बस्तरसारख्या अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करणाऱ्या सुरक्षा दलांच्या संघर्षाभोवती फिरते.
दरम्यान, 'द केरला स्टोरी' (The Kerla Story) या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ताकदीच्या भूमिकेत या चित्रपटाच्या निमित्ताने दिसणार आहे. आजवर अदा हिने देशभक्तीपर चित्रपटांमध्ये वाखाण्याजोग्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.
‘बस्तर’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच आपल्या देशाच्या जवानांच्या हत्येने होते. तसेच, यात आयसिस आणि बोको हराम यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना माओवादी यावर भाष्य करण्यात आले आहे. याशिवाय ट्रेलरमधील आदिवासींवर हल्ले, पोलीस, जवान, राजकीय नेत्यांच्या हत्या, नक्षलवाद्यांसोबत चकमक, त्यांचा एन्काउंटर अशी मनाला चटका बसणारी, नक्षलवाद्यांबद्दल मनात चिड निर्माण करणारी आणि आपल्या जवानांच्या मृत्यूमुळे डोळ्यांत पाणी आणणारी दृश्ये लक्ष वेधून घेतात.
टीझरने आणले डोळ्यांत पाणी
‘बस्तर’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे एकत्र आले आहेत. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून ती आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. बस्चरच्या पहिल्या टीझरमध्ये पाकिस्ताबरोबर युद्धात शहिद झालेले आपले जवान आणि आपल्याच देशात नक्षलवादी लोकांनी केलेली आपल्या जवानांची हत्या अन् जेएनयुसारख्या विद्यापीठात त्या कृतीची झालेले सेलिब्रेशन अशा अंतर्मुख करणाऱ्या गोष्टींबद्दल अदा शर्मा भाष्य करताना दिसली होती.
तर दुसऱ्या टीझरमध्ये एक पीडित महिला तिची व्यथा मांडताना दिसत होती. रत्ना कश्यप ही महिला तिच्यावर नक्षलवादी लोकांकडून झालेल्या अन्यायाबद्दल आपल्याला सांगताना या व्हिडिओत दिसत आहे. इतकंच नव्हे तर बस्तरमध्ये तिरंगा फडकावणं हा गुन्हा आहे आणि तसं केल्यास फार वाईट शिक्षा आहे ती म्हणजे मृत्यू असं देखील ती महिला बोलताना दिसते. त्यामुळे एका आईच्या तोंडून तिची ही हृदयद्रावक कहाणी या टीझरमधून आपल्यासमोर आलेली आहे. आता या चित्रपटातून आणखी किती वेदनादायक गोष्टी पाहायला मिळणार हे प्रदर्शनानंतरच समजेल. 'बस्तर: द नक्षल स्टोरी' या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.