महंत गोविंददेव गिरी महाराजांच्या उपस्थितीत अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी "अयोध्या केवल झांकी है, पीओके अभी बाकी है!" (Govinddev Giri Maharaj on POK) असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधल्याचे दिसत आहे.
मुंबई : "अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन एकदिशेने निघालेले आपण लोक आहोत. त्यामुळे आता थांबणे नाही. अयोध्या केवल झांकी है, पीओके अभी बाकी है!", असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बदलेल्या भारताचा उल्लेख करताना गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, "साप जेव्हा कात टाकताना आपल्या कातेमध्ये अडकलेला असतो, तेव्हा त्याला हालचाल करता येत नाही. परंतु ज्यावेळी तो कात सोडून बाहेर निघतो, त्यावेळी अगदी चपळाईने तो आपली कामे करू लागतो. यावरून असे दिसते, की आपल्या भारतानेही गेल्या दहा वर्षांमध्ये आपली कात टाकली आहे आणि जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा राहत आहे."
पुढे ते म्हणाले की, "आज अनेक गोष्टी अविश्वसनीय वाटत आहेत. कधीही वाटले नव्हते की, श्रीरामललास आपल्या मंदिरात विराजमान होताना पाहता येईल, कलम ३७० हटेल, काशी विश्वनाथ पुन्हा दिमाखात उभे राहतील, उजैनचे महाकाल तेथील वेदशाळा एक नवीन रुप घेईल, देशाचे पंतप्रधान समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेचे दर्शन घेतील आणि आपल्यालाही ते घडवतील. बदललेल्या भारताने नवी उभारी घेतली आहे, हाच याचा अर्थ आहे."
'विकासशक्ती' सोबत 'धर्मशक्ती' असणे का महत्त्वाचे आहे, यासंदर्भातही महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्र काही कारणास्तव पिछाडीवर येत गेला. त्याला पुन्हा उभारी द्यायची असेल तर 'विकासशक्ती' सोबत 'धर्मशक्ती' उभी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र हा देशाचा नायक राहिला आहे. अनेकांनी केवळ आपापल्या प्रांताचा विचार केला, मात्र अखिल भारताचा विचार करणारा महाराष्ट्र हा एकमात्र आहे. त्यामुळे धर्मशक्ती उभी करण्यात महाराष्ट्र नक्कीच पुढे सरसावेल असा विश्वास आहे." कार्यक्रमादरम्यान मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाचा प्राण म्हणजे भगवंताचे अधिष्ठान...
"या देशाचा प्राण म्हणजे भगवंताचे अधिष्ठान आहे. संपूर्ण इतिहास चाळून बघा, ज्या देशावर मुघलांचे आक्रमण झाले त्या देशातील सर्व संस्था संपून गेल्या. प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली. वाचनालय-ग्रंथालय जाळली गेली. कोणाला पुन्हा उभे राहता आले नाही. असे होऊनही फक्त उभा राहिला तो भारत देश होता."