वयाची चाळीशी पार झाली की शारीरिक, भावनिक बदलांसोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंधदेखील बदलू लागतात. समाज स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे, नवरा बायकोच्या नात्याकडे कसे पाहतो, याची एक वेगळीच परिभाषा आहे. पण, या सगळ्याचा परिणाम नकळतपणे आपल्या स्वभावातून, कृतीतून आणि संवादातून दिसून येत असतो.
केवळ वयोमानानुसार होणारे बदल अशा किती तरी घटनांना कारणीभूत ठरतात, याचा कधी आपण विचारच करत नाही. अशीच एक मजेशीर, पण चाळीशीतल्या लोकांना काही तरी सांगून जाणारी कथा विवेक बेळे लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.मुळात ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे नाटक. त्याचे कालानुरूप माध्यमांतर झाले आणि मोठ्या पडद्यावर सात मित्रांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तर २०-२५ वर्षांपासूनचे हे सात मित्र. त्यात तीन जोडपी आणि एक अविवाहित मित्र. शलाका (मधुरा वेलणकर-साटम), वरूण (आनंद इंगळे), सुमित्रा (मुक्ता बर्वे), डॉक्टर (अतुल परचुरे), पराग (सुबोध बावे), अदिती (श्रुती मराठे) आणि अभिषेक (उमेश कामत). हे सात मित्र बर्याच काळानंतर फिरायला जातात आणि तिथे त्यांच्यात एक विचित्र घटना घडते. अंधाराचा गैरफायदा घेत कुणीतरी कुणाचं चुंबन घेतं आणि ती दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावते. यानंतर प्रत्येकाचे एकमेकांशी वागणे, बोलणे बदलते आणि खर्या चोराचा शोध सुरू होतो.
चित्रपटात खर्या चोराचा शोध घेणं म्हणजे यातील तीन जोडप्यांच्या नात्यातील हरवलेला ओलावा, विश्वास, प्रेम असा थेट अर्थ (जो लेखक आणि दिग्दर्शकांना न सांगता मांडायचा आहे) प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचतो. दिग्दर्शकाचे एक विशेष कौतुक म्हणजे, या चित्रपटात केवळ सात मुख्य पात्रांवरच भर दिला आहे. त्यामुळे प्रेक्षक म्हणून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे जास्त पात्रांची यात भाऊगर्दी नसल्यामुळे कथेकडे आणि पात्रांकडे विशेष लक्ष केंद्रित राहते. लेखक आणि दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशीलपणे चाळीशी पार केलेल्यांच्या भावनांचा, विचारांचा आढावा घेत त्यांचे नातेसंबंधाबद्दलची व्याख्या, प्रेमाची बदलती व्याख्या ही उत्तमरित्या मांडली आहे. संपूर्ण चित्रपट हा त्या चोराचा शोध घेत असल्यामुळे, चित्रपटातील सात पात्र एकमेकांशी गॉसिप करत आहेत, हेच अधिक दिसून येते. पण, तरीही त्या गॉसिपच्या मागे आपल्या जोडीदाराशिवाय मित्रांसोबतचे वैचारिक आणि भावनिक धागे अधिक जुळताना दाखवले आहेत.
चित्रपटातील गाणी, पार्श्वसंगीत हेदेखील कथेला पूरक ठरणारे असेच. परंतु, जर का या सात मित्रांचे एकमेकांशी नाते भूतकाळात कसे होते, याचा आढावा चित्रपटात दिला गेला असता, तर प्रत्येक पात्र ज्यावेळी दुसर्या पात्राशी किंवा एका ठरावीक पात्राशीच गॉसिप का करते, याचा अंदाज लागला असता.‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात एकाहून एक कसलेले कलाकार आहेत. सुबोध भावे, मधुरा वेलणकर, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, श्रुती मराठे, आनंद इंगळे आणि उमेश कामत यांनी त्यांच्या कसदार अभिनयातून या चित्रपटाची रंगत वाढवली आहे. प्रत्येक कलाकाराने आपली एक ठरावीक शैली, त्या पात्रातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, आजच्या काळातील लग्न झालेल्या जोडप्यांना किंवा गेल्या अनेक वर्षांची मैत्री जपणार्या मित्रांना आपल्या नात्यातील एक रिएलिटी चेक देणारा ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट.
चित्रपट : अलीबाबा आणि चाळीशीतले चोर
दिग्दर्शक : आदित्य इंगळे
कलाकार : मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, सुबोध भावे, श्रुती मराठे, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, उमेश कामत
रेटिंग :