वेगवेगळ्या युद्धभूमी ः युद्धाला लागणारे तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रयोगशाळा
सध्या ४५ हून अधिक सशस्त्र संघर्ष मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांमध्ये, गटांमध्ये, प्रदेशांमध्ये चालू आहेत. हे देश आहेत- सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, लिबिया, मोरोक्को, पॅलेस्टाईन, सीरिया, तुर्की, येमेन, पश्चिम सहारा, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, युक्रेन आणि अनेक इतर देश. यामधील सर्वात दोन मोठी युद्ध म्हणजे, दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले, रशिया-युक्रेन युद्ध आणि ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेले इस्रायल आणि हमास युद्ध. वेगवेगळ्या ठिकाणी चाललेली युद्धे आणि संघर्ष हे शस्त्रे आणि युद्धाला लागणारे तंत्रज्ञान वापरण्याची, विकसित करण्याची प्रयोगशाळा बनली आहे. यामध्ये कुठले तंत्रज्ञान यशस्वी होते आहे आणि कुठले अयशस्वी हे तिथे चाललेल्या वापरामुळे कळते. सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रे, जुनी शस्त्रे आणि जुने-नवे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात या युद्धांमध्ये वापरले जात आहे. यामुळे सध्याच्या काळामध्ये कुठले शस्त्र किंवा तंत्रज्ञान युद्धात जास्त उपयुक्त आहे, हे निर्विवाद सिद्ध होत आहे.
अत्याधुनिक नौदल, हवाई दलाचा या युद्धात फारसा वापर नाही
उदाहरणार्थ, असे मानले जाते की, ’रणगाडा विरुद्ध रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे’ या युद्धात क्षेपणास्त्रे जिंकली आहेत. ’मोठ्या लढाऊ युद्धनौका विरुद्ध क्षेपणास्त्रे’ यामध्ये लांबून फायर केलेल्या क्षेपणास्त्रांचा विजय झालेला आहे. असे मानले जाते की, मोठ्या युद्धनौका आणि विमाने यांचा आता फारसा उपयोग नाही आणि त्या पांढरा हत्ती बनल्या आहेत.जगातील क्रमांक दोनचे अत्याधुनिक नौदल आणि हवाई दल असलेल्या रशियाने या दोघांचाही या युद्धात फारसा वापर केला नाही. कारण, वापर केल्यानंतर झालेले नुकसान. अतिशय महागड्या नौका बुडवल्या गेल्या आणि महागडी विमाने शोल्डर फायर क्षेपणास्त्रांनी पाडण्यात आली. त्याऐवजी कमी किमतीमध्ये आणि जास्त संख्येने क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन्स यांचा वापर केला जात आहे. ड्रोन्सचा वापर तर प्रचंड वाढला आहे. याशिवाय यंत्रचालित जमिनीवर चालणारी वाहने(ground based robots) किंवा पाण्याखालतून जाणार्या छोट्या सबमरीन/व्हेसल्स (under sea drones) यांचा वापर येणार्या काळामध्ये वाढणारच आहे.
म्हणून गरज आहे, अशी सर्व आधुनिक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विश्लेषण करून त्यामध्ये भारतीय सैन्याकरिता कुठले तंत्रज्ञान योग्य आहे, यावरती विचार करणे. यावर भारतीय सैन्य हे सतत काम करत आहे. त्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल आहे की, जे तंत्रज्ञान आपण निवडले आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता भारतीय सैन्याला सक्षम करणे.म्हणूनच २०२४ लष्कारासाठी तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष भारतीय सैन्याने जाहीर केले आहे. कारण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याकरिता प्रशिक्षण आणि अनुभवाची गरज असते. ज्याला पुष्कळ वेळ लागतो.
२०२४ भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष
भारतीय लष्कराचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना प्राणघातक स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरसोनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान युद्धात उपयुक्त ठरताना दिसत आहेत.पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षेशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी सध्या भारतीय लष्कराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे, युद्धाचे अनिश्चित स्वरूप. २०२४ हे भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष असेल.भारतीय लष्कर आपल्या पायदळ, तोफखाना आणि रणगाडा बटालियनमध्ये ड्रोन आणि काऊंटर ड्रोन प्रणाली एकत्रित करत आहे. कमांड स्तरावर ‘कमांड सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स’ची स्थापना सायबर युद्धात क्षमता वाढविण्यावर जोर देते. या शिवाय प्रादेशिक लष्कराच्या (ढशीीळीेींळरश्र रीाू) माध्यमातून तज्ज्ञ अधिकारी भरती करून, लष्कर आपल्या मानव संसाधनाचा विस्तार करत आहे. या तज्ज्ञ अधिकार्यांमध्ये नागरी-लष्करी भरतीद्वारे सायबरतज्ज्ञ तयार करणे समाविष्ट आहे. ड्रोन आणि काऊंटर ड्रोन प्रणाली अखंडपणे ऑपरेट करण्याच्या योजनांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. २ हजार, ५०० सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हिजन (संभव) हॅण्डसेटच्या समावेशासह, मोबाईल बातचित सायबर युद्धात सुरक्षित राहू शकते. संवेदनशील कामात गुंतलेल्या अधिकार्यांना ३५ हजार संभव हॅण्डसेट वितरित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे.
ग्रे झोन युद्ध डावपेच वापरण्याची चीनची वाढती क्षमता
गलवान संघर्षानंतर संघर्ष करण्यासाठी, ग्रे झोन युद्ध चीनकरिता पसंतीचे धोरण बनत आहे आणि तांत्रिक प्रगतीमुळे त्याची व्याप्ती वाढत आहे. चीन आणि पाकिस्तान ग्रे झोन युद्ध डावपेच, हायब्रिड रणनीती वापरत आहे.पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा धोका पाहता, पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांचे मिश्रण असलेल्या काश्मीर खोर्यात ‘हायब्रीड’ दहशतवादाचा सामना भारतीय सैन्य समर्थपणे करत आहे. या आव्हानांना प्रत्युत्तर देताना मानवरहित हवाई वाहन, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासारख्या तंत्रज्ञानात प्रावीण्य असलेल्या विशेष युनिट्सवर भर दिला जात आहे, त्यासाठी भारतीय लष्कर उपग्रह प्रतिमा, ड्रोन आणि आधुनिक सेन्सर्ससह अत्याधुनिक टेहळणी तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत आहे. मात्र, अजून जास्त प्रगती करण्याची गरज आहे. ग्रे झोन युद्ध डावपेचांशी संबंधित डिजिटल धोक्यांपासून सैन्याच्या पायाभूत कम्युनिकेशन सुविधांचे संरक्षण करण्यात सायबर सुरक्षा उपाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विशेष शिक्षित स्वतंत्र केडरची स्थापना
’इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स’ (आयडेक्स) सारख्या उपक्रमांच्या स्थापनेसह ऑपरेशनल, धोरणात्मक आव्हानांसाठी, नावीन्यपूर्ण उपायांसाठी नागरी क्षेत्र, शैक्षणिक आणि उद्योग यांच्याशी लष्कराची आपले संंबंध वाढवत आहे. तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करण्यासाठी विशेष शिक्षित आणि स्वतंत्र केडरची स्थापना होत आहे, जी दीर्घ काळात उपयुक्त ठरतील.अलीकडेच लष्कराने एक नवीन धोरण सुरू केले, ज्याअंतर्गत ’एआय’, रोबोटिक्स आणि ड्रोन यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य असलेल्या लेफ्टनंट कर्नलन्सना कर्नल पदोन्नतीसह त्याच क्षेत्रात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे,ज्यामुळे जास्त काळ ते त्या तंत्रज्ञान युनिट मध्ये काम करतील. यामुळे त्यांच्या कौशल्याचा, अनुभवाचा फायदा भारतीय सैन्याला होईल. या धोरणाचे तीन वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल.
संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधनात ‘आत्मनिर्भरता’
भारतीय सैन्याकरिता गुरुकिल्ली म्हणजे संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकास यांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ होय.अत्याधुनिक तंत्रज्ञान हे वेगाने बदलत असते.नवीन तंत्रज्ञान, शस्त्रे निर्माण होत असतात. या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कुठले शस्त्र घ्यायचे, त्याला सैन्यात केव्हा सामील करायचे आणि असे करताना सर्वात अत्याधुनिक पण कमी किमतीत असे तंत्रज्ञान आपल्या सैन्यांमध्ये कसे येईल, हे ठरवणे आणि ते आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. याकरिता भारतीय सैन्याने एक नवीन युनिट तयार केलेली आहे, ज्याचे कामच कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान सैन्यामध्ये सामील करायचे, हे आहे. युक्रेन-रशिया युद्ध, हमास-इस्रायल युद्धात झालेल्या चुका आणि मिळालेले धडे यांपासून भारतीय सैन्य शिकत आहे. म्हणूनच यापूर्वीची सैन्याच्या ‘डॉक्टरीन’मध्ये बदल करण्याची वेळ आली आहे आणि सध्या चाललेल्या लढायांपासून जे नवीन शिकायला मिळत आहे, ते सैन्याच्या ‘डॉक्टरीन’मध्ये सामील व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञान मिळवण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलायला पाहिजे. भारतीय सैन्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान नक्कीच येत आहे; परंतु तंत्रज्ञान सामील करण्याचा आणि सैन्याने ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा वेग हा चीनपेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच येणार्या काळामध्ये चीनचे मल्टीडोमॅन युद्धाचे आव्हान आपण पेलू शकू. आपला युद्ध पद्धती विकसित करण्याची दिशा बरोबर आहे; मात्र तिथे पोहोचण्याचा वेग वाढायला पाहिजे.