‘धर्मवीर २’ मध्ये लता एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, बऱ्याच वर्षांनंतर करणार कमबॅक

Total Views |
‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट याच वर्षी म्हणजे २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहिर न झाल्यामुळे प्रेक्षक फार उत्सुकतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत.
 

shweta shinde 
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer 2) यांचा जीवनपट मांडणारा ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ (Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल महत्वपुर्ण माहिती 'महाएमटीबी'ला समजली आहे.
 
मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटात लता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे दिसणार आहे. नुकतीच श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांनी ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना त्यांनी आगामी ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपटातील त्यांच्या या महत्वपुर्ण भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. श्वेता म्हणाल्या, मी ४ ते ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहे. ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी माझी निवड लता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेसाठी केली ही फार मोठी बाब आहे. त्यामुळे नक्कीच इतक्या वर्षांच्या काळानंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर येणं हे दडपण होतं. पण नक्कीच ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे”. तर, ‘धर्मवीर १’ आणि ‘धर्मवीर २’ मध्ये अभिनेते क्षितीश दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात सर्वसामान्यांचे नेते म्हणून ज्यांना सर्वच जण जाणतात त्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांनी भेटीस आणला. यात प्रसाद ओक याने दिघे साहेबांची साकारलेली भूमिका आजन्म प्रेक्षकांच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही. पहिल्या भागाच्या अभूतपुर्व यशानंतर आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ घेऊन पुन्हा एकदा कलाकार सज्ज झाले असून यात नेमकी कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार याबद्दल निर्माते मंगेश देसाई यांनी महाएमटीबीशी बोलताना सुतोवाच केले होते.
 
काय म्हणाले मंगेश देसाई?
 
‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे चित्रिकरण ९ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. यावेळी चित्रपटात कोणाच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले की, “ ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटात साहेब मग ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांपैकी कोणत्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटात उलगडणार हे पाहण्यासाठी २०२४ चीच वाट पाहावी लागेल”.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.