ढोंगी पाकिस्तान!

    27-Mar-2024   
Total Views | 41
nabeel munir

"द.कोरिया आणि आमच्या देशामध्ये ऐतिहासिक-धार्मिक संबंध आहेत. कोरियामध्ये बौद्ध धर्म आमच्या देशातूनच पोहोचला आहे,” असे कोण म्हणाले असेल असे वाटते? तर हे महाशय म्हणजे पाकिस्तानी राजदूत नबील मुनीर. मुनीर यांना असे म्हणायचे आहे की, द. कोरियामध्ये अतिशय भक्कमरित्या अस्तित्वात असलेला, सियोल बौद्ध धर्म (भारतातून चीनमध्ये आणि पुढे कोरियामध्ये गेलेल्या बौद्ध धर्मामध्ये कोरियन लोकांनी कोरियन संस्कृतीनुसार बदल केला. तोच सियोल बौद्ध धर्म) हा मूळचा पाकिस्तानातून आलेला. कोणे एके काळी पाकिस्तान काय नि अफगाणिस्तान काय, तिथे बौद्ध धर्म फुलला-फळला.


पाकिस्तानमध्ये स्वात घाटी हे बौद्ध धर्माचे पवित्र ठिाकण. २०२२ साली पाकिस्तानमध्ये २ हजार, ३०० वर्षांपूर्वीची बौद्ध मूर्ती आणि त्याच काळातल्या २ हजार, ७०० वस्तू सापडल्या, ज्यावर बौद्ध धर्माची छाप होती. हे जरी खरे असले, तरी आता काय स्थिती आहे? पाकिस्तानमध्ये एकमेव बौद्ध विहार कार्यान्वित आहे. तेही श्रीलंकेच्या बौद्ध धर्मीय राजदूतांसाठी. २०२० साली पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमी प्रांत खैबरपख्तुनख्वामध्ये तथागत बुद्धांची १ हजार, ७०० वर्षं जुनीमूर्ती तोडली गेली. का तर म्हणे मूर्तिपूजा इस्लाममध्ये हराम!असो. पाकिस्तानचे राजदूत जेव्हा ‘बौद्ध धर्म आमच्या देशाचा’ असे सूतोवाच करतात, तेव्हा त्यांना चीनच्या मदतीने निर्माण होणारा, गिलगिट-बाल्टिस्तानचा डायमर-भाषा बांध परियोजनेसह जलविद्युत प्रकल्प आठवतो का? या प्रकल्पासाठी बौद्ध धर्माचा वारसा आलेल्या पुरातन ३० हजार मूर्ती आणि वास्तू नष्ट केल्या जात आहेत. बौद्ध धर्म जर पाकिस्तानचा वारसा आहे, तर मग हा पुरातन वारसा नष्ट करताना, पाकिस्तानला जराही खंत का वाटली नाही? आपल्या देशात कल्याणकारी विकास प्रकल्पासाठी जर काही वास्तूंचे, गावांचे विस्थापन होत असेल तर पर्यावरण, धर्म वारसा, मागासवर्गीय/आदिवासी अस्मिता म्हणत काही निवडक लोक, संघटना प्रकल्पाला विरोध करतात.

मात्र, पाकिस्तानमध्ये बौद्ध धर्माचा वारसा सांगणार्‍या हजारो मूर्ती-वास्तू नष्ट होत आहेत. त्याबाबत कुणीही काहीही म्हणत नाही. भारतातील सर्वच मंदिर-लेणी ही बौद्ध धर्माची होती आणि ती नंतर हिंदूंनी लुबाडली म्हणणारेही काही लोक आहेत. पाकिस्तानमध्ये नष्ट केल्या जाणार्‍या, बौद्ध धर्माच्या पुरातन वारशाबद्दल काहीही बोलत नाहीत. नव्हे पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे बौद्ध धर्माची कार्यपद्धती करणारे लोक तरी असतील का? कारण, ’सर तन से जुदा’चा प्रयोग तिथे त्यांच्यावर ताबडतोब अमलात येईल. पाकिस्तानमध्ये सध्या बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या किती, तर १ हजार, ८०० इतकी. बुद्धाने सांगितलेली शांती, करुणा, सम्यक मैत्री वगैरे तर पाकिस्तानच्या गावीही नाही. दहशतवाद, हिंसा, मुस्लिमेत्तर लोकांवर अत्याचार हीच पाकिस्तानची आता ओळख. या पार्श्वभूमीवर कोरियामध्ये जाऊन, “द. कोरियामध्ये स्थिरावलेला बौद्ध धर्म हा पाकिस्तानाची देण आहे,” असे पाकिस्तानी राजदूताने विधान करणे, हे हास्यास्पदच! पण, याहीपेक्षा हास्यास्पद विधान गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या ’एशिया सोसायटी’मध्ये अब्बास जिलानी या पाकिस्तानच्या मंत्र्याने केले होते. जिलानी तिथे म्हणाले होते की, ”आमच्या देशात म्हणजे पाकिस्तानमध्ये हिंदू धर्माचा जन्म झाला. आमच्या देशात अरब दुनियेतून इस्लाम आला आणि आमच्या देशातच बौद्ध धर्म फुलला-फळला.”

१९४७ साली दंगली, हिंसा करत जन्माला आलेला पाकिस्तान हा भूभाग. इस्लामिक राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी या पाकिस्तानचा जन्म. याच पाकिस्तानच्या नेत्याने अमेरिकेत जाऊन म्हणावे की, हिंदू धर्माचा जन्म पाकिस्तानात झाला, हे किती किती हास्यास्पद. पण, अब्बास जिलानी असो की नुबली मुनीर हे लोक असे का म्हणतात? तर जगभरात इस्लामचे राज्य आणायचे असे म्हणत, दहशतवादी संघटनांनी जगाला वेठीस धरले. त्यामुळे जगभरात ’इस्लामफोबिया’ आहे. त्यातही पाकिस्तानी मुस्लीम म्हटले की, जगभरात नकारघंटा! त्याचवेळी भारतातील हिंदूंना जगभरात स्वीकारले जाते. तसेच आशियामध्ये बौद्ध धर्माला मानणारे देश आहेत. यामुळेच पाकिस्तानचे विदेश मंत्री, राजदूत पाकिस्तानबाहेर जाऊन भारताच्या हिंदू आणि बौद्ध वारशाच्या गप्पा मारतात. पण, त्यांच्या मनातच नव्हे, तर त्यांच्या देशातही इस्लामेत्तरांसाठी काय चालले आहे, हे जगाला माहिती आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते, तसे पाकिस्तानचे आहे. ढोंगी पाकिस्तान!


 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121