आदिती सिंह यांनी पॉडकास्टमध्ये काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे संघटन, काँग्रेस पक्षातील कार्यसंस्कृती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे पक्षावरील नियंत्रण या, अशा सर्व विषयांवर अनेक गौप्यस्फोट केले. एकेकाळी ही मंडळी गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीयांपैकी होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटांकडे केवळ सनसनाटी म्हणून पाहता येत नाही.
देशाच्या सत्तेचा मार्ग जातो, तो लोकसभेच्या तब्बल ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून. त्यामुळे प्रत्येक पक्ष उत्तर प्रदेशात आपल्याला कसे सर्वोच्च यश मिळेल, याची काळजी घेत असतो. याच उत्तर प्रदेशातल्या अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे अनेक दशके वर्चस्व होते. इंदिरा गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी असे गांधी कुटुंबातील सदस्य या मतदारसंघांमधून निवडून येत होते. त्यापैकी अमेठी मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा २०१९ साली दणदणीत पराभव केला. अर्थात, राहुल गांधी यांना आपल्या पराभवाचा अंदाज आला असावा. त्यामुळेच त्यांनी वायनाड या केरळमधील मतदारसंघामधूनही निवडणूक लढविली होती. तेथून ते विजयीही झाले. मात्र, राहुल गांधी यांच्या पराभवामुळे काँग्रेसच्या एकूणच धोरणाचा बुरखा फाटला होता. कारण, अमेठीमधून दीर्घकाळ गांधी कुटुंबाचेच सदस्य निवडून येत होते आणि देशातही त्यांचीच सत्ता होती; तरीही अमेठीचा प्राथमिक स्तरावरचा विकासही करणे त्यांना शक्य झाले नव्हते. अर्थात, शक्य झाले नाही, असे चुकीचे ठरेल. कारण, दीर्घकाळ देशाची सत्ता हाती असूनही, आपल्या मतदारसंघाचा विकास करणे जमत नसेल, तर तो शेवटी इच्छाशक्तीचा प्रश्न ठरतो. यंदादेखील राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून लढणार की नाही, याची स्पष्टता काँग्रेसने अद्याप केलेली नाही, तर स्मृती इराणी यांची अमेठीतूनच उमेदवारी भाजपने घोषित केली आहे.
काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचा आणखी एक मतदारसंघ म्हणजे रायबरेली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या दीर्घकाळपासून या मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, येथेही अमेठीपेक्षा फार वेगळी स्थिती नाही. यंदा मात्र सोनिया गांधी यांनी येथून निवडणूक लढवून, लोकसभेत जाण्याऐवजी राज्यसभेवर जाण्याचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनाही पराभवाची भीती वाटली, अशी चर्चा होणे स्वाभाविक. रायबरेलीमधून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांना उमेदवारी मिळेल, अशीही चर्चा होत असते. ती चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अर्थात, अद्याप काँग्रेस आणि भाजप यांनीही येथून उमेदवार घोषित केलेला नाही. बहुदा दोन्ही पक्ष परस्परांच्या उमेदवारांचा अंदाज घेत असावेत. त्यामुळे या आठवड्यात दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होईल, अशी आशा आहे.याच रायबरेली मतदारसंघाच्या आमदार आदिती सिंह सध्या चर्चेत आहेत. ’एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांच्या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये आमदार आदिती सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला गेल्या आठवड्यात सहभागी झाले होते. दोघेही पूर्वाश्रमीचे काँग्रेसी. काँग्रेसमध्येच राजकीय कारकिर्दीस या दोघांनीही प्रारंभ केला.
मात्र, कालांतराने काँग्रेसच्या घराणेशाहीस कंटाळून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये आता ते यशस्वी राजकारण करत आहेत. या दोघांनीही पॉडकास्टमध्ये काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे संघटन, काँग्रेस पक्षातील कार्यसंस्कृती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे पक्षावरील नियंत्रण या, अशा सर्व विषयांवर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. एकेकाळी ही मंडळी गांधी कुटुंबाच्या अतिशय निकटवर्तीयांमध्ये होती, त्यामुळे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटांकडे केवळ सनसनाटी म्हणून पाहता येत नाही.आमदार आदिती सिंह यांनी या पॉडकास्टमध्ये राहुल गांधी यांच्याविषयी अगदीच विचित्र किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, २०१७ मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या, तेव्हा योगायोगाने आपली भेट राहुल गांधींशी झाली होती. भेटीदरम्यान राहुल गांधींना काहीही माहिती नसल्यासारखे दिसत होते. कारण, ते वेगळ्याच विश्वात राहत असल्याचे जाणवत होते. त्यावेळी राहुल गांधींनी विचारले की, उत्तर प्रदेशात काँग्रेसचे किती आमदार आहेत, यावर काँग्रेसचे सात आमदार असल्याचे आपण त्यांना सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्याला आपादमस्तक न्याहाळले आणि आपल्याकडे बघून जोरजोरात हसायलाच लागले. या घटनेचा आपल्याला धक्काच बसल्याचे आदिती सिंह यांनी म्हटले आहे.
अर्थात, राहुल गांधी हे अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, सभांमध्येही असे करताना दिसतात. अनेकदा त्यांच्या जाहीर सभांमधील दुभाषीदेखील हे वाक्य मी कसे सांगू, अशा संकटात सापडल्याचे दिसून येते. आपल्या पक्षातील नेत्यांशी कसे वागावे, हे राहुल गांधी यांना कदाचित कळत नसावे, असेच यातून दिसते. कारण, आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा समरमा यांनीदेखील बर्याचदा सांगितले आहे.पॉडकास्टमध्ये आदिती सिंह यांनी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याविषयी सांगितलेला किस्सा तर अधिकच धक्कादायक आहे. आदिती सिंह म्हणाल्या की, आपला आणि अंगद सिंह यांचा आता घटस्फोट झाला आहे. अंगद सिंह यांचे कुटुंब पंजाबमधील असून, तेथेही ते राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, २०१७ साली ज्यावेळी अंगद हे काँग्रेसकडे नवांशहर मतदारसंघातून उमेदवारी मागण्यास गेले होते, त्यावेळी प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अंगद यांना आपल्या (आदिती यांच्या) चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास सांगितले होते. आपण त्यावेळी काँग्रेस सोडून, भाजपमध्ये प्रवेश केल्यानेच, प्रियांका यांनी असे केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे.
अर्थात, आदिती सिंह यांच्या आरोपांमध्ये धक्कादायक असे काहीही नसल्याचे म्हणता येईल. कारण, एकाच कुटुंबाच्या दावणीस बांधलेल्या पक्षामध्ये असे होणे स्वाभाविक आहे. कारण, अशा पक्षांचे मुखिया हे आपल्याभोवती आपलेच गुणगान गाणार्या भाटांची फौज बाळगत असतात. मात्र, आदिती सिंह यांच्या आरोपांचा काँग्रेसला आता रायबरेलीमध्ये धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. कारण, आदिती सिंह यांचे वडील अखिलेश सिंह हे रायबरेलीमध्ये २४ वर्षे आमदार होते. गांधी कुटुंबांच्या यशामध्ये अखिलेश सिंह यांचे सर्वांत मोठे योगदान होते, हे काँग्रेसही नाकारणार नाही. त्यामुळे आदिती सिंह यांनी या पॉडकास्टद्वारे काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे, असे नक्कीच म्हणता येईल.