रंगाचा बेरंग होणार नाही! २,००० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा
23-Mar-2024
Total Views | 39
ठाणे : राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याचे तसेच रंगाचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे. ठाणे शहर आणि परिसरात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवारी होळी आणि सोमवारी धुलीवंदन असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या विद्यमाने मोठा फौजफाटा पाच परिमंडळात तैनात करण्यात आला आहे. त्यातच केमिकल युक्त किंवा शरीरास अपायकारक ठरणारे फुगे मारण्याच्या प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत.
तर होळी आणि धूलिवंदन या जल्लोषात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. धूलिवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसही सतर्क झाले असून, धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम
मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शनिवार, २३ मार्चपासून संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू झालेली ही विशेष कारवाई २५ मार्चपर्यंत सुरू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ अॅनालयाझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून, या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे राठोड, यांनी सांगितले. त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. या कारवाईसाठी ६३ पोलिस अधिकारी आणि ६५० कर्मचारी तैनात असतील, असेही ते म्हणाले.