शिवधनुष्य ‘सावरकर’ चित्रपटाचे...

    23-Mar-2024
Total Views |
Savarkar Movie Review


बहुप्रतीक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवार दि. २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वा. सावरकरांची मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच, रणदीप हुड्डाने निर्मिती, दिग्दर्शन, संहितालेखनाचेही शिवधनुष्य लीलया पेलले आहे, असे म्हणावे लागेल.
 
चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी त्याचा केवळ मनोरंजनासाठी वापर न करता, प्रबोधनाचे माध्यम म्हणूनदेखील उपयोग करावा, या हेतूने चित्रपटनिर्मितीस सुरुवात केली. अशा या अत्यंत प्रभावी माध्यमाचा उपयोग करून रणदीप हुड्डासारख्या बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर पडद्यावर साकारले आहेत. हा चित्रपट भव्य स्वरुपात साकारला आहे आणि चित्रपट प्रचार-प्रसारासाठी त्याला उत्तम मार्केटिंगची जोड दिल्याने, चित्रपटाविषयी लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली दिसते.

चित्रपट सुरू होतो. पुण्यात प्लेगची साथ, त्यातील रॅण्डचे पाशवी उपाय, मग चापेकर बंधूंनी केलेली रॅण्डची हत्या आणि त्यासाठी एकाच घरातील तिघे सख्खे बंधू फासावर गेले, ही बातमी वाचून. युवा सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर घेतलेली शपथ, ‘अभिनव भारत’ स्थापना, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण, विदेशी कापडांची होळी, बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला प्रयाण, तेथील क्रांतिकार्य, तेथील सावरकरांचे सहकारी, भारत भवन, मदनलाल धिंग्रांचे हौतात्म्य, अटक, मार्सेलिसची उडी, अंदमानमधील छळ, सशर्त सुटका, रत्नागिरीतील समाजकार्य, संपूर्ण मुक्तता, हिंदू महासभेचे कार्य, स्वातंत्र्य, स्वतंत्र भारतातील दोन कारावास असे सगळे सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहेत.

सावरकर एक शतपैलू व्यक्तिमत्त्व होते आणि त्यात सावरकरांचे आयुष्य इतके रोमहर्षक घटनांनी भरलेले होते की, पटकथा लिहिताना काय मांडावे आणि काय गाळावे असा मोठा पेच पटकथाकार आणि संकलकांसमोर उभा राहणे स्वाभाविक होते. त्यामुळे सावरकर पडद्यावर साकारणे जितके कठीण होते, तितकीच सावरकर चित्रपटाची पटकथा लिहिणे आणि संकलन करणे हेदेखील एक प्रकारे शिवधनुष्यच पेलण्यासारखे होते. पण, त्यातून मार्ग काढून शक्य तितक्या महत्त्वाच्या गोष्टी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

रणदीप हुड्डाने सावरकर साकारण्यासाठी, तब्बल ३० किलो वजन कमी केले होते. इतके वजन दुसर्‍या कुठल्या बॉलीवूड अभिनेत्याने दुसर्‍या एखाद्या ‘सेक्युलर’ चित्रपटासाठी कमी केले असते, तर त्याचे मीडियाने प्रचंड कोडकौतुक केले असते, त्याला डोक्यावरही घेतले असते. पण, इथे ‘सावरकर’ विषय असल्याने, मीडिया याविषयी मूग गिळून गप्प आहे. पण, सोशल मीडियामुळे ही बाब व्हायरल होत गेली. या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारताना, रणदीप हुड्डाने जीव ओतून काम तर केले आहेच; पण त्यासोबत सावरकर चरित्राचा उत्तम अभ्यास करुन अतिशय उत्तम कथा-पटकथा-संवाददेखील लिहिले आहेत. म्हणजे केवळ शारीरिक परिवर्तन न करता, वैचारिक परिवर्तनदेखील केल्याचे चित्रपट पाहताना प्रकर्षाने दिसून येते.

या चित्रपटाची मला आवडलेली सगळ्यात उत्तम बाब म्हणजे, पार्श्वसंगीताचा केलेला अचूक वापर. मोठ्या पडद्यावर चरित्रपट कसा साकारावा, याचा उत्तम वस्तुपाठ या चित्रपटाने घालून दिला आहे. चित्रपट पाहताना तर आपण हेलावून जातोच; पण चित्रपट संपल्यावर देखील आपल्यावर त्याचा प्रभाव टिकून राहतो, यातच या चित्रपटाचे यश आहे. योग्य ठिकाणी कथानक पुढे सरकवत नेताना, तळटिपांचा दिग्दर्शकाने अगदी अचूक उपयोग केला आहे. मात्र, आम्हा अभ्यासकांना माहीत असणारी पात्र सामान्य लोकांना ज्ञात असतीलच असे नाही. त्यामुळे त्या पात्रांचा चित्रपटात प्रवेश होताना खाली त्यांचे नाव द्यायला हवे होते, असे वाटते.

चित्रपटात अर्थातच काही ऐतिहासिक तपशिलाच्या चुका आहेत. उदा. सावरकरांची संपूर्ण मुक्तता रत्नागिरी कारागृहातून नव्हे, तर पुण्याच्या येरवडा कारागृहात असताना झाली होती. अर्थात माणूस म्हटल्यावर अशा काही चुका होणे स्वाभाविकच आणि इथे तर हुडाने कोणाचेही साहाय्य न घेता, सावरकर चरित्राचा व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट लेखन केले आहे, ३० किलो वजन कमी करून अभिनयदेखील केला आहे, कधीही दिग्दर्शनाचा अनुभव नसताना इतका मोठा चरित्रपट उत्तमरित्या दिग्दर्शित केला आहे आणि स्वतःचे घर गहाण ठेवून, चित्रपटनिर्मिती देखील केली. त्यामुळे अशा काही चुका असल्या, तरी हेतू चांगला असल्याने दुर्लक्ष करू शकतो. या चित्रपटात इंग्रजी संवाद खूप आहेत, त्याला हिंदी सबटायटल दिली असली, तरी उत्तम इंग्रजी येत असूनही, आंग्ल उच्चार न समजल्यामुळे, खालील हिंदी सबटायटल वाचताना, चित्रपट पाहतानाची काही प्रेक्षकांची लिंक तुटायचा संभव असतो. त्यामुळे इंग्रजी संवादाचे प्रमाण कमी केले असते, तर उत्तम झाले असते असे वाटते.

भारत भवन आणि अंदमानमधील चित्रीकरण अतिशय उत्तम झाले आहे. काही दृश्यांत चित्रीकरण करताना, प्रकाशाचा सुयोग्य वापर केला आहे. तो काळ पडद्यावर उभा करणे, हे मोठे आव्हान होते आणि ते संपूर्ण टीमने यशस्वीपणे पेलले आहे. हुडा सावरकरांसारखा दिसत नसला, तरी (हे त्याने स्वतः मुलाखतीत मान्य केले आहे) ज्याप्रकारे त्याने तन-मन-धन देऊन झोकून दिले आहे, त्याने ही उणीव भरुन काढली आहे. त्याने अभिनय किंवा देहबोलीतून सावरकर उभे केले आहेत. तो अक्षरशः सावरकर जगला आहे. अनेक अडचणींवर मात करून, एक अप्रतिम असा चरित्रपट साकारला आहे. प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट.

चित्रपट : स्वातंत्र्यवीर सावरकर
दिग्दर्शक : रणदीप हुड्डा
कलाकार : रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल
रेटिंग : ****


अक्षय जोग