‘उम्मा’ला चिंता असती तर...

    21-Mar-2024   
Total Views | 37
Afghanistan Schools Restart

बुधवारी अफगाणिस्तानच्या शाळांमध्ये पुन्हा घंटा वाजली. शाळेबाहेर तालिबानच्या नेत्यांना पांढरे झेंडे दाखवून, स्वागताचे दिखाऊ सोपस्कार वगैरेही पार पडले. पण, अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानमधील मुली आणि महिला या शिक्षणापासून वंचितच! तालिबानी राजवट लागू झाल्यापासून, मुलींच्या शैक्षणिक अधिकारांवर गदा आली. अटी-शर्तींसह फक्त प्राथमिक शिक्षणाचा अधिकार तेवढा नाममात्र उरला. माध्यमिक शिक्षणासाठी त्या आजही पात्र नाही. त्यामुळे एकीकडे मुस्लीम राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारा सौदी अरेबियासारखा देश महिलांबाबत सुधारणावादी धोरणे राबविताना दिसतो, तर दुसरीकडे तालिबान मात्र स्त्रीशिक्षणाविरोधी मध्ययुगीन भूमिकेला मूठमाती द्यायला का तयार नाही, असाच प्रश्न उपस्थित होतो.
 
सौदी असेल, तुर्कीये किंवा बांगलादेश, या इस्लामिक देशांमध्ये मुलींच्या शिक्षणावर कोणतीही सरसकट बंदी नाही. एवढेच नाही तर अन्य मुस्लीम देशांत बहुसंख्येने स्त्रीशिक्षणावर तालिबानसारखी बंदी लादलेली दिसत नाही. पण, इराणसारख्या शियाबहुल देशात मुलींच्या शिक्षणासंबंधी नियम तुलनेने कठोर आहेत. जसे की, मुलं आणि मुलींनी एकत्रित शिक्षण घेण्यास तिथेही मज्जाव. त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की, कुराण-हदिस यांसारखे धर्मग्रंथ हे स्त्रीशिक्षणाला ‘हराम’ मानतात का? हे सत्य असेल, तर मग इस्लामिक देशांमध्येच स्त्रीशिक्षणावरून इतकी पराकोटीची मतभिन्नता का? सौदीसारख्या इस्लामचे जागतिक केंद्र असलेल्या देशात मग स्त्रीशिक्षणाबाबत तालिबानसारखे कठोर कायदे-कानून का नाहीत? मुळातच इस्लाममध्येच स्त्रीशिक्षणाविषयी दोन मतप्रवाह दिसून येतात. त्यापैकी काही इस्लामिक तज्ज्ञांच्या मते, कुराण अथवा हदिसमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, असे कुठेही नमूद नाही, तर दुसरीकडे इस्लामच महिलांना शिकण्या-सवरण्याची परवानगी नाकारतो, असे मानणाराही मोठा वर्ग. तालिबानच्याच बाबतीत सांगायचे, तर देवबंदी, कट्टर सुन्नी-वहाबी विचारधारेचा अवलंब करणार्‍या अफगाणिस्तानच्या शासकांना महिलांचे शिक्षणच मुळी मान्य नाही.

आताच नव्हे, तर अगदी पूर्वीपासूनच. एवढेच नाही तर महिलांनी घराबाहेर पडणेही या कट्टरतावाद्यांना नामंजूर. म्हणजे, या महिलांची जागा घरात किंवा थेट कबरीत! इतकी महिलांना गुलाम म्हणून दुय्यम वागणूक देणारी, ही रानटी संस्कृती. त्यातच तालिबानवर देवबंदी विचारधारेबरोबरच पश्तुनी संस्कृतीचाही पगडा असल्यामुळे, ‘महिलांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य’ ही संकल्पनाच मुळी या धर्मांधांना पाश्चात्य वाटते. त्यातच ७०-८०च्या दशकात रशियाच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानमध्ये वाहिलेले पाश्चात्यीकरणाचे वारे तालिबानी अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे महिलांना शिक्षण दिले, तर त्या नोकरी मागतील, नोकरी मिळाली की पैसा त्यांच्या हाती खेळू लागेल. परिणामी, ‘चूल आणि मूल’ या त्यांच्यावर लादलेल्या कर्तव्याला त्या जुमानणार नाही, असे हे बुरसटलेले विचार. याच विचारांना धर्माची कोंदण देऊन, स्त्रीशिक्षणाला पद्धतशीरपणे तालिबानने तिलांजली दिलेली दिसते. आपण म्हणतो की, मुलगी शिकली प्रगती झाली; परंतु तालिबानच्या क्रूर राजवटीत मुलगी शिकूच शकत नाही, या नियमावर ते अजूनही ठाम आहेत.
 
पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी तालिबानी उच्चपदस्थांना स्त्रीशिक्षणावरून वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्न केला. एवढेच काय तर तालिबानी राजवटीला या एका कारणामुळे जागतिक मान्यताही मिळणेही दुरापास्त झाले आहे. पण, तरीही तालिबानच्या टोळ्यातील मुल्ला-मौलवी स्त्रीशिक्षणाबाबत आणि एकूणच महिलांच्या अधिकारांबाबत आपल्या जुनाट धोरणांना मुरड घालायला तयार नाहीत. अफगाणिस्तानमध्येही याविरोधात आंदोलने झाली, निषेध नोंदवले. पण, उपयोग शून्य! असो. एकूणच काय तर मुस्लीम ‘उम्मा’ला अफगाणी कन्यांची आणि एकूणच तेथील मुस्लीम लोकसंख्येच्या कल्याणाची सर्वार्थाने चिंता असती, तर सौदी, युएईनेही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती. पण, तसे झालेही नाही आणि तसे होण्याची भविष्यातही सूतराम शक्यता नाही. कारण, मुळात ‘उम्मा’ ही तोंडदेखली वैश्विक संकल्पना, इस्लामिक ऐक्य आणि कल्याण दोन्हीचा मेळ साधण्यात आजवर अपयशीच ठरली आहे. त्यामुळे आधीच मागास अफगाणिस्तान दिवसेंदिवस मध्ययुगाच्या अंधकारमय गर्तेत रूतत चालला आहे.


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121