सामान्य माणसाची सुख शोधण्याची पद्धत भौतिक म्हणजे प्रापंचिक अशाश्वत माध्यमावर अवलंबून असल्याने, त्यासंबंधी आल्हाददायक कल्पना करण्यात माणूस सुखाचा भास निर्माण करीत असतो. तो सुखाभास केवळ कल्पनाधिष्ठित असल्याने प्रत्यक्षात सुखानुभूतीची क्षमता त्याच्या ठिकाणी नसते. बरं ते सुख काही काळ प्रचितीस आले तरी ज्या माध्यमावर ते आधारित आहे, तेच मुळात अशाश्वत, फार काळ न टिकणारे असे असल्याने त्यापासून मिळणारे सुख अल्पजीवी असणार, हे उघड आहे.
सामान्य माणसाच्या मनाच्या अस्वस्थेची स्वामींना कल्पना असल्याने मागील १२७ व्या श्लोकात स्वामींनी भौतिक आलंबनावर सुख शोधण्यापेक्षा राम हे शाश्वत माध्यम निवडायला सांगितले आहे. रामकथा, रामगुणगान, रामनाम या रामसुखात मनातील तळमळ शांत करण्याचे सामर्थ्य असते. त्यातून मनाला स्थिरता लाभून सुखानुभव घेता येतो, असे स्वामींचे म्हणणे आहे. ही मनाची स्थिरता लाभण्यासाठी रामचरित्र, रामाचे गुण, रामकथा यांचा सतत अभ्यास करणे अगत्याचे आहे. रामनाम, रामकथा, रामगुणगान सतत करीत राहणे, हे दिसते तेवढे सोपे वाटत नाही. कारण, ही सर्व मनाची कामे आहेत आणि मन अत्यंत चंचल आहे. ते आता रामकथेचा विचार करेल, तर विचार करता करता मन केव्हा प्रपंचातील घटनांवर आपल्याला घेऊन जाईल, ते कळणारही नाही. त्या अस्थिर, चंचल अचपळ मनाला आवर घालून त्याला रामाच्या ठिकाणी, रामगुणांच्या ठिकाणी कसे खिळून ठेवायचे, यावर आता स्वामी उकल सांगत आहेत. तो पुढील श्लोक असा आहे.-
मना वासना वासुदेवी वसों दे।
मना कामना कामसंगी नसों दे।
मना कल्पना वाडगी ते न कीजे।
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥१२८॥
समर्थांनी ‘मन’ या विषयावर सखोल चिंतन केले असावे. मनाचा एकंदरीत स्वभाव कसा आहे, मनाच्या अंगी कशा प्रकारची शक्ती आहे, मनाच्या ठिकाणी कोणत्या उणिवा आहेत, मन कसे अस्थिर, चंचल, अति वेगवान आहे. वासना, कामना, इच्छा या प्रवृत्तींकडे असलेला मनाचा ओढा आणि मनाच्या इतर सवयी, या सार्यांची जाणीव समर्थांना असल्याने मनाला ओळखणारा समर्थांसारखा संत विरळाच म्हणावा लागेल. मनाला अनुकूल करून घेऊन आपल्या ध्येयासाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, याबाबत स्वामींचे विचार समजून घेतले पाहिजेत. एखादी वस्तुस्थिती मनाला सतत ऐकवत राहिले, तर मन तदाकार होऊन ते गुण किंवा अवगुण आत्मसात करते. मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीसच दुसर्या श्लोकापासून स्वामी ‘मना सज्जना’ असा उल्लेख करीत आले आहेत. तेच तुम्हालाप्रस्तुत १२८व्या श्लोकात दिसते की, स्वामी ‘मना सज्जना’ असे संबोधत आहेत. परिणामतः मन सज्जनाचे गुण आत्मसात करून, त्याप्रमाणे आचरण सुधारेल. आता हे मन मुळात कसे आहे, याचा शोध घेतला पाहिजे.
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंत ‘इन्द्रियाणां मनश्चास्मि’ म्हणजे ‘इंद्रियात मन मी आहे’ असे सांगतात. तरीही हे मन चंचल आणि अस्थिर आहे. ते बलवान असल्याने त्याला आवरणे हे महावाताला, वादळाला हाताने थोपवून धरण्याप्रमाणे अशक्य आहे, अशा आशयाचे निवेदन अर्जुन सहाव्या अध्यायात करतो. अर्जुनाचा हा विचार युक्तिवाद भगवंत मान्य करतात. भगवंत पुढे सांगतात, हे चंचल मन आवरायला दुःसाध्य आहे, कठीण आहे, पण अशक्य आहे असे नाही. अभ्यास आणि वैराग्य याने हे चंचल मन आवरता येते. स्वामी या अभ्यासाची वेगळी रीत वरील १२८ व्या श्लोकात सांगत आहेत.स्वामींच्या मते, वासना, कामना, इच्छा व कल्पना हा मनाचा स्थायीभाव आहे. त्यांच्यापासून सुटायचे असेल, तर त्यांना भगवंताकडे वळवावे. वासना म्हणजे मनाचा कल अथवा मनाची प्रवृत्ती. ती चांगल्याकडे जाईल किंवा वाईटाकडे जाईल. वासना नष्ट होत नाही. मग वासना करायचीच तर ती वासुदेवाची, भगवंताची करावी. वासनेला भगवंताकडे वळवली की ती दुसर्या गोष्टींचा विचार करणार नाही. स्वामी सांगतात की, हे मना, वासनेला वासुदेवाच्या ठिकाणी ठेवून दे.
वासुदेव हीच मनाची प्रवृत्ती (वासना) होऊ दे. या पुढील ओळीत स्वामी कामनेबद्दल बोलत आहेत. कामना म्हणजे इच्छा, मनाचा कल, काय हवे नको, या प्रकारची वासना. स्वामी येथे मनाला सांगत आहेत की, कामासंबंधी कामना तू ठेवू नको. म्हणजे, कामवासना तृप्त करण्यासाठी काय वाटेल ते करण्याची इच्छा तू बाळगू नको. कारण, कामवासना माणसाला बेचैन करते. वासना तृप्तीसाठी ती काहीतरी कर्म करायला भाग पाडते. कर्म प्रत्येक वेळी अनुकूल असेलच, असे नाही. कर्म प्रतिकूल घडल्यास अस्वस्थता वाढते, यासाठी कामसंगी इच्छा, कामना न ठेवता जे दैववशात मिळेल, त्यात आनंद मानावा. वस्तुतः धर्मानुकूल असलेला काम भगवंत मान्य करतात. धर्माला अर्थात शास्त्राला अनुकूल असणारा (अविरोधी) काम मी आहे, असे भगवंताचे वचन गीतेत आहे.
धर्माविरूद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ (७.११)
शुद्ध काम ही मनाची प्रवृत्ती असली तरी शास्त्राविरूद्ध असलेली कामवासना तृप्त करण्याची कामना, हे मना, तू ठेवू नकोस.
मनाचे अनेक गुणदोष स्वामींनी मनाच्या श्लोकातून स्पष्ट केले आहेत. कल्पना करणे हा मनाचा एक गुणविशेष आहे. वासनातृप्तीसाठी मन अनेक तर्हेच्या कल्पना करीत असते. मन कधीही स्वस्थ बसत नाही. कल्पनेच्या महाजाळात ते सदैव अडकलेले असते. मागील श्लोक क्र. १०४ मध्ये स्वामींनी निरीक्षण नोंदवले आहे की, ‘मना कल्पना धीट सैराट धावे.’ न थांबता स्वैर कल्पना करीत राहाणे ही मनाची सवय आहे.या सर्वांतून सुटका हवी असेल, तर ‘मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे’ असा उपाय स्वामी सुचवतात. संतसंगतीत राहिले, तर कामना, वासना आवरायला शिकता येते. आपल्या वासना, कामना भगवंताच्या ठिकाणी कशा ठेवायच्या, याची युक्ती संत आपल्याला शिकवतात. स्वामी या ठिकाणी ‘वस्ती’ हा शब्दप्रयोग करतात. वस्ती म्हणजे हॉटेलात चार दिवस राहणे नव्हे. संतसहवासासाठी काही तास शिबिराला हजर राहून फायदा होत नाही. संत सहवास कायम असेल, तर त्याचे पडसाद उमटतील. म्हणून मनाने सज्जन विचारात कायम वास ठेवला पाहिजे. संत संगतीत मन दुर्गुण विसरून सज्जनाकडे त्याचा कल होऊ शकेल, असे स्वामींना वाटते. संत संगतीचे आणखी विवरण पुढील श्लोकात स्वामींनी केले आहे. (क्रमश:)