बारामती लोकसभेत नवा ट्विस्ट! विजय शिवतारेंनी घेतली पवारांच्या कट्टर विरोधकांची भेट
20-Mar-2024
Total Views | 119
पुणे : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत दोन्ही पवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला असताना आता काँग्रेस नेते अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. त्यांनी बुधवारी भोर येथे जाऊन त्यांची भेट घेतली असून बारामती लोकसभेबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे.
अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक असून त्यांच्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता विजय शिवतारेंनीही थोपटेंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
विजय शिवतारे म्हणाले की, "बारामतीत अनेक कुटुंब आहेत. मग पवारच का? अनंतराव थोपटे त्यावेळी मुख्यमंत्री झाले असते. पण शरद पवारांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता २५ वर्षांनंतर येऊन ते सांगणार की, मी तुमच्या पाठीशी आहे. याला काहीही अर्थ नाही."
तसेच यावेळी बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले की, "माझा शिवतारेंना आशीर्वाद आहे. शरद पवार हे शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. तेव्हा दिल्ली माझ्यासोबत होती. पण त्यावेळी माझा पराभव झाला. तो कसा झाला काय झाला हे सर्वांना माहित आहे. आता इथे शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांच्या पत्नी उभ्या आहेत. त्यानंतर आता शिवतारेदेखील उभे आहेत. मी कोणाला पाठींबा द्यायचा याबद्दल अजून अंतिम विचार केला नाही. शरद पवार मला फक्त भेटून गेले. तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या," असेही ते म्हणाले.