उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं दिला दणका! 'हा' नेता काँग्रेसमधून लढवणार निवडणूक
20-Mar-2024
Total Views | 298
सोलापूर : शिवसेनेचे नेते दिलीप माने हे उबाठा गटाची साथ सोडत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण काँग्रेसमध्ये परत यावं अशी कार्यकर्त्यांची ईच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
दिलीप माने यांनी याआधी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये जाण्याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मी काँग्रेसमध्ये यावं असं माझ्या कार्यकर्त्यांचं मत होतं. याबाबत एकट्याने निर्णय न घेता सगळ्यांचं मत घेण्यासाठी आज बैठक बोलवली होती. यात तुम्ही काँग्रेसमध्ये यावं असा सर्वांचा कल होता."
"सगळ्यांशी विचारविनिमय करुन उद्यापर्यंत यावर मी निर्णय घेणार आहे. मी लोकसभेच्या आधी काँग्रेसमध्ये यावं अशी लोकांची ईच्छा आहे. यासाठी मी पक्षाकडून कुठलाही शब्द मागितलेला नाही. आपण काम करत राहायचं पक्ष नक्कीच निर्णय घेतील," असेही ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशीही कार्यकर्त्यांची ईच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.