“हल्लीची तरुण पिढी नात्यात Convenience शोधते” – श्रेयस तळपदे

Total Views |
कोणत्याही नात्याकडे बघण्याचा पिढींचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. यावरच भाष्य करत आजच्या तरुण पिढीची नातेसंबंधाबद्दलची मतं श्रेयस तळपदेने मांडली.
 

shreyas 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : नात्याची परिभाषा काळाच्या ओघात नक्कीच बदलत जाते. आजच्या तरुण पिढीला कोणत्याही नात्यांबद्दल काय वाटतं यावर आपले मत मांडताना अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) म्हणाला की, “आजची पिढी नात्यात स्वत:चा फायदा आणि सोय बघते”. दरम्यान, नात्यांवर आधारित ‘ही अनोखी गाठ’ हा श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवळे ( Gauri Ingawale) यांचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अशा दोन व्यक्तींची लग्नगाठ बांधली गेली आहे ज्यांना कधी त्या नात्यात गुंतायचेच नव्हते. या चित्रपटाच्या निमित्तानेच ‘महाएमटीबी’शी बोलताना श्रेयसने नात्यांबद्दल भाष्य केले.
 
 
श्रेयस म्हणाला की, “आजची पिढी नात्यांना फार कन्विनियन्सने पाहते. या नात्यात माझा काही फायदा आहे का? किंवा मला या नात्यातून काय मिळणार आहे? या विचार आजची ठराविक पिढी करते. पण मी माझ्या भूतकाळात गेलो, तर आम्हाला असं सांगतिलं गेलं होतं, की जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा मनात घंटी वाजेल. पण आता असं काही होत नाही. उलट हा विचार केला जातो की ती व्यक्ती मला समजून घेईल का? माझी कामं होतील का? माझ्या करिअरसाठी किती फायदेशीर हे नातं ठरेल? या सगळ्याचा सारासार विचार आजची पिढी करते. जे आम्ही करत नव्हतो”, असे नात्यांबद्दलचे महत्व आणि आजच्या पिढीचे विचार बेधडकपणे श्रेयसने मांडले.
 
 
“आजच्या तरुण पिढीकडे मार्केटिंगचं...”, दोन पिढ्यांकडे पाहण्याचा श्रेयसचा नवा दृष्टीकोन
 
श्रेयस तळपदे याने त्याच्या अभिनयाच्या काळात डोकावून पाहात आजच्या पिढीशी स्वत:शी तुलना केली. तो म्हणाला की, “माझ्या आणि आजच्या तरुण पिढीत एक महत्वाचा फरक मला जाणवतो तो असा की, ते त्यांच्या कामाप्रती फार एकाग्र आहेत. आणि त्याचवेळी त्यांना मार्केंटिंगचं महत्व देखील माहित आहे. कारण आम्ही एकांकिका, नाटक, मालिका आणि मग चित्रपट असा प्रवास केला आहे. आम्हाला कायम एक गोष्ट आमच्या वरिष्ठांकडून सांगितली गेली होती ती म्हणजे चांगलं काम करा तर चांगल्या भूमिका पदरी पडतील. पण मार्केटिंगचं योग्य ज्ञान आजच्या आधुनिक काळात असणं देखील तितकंच महत्वाचं आहे,” असे म्हणत श्रेयसने आजच्या तरुण पिढीचे कौतुक देखील केले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.