एक राह तो वो होगी...

    02-Mar-2024
Total Views |
Gulzar

कवी गुलजार आणि गीतकार गुलजार हा त्यांच्या लेखनाच्या तुलनात्मक समीक्षेचा विषय असला तरी गीतकार गुलजार म्हणजे, अनेक माणसांना आनंद देणारा, जीवनातल्या कठीण काळात सोबत करणारा, शब्दांनी आशेचे किरण निर्माण करणारा राजहंस वाटतात, तर कवी गुलजार पर्यावरणापासून, लहान मुलांपर्यंत कवितेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसणारे शब्द आणि भाषेवर हुकूमत असलेले, स्वतःच्याच आवाजाने स्वतःच्या कवितेला वेगळं व्यक्तिमत्त्व देणारे वाटतात. म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ मिळणं, ही बाब गेली सहा-सात दशके किंवा त्याहून अधिक काळ अनेक माणसांना आनंद देण्यासाठी झटणार्‍या एका माणसाचा सन्मान वाटतो.

घराचं दार उघडल्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरणं चटदिशी अंगावर पडावीत, घरात त्यांचा कोवळा शिरकाव व्हावा, आपल्याला काही समजण्याच्या आत त्या सोनसळी किरणांनी उंबरठा उजळून जावा, दारातलं ऊन घरात यावं, तसे ’गुलजार’ आपल्या घरात आले. आपण आकाशवाणी, बॉलिवूड, रंगोली, अंताक्षरी, गाण्याचे रियालिटी शोज हे आणि असं बरंचसं काही पाहण्याचा नि ऐकण्याचा अवकाश गुलजारांच्या शब्द मोहिनीची प्रचिती आल्यावाचून अजिबात राहणार नाही. अशा काळातला आपला जन्म, जेव्हा रेडिओ म्हणजे सर्वस्व. अशा काळात आपल्या आई-वडिलांची झालेली जडणघडण. हे असं सगळं असलं तरी आपल्या मनात होणारी उलथापालथ, आपली घालमेल, आपल्या जीवाचं दुःख, आपल्या मनात दाटून आलेली माया, आपलं आयुष्यासोबतचं भांडण किंवा मानवी मनाला ज्या-ज्या म्हणून नानाविध व्याधी जडतात, मध्येच ते हरणाच्या चपळाईने आपल्या ताब्यातून निसटून जातं. हे सगळं ज्यांना चपखलपणे शब्दांत पकडता येतं, ते गुलजार आपल्याला भेटले कसे आणि कुठे, याचा शोध घ्यायचा ठरल्यावर काहीच धागेदोरे हाती येतात आणि प्रत्येकदा वाटतं, ’गुलजार’ तिथे होतेच. आपलीच वाट पाहत होते. गुलजार होते म्हणजे त्यांचे शब्द होते, कविता होती, त्यातले तरल अनुभव होते...

उर्दूवर हुकूमत असणारे, कवितेने ज्यांचा ताबा घेतला आहे, असे गुलजार टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर पहिल्यांदा मी पाहिले, ते बहुतेक कुठल्याशा पुरस्कार सोहळ्यात आणि तेव्हापासून ‘गुलजार’ या नावाभोवती जे काही म्हणून आहे, त्या सार्‍याकडे आपसूक ओढले गेले आणि ठायी-ठायी त्यांचे शब्द भेटत गेले. इतकंच काय, मला भेटलेल्या माणसांनीही मला मी काहीसुद्धा न बोलता, सांगता गुलजारांच्या शब्दांपाशी नेऊन सोडलं. यातले काही प्रसंग फार ठळक आहेत, डिप्लोमा फिल्मच्या पटकथेचे ‘नरेशन’ द्यायला म्हणून आयुष्यात पहिल्यांदा एका मिटिंगसाठी ‘स्टारबक्स’ला जाणंझालं होतं. मी तिथल्या वातावरणाने पार बुजून गेले होते. तसंच ‘नरेशन’ दिले आणि ते आवडले म्हणून मला ज्यांच्या सोबत मीटिंग होती, त्यांनी सरळ ‘क्रॉसवर्ड’ला नेलं. अर्थात, मी तेव्हा ‘क्रॉसवर्ड’ही पहिल्यांदाच पाहिले होते म्हणा. एकूणच गोंधळलेल्या अवस्थेत मी असताना, माझ्यासाठी ज्यांच्यासोबत मीटिंग होती, त्यांनी गुलजारांची ’टू’ ही पहिली इंग्रजी कादंबरी माझ्या हातावर भेट म्हणून ठेवली आणि पुन्हा एकदा ‘गुलजार रस्ता’ मला दाखवला गेला.


’एमए’ला असताना गुलजारांच्या शब्दयोजनेचे खाचखळगे माझ्या प्राध्यापकांनी नीटच समजावून सांगितले. माझ्या सहृद दाम्पत्याच्या मुलीचं नाव ’रावी’ का आहे, हे त्यांनी सांगितलं आणि पुन्हा एकदा ‘गुलजार कनेक्शन’ हायलाईट झालं. सोबतच पाण्याला कितीही अडवले, तरी ते आपली वाट काढतं, त्याप्रमाणे गुलजारांचं लिखाण वाचनात येत राहिलं. त्यांची कविता मला समृद्ध करत राहिली. माझ्यासारख्या अनेकांना आपल्या शब्दांनी समृद्ध करणार्‍या गुलजारांच्या आयुष्यात कवितेची नदी रवींद्रनाथ टागोरांमुळे आली. गुलजार खुद्द म्हणतात की, ”फार कमी वयात मी टागोर वाचले आणि तेव्हापासून माझ्या वाचन-लेखनाला खरी दिशा मिळाली. बंगाली भाषेच्या गोडीने मी मोहित झालो.” उर्दूवर कमालीची पकड असणारे गुलजार, जेव्हा विनम्रपणे रवींद्रनाथ आणि बंगाली भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, गीतकार शैलेंद्र यांच्या एका रचनेकडे निर्देश करत, माझ्या गुरूंनी गीतलेखनाच्या प्रवाहाकडे मला कसं वळवलं, याच्या आठवणी आजही सांगतात, तेव्हा कवी आणि माणूस म्हणून मोठे ठरतात.

मोठेपणाची भिंत स्वतःभोवती बांधून न घेता, आपल्या कवितेतून सातत्याने काही तरी तडीस नेण्याचा विश्व, ब्रह्मांड, मानवी मन या सगळ्यांची खोली तपासत राहण्याचा प्रयत्न गुलजारांच्या लिखाणात सातत्याने येत राहतो. ’च्या पलीकडे’ जाण्याची ही आस त्यांच्या कवितेत नानाविध शक्यतांना जागा निर्माण करून देते. ते देवाला व या विश्वाच्या निर्मात्यालाही, निर्मात्यापलीकडे तो कोण आहे, हे विचारत राहतात, त्याच्याशी भांडतात आणि त्याच्याही देवत्वापलीकडे पाहताना ते लिहितात की,


तुम को फलक से आते भी देखा था मैने
आसपास के सैयारोपर धुल उडाते
कुद-फलांग के दुसरी दुनियाओ की गर्दीश
तोड-ताड के गॅलॅक्सिज के मेवर
जब भी जमीपर आते हो
भौचाल चालते हो और समदंर खौलाते हो
बडे इरॉटीक लगते हो
कायनात में कैसे लोगो की सोहबत में रहते हो तुम?

एकीकडे या एकाच कवितेत ते देवाचं अस्तित्व पूर्णपणे मान्य करतात, त्याला जिथे-जिथे पाहिलंय त्याचं वर्णन करतातच; पण तो हे सगळं करतो म्हणून भारी, ग्रेट वगैरे आहे असं म्हणून ते थांबत नाहीत. ते देवाच्या, खुदाच्या, त्यांच्याच शब्दात लिहायचं तर ‘बडे मिया’च्या देवत्वापलीकडे जातात आणि आपल्या वेगळ्या शैलीत मिश्कीलपणे प्रश्नही विचारात, ’बडे इरॉटीक लगते हो, कायनात में कैसे लोगो की सोहबत में रहते हो तुम?’ यात किती सहज ते देवालाही उघडपणे रिलेशनशिप किंवा प्रेमसंबंंधांविषयी विचारतात. ही सहजता म्हणा किंवा प्रेमाचा सर्वकालीन सर्वत्र असलेला वावर मान्य असल्याची कबुली म्हणा, त्यांच्या कवितेत आवर्जून डोकावत राहते.कथा, नाटक आणि सिनेमा यात पात्र असतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण, गुलजारांच्या कविततेही पात्र असतात. म्हणजे त्यांच्या कवितेत एक ‘हिरो एलिमेंट’ आवर्जून येत राहतो, ते कवितेतून त्या हिरो असलेल्या पात्राची अभिव्यक्ती आपल्यासमोर उभी करतात. मग ती वरच्या कवितेत ‘तुम को फलक से आते भी देखा था मैने’ म्हणत असताना, त्यांनी ते स्वतः आणि देव अशी केलेली पात्रयोजना असू दे की, वा त्यांच्या ’सितंबर’ या कवितेतल्या-

कई दिन खांसता हैं आसमां और लाल
काली आंधी चलती हैं
बहुत बीमार रहता हैं सितंबर के दिनों में आसमा मेरा!

या ओळी असू देत, यात माणसासारखं ऋतुमान बदलामुळे महिन्यांना येणारं आजारपण ते आकाशाला लागू करतात. हे त्यांच्या कवितेचे केवढं मोठं वेगळेपण आहे. खरंतर कवितेत प्रतिमा, उपमा हे सगळेच योजतात. पण, गुलजार लिहितात, तेव्हा जे लिहितील त्यात प्राण फुंकत जातात.भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून ते आज 2024 पर्यंत अखंड लिहिणार्‍या गुलजारांच्या कविता काळाच्या बंधनात अडकून पडत नाहीत. मागच्या, पुढच्या, आजच्या, उद्याच्या असं काही एक त्यांनी लिहिलेल्या गाण्यांना आणि कवितेला लागू पडत नाही. त्या आवडणार्‍यांच्यात लिंग, भेद, वर्ण, वय यातलं काहीच आडवं येत नाही. गुलजार शब्दांच्या मदतीने काळ चिमटीत मात्र पकडून ठेवतात. कदाचित म्हणूनच ‘रिलिव्हंट’ वाटत राहतात. ‘कोविड’ काळाची नोंद घेताना, तर ते एके ठिकाणी चक्क ’बादलो का मास्क’ अशी उपमा चंद्राच्या ढगाआड जाण्याला देतात. फार बारकाईने या सगळ्याकडे पाहिलं की जाणवतं, गुलजार हे करू शकतात. कारण, ते कवितेतून कवितेविषयी लिहितात. बोलताना भरभरून त्याचविषयी बोलतात. वेदना आणि कविता या दोहोंना अनेकदा समानार्थाने वागवतात. कवितेला उद्देशून असणार्‍या त्यांच्या अनेक कविता आहेत त्यातल्या,

खून निकले तो जख्म लगती हैं,
वरना हर छोट नज्म होती हैं!

या दोन ओळी मला विशेष वाटतात, ज्या दुःखाविषयी, वेदनेविषयी आहेत आणि ओघाने कवितेेविषयीसुद्धा...गुलजार प्रेमाविषयी लिहितात, तेव्हा सातत्याने जन्म- मृत्यूचं चक्र पूर्ण करण्यासाठी झटत असल्यासारखे सुद्धा भासतात. त्यांच्या काही कवितांमधल्या ओळी एकमेकांच्या बाजूला ठेऊन पाहिल्या तर माया, ममता, प्रेम, वात्सल्य या सगळ्या भावना चक्राकार गतीने तिथे वास करतात असं वाटत राहतं. उदाहरणार्थ, ‘न जाने क्या हैं की उसकी आखोका रंग तमु पर चला गया हैं!’ ही ओळ असू दे किंवा

लबों से चूम लो आँखो से थाम लो मुझ को
तुम्हारी कोख से जन्मूँ तो फिर पनाह मिले!

या ओळी. ते एकाच व्यक्तीच्या प्रेमाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी जन्म-मृत्यूच्या चक्राचा आधार घेतात. प्रेमाला आधी सहवासाच्या, मग प्रणयाच्या पार नेतात आणि मग तर प्रेमालाही प्रेमापलीकडे नेत, प्रेमभावनेला हळूच मायेच्या पदराचं तलम अस्तर लावतात. पण, प्रेमाला कधीच हतबलतेच्या कुबड्या देत नाहीत. प्रेमाला कायमच प्रगती आणि आशेचे पंख देत राहतात.या सार्‍याच अनुषंगाने मला ‘ये सोच के बैठी हूँ, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुँचती हैं...’ या ओळी अत्याधिक आवडतात. एप्रिल-मेदरम्यान तर चक्क या ओळी समजावू सांगणारे गुलजार स्वप्नात भेटले. स्वप्नं काहीसं असं होतं की, एम. ए. मराठीच्या तासाला एकदा नितीन आरेकर सरांनी गुलजारांना बोलावलं आहे. आम्ही ‘इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते’ गाण्याविषयी तासाला चर्चा करतोय आणि त्यानंतर मी त्यांना म्हटले की, कविता जर आयुष्याचा इतका मोठा भाग असते, तर ती मध्येच आपल्याला सोडून जाऊ कशी शकते? अ‍ॅण्ड सो ऑन... मग त्यांनी मला विचारलं की, शेवटचं काय सूचलेलं तुला. तेव्हा मी म्हणाले- खारीच्या पाठीवर उमटलेली रामाची बोटं तशी माझ्या दंडावर उमटलेली तुझी बोटं आणि सांगितलं की यानंतर काहीच सूचलेलं नाही. मग यावर त्यांनी उत्तर दिलं, “तुम कविता को खुद से अलग नहीं कर सकती. अलग करोगी तो अपाहीज हो जाओगी. परीक्षा हर कोई लेता हैं. शायद ये परीक्षा चल रही हैं।” आणि मग आम्ही ‘ये सोच के बैठी हूं एक राह तो वो होगी तुम तक जो पुहचती हैं’ या ओळीशी येऊन थांबलो.

प्रेमातला आशावाद जागवताना, वेदनेचा स्वीकार करायला हवा, हे सांगत असताना अनेक माणसांपर्यंत पोहोचणारं गीत लेखनाचं माध्यम निवडतात. गीत लेखनासाठी शब्द योजताना गीतकार गुलजार हे कवी गुलजार यांना कदाचित ’जो कायम हैं वो में हू, मैं जो पलपल बदलता रहता हू’ असं काहीसं म्हणत असणार, हे मला आपलं उगाच वाटत राहतं. कवी गुलजार आणि गीतकार गुलजार हा त्यांच्या लेखनाच्या तुलनात्मक समीक्षेचा विषय असला तरी गीतकार गुलजार म्हणजे, अनेक माणसांना आनंद देणारा, जीवनातल्या कठीण काळात सोबत करणारा, शब्दांनी आशेचे किरण निर्माण करणारा राजहंस वाटतात, तर कवी गुलजार पर्यावरणापासून, लहान मुलांपर्यंत कवितेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसणारे शब्द आणि भाषेवर हुकूमत असलेले, स्वतःच्याच आवाजाने स्वतःच्या कवितेला वेगळं व्यक्तिमत्त्व देणारे वाटतात. म्हणूनच त्यांना ज्ञानपीठ मिळणं, ही बाब गेली सहा-सात दशके किंवा त्याहून अधिक काळ अनेक माणसांना आनंद देण्यासाठी झटणार्‍या एका माणसाचा सन्मान वाटतो.अजूनही मला अनेक वाटांनी, अनेक माणसांमार्फत, अनेक कवितांमधून, अनेकांना आनंद देणार्‍या गुलजारांना भेटत राहायचंय, आयुष्य ‘गुलजार’ करणारी माझी कवितेचीही वाट शोधत राहायची आहे आणि ती मिळत नाही, तोवर आणि त्यानंतरही ’एक राह तो वो होगी तुम तक जो पहुचती हैं’ या गुलजारांच्या ओळी हट्टाने सोबत ठेवायच्या आहेत.
 
-विशाखा विश्वनाथ
(लेखिका युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 विजेती आहे.)



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121