मुंबई: ‘टेंपल इकोनॉमी’ मजबूत करण्यासाठी धर्माच्या अर्थव्यवस्थेचा विजय करणे व अधर्माची व्यवस्था पराभूत करणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी केले. ते शनिवारी सकाळी बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज सभागृहात ’टेंपल इकोनॉमी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.
दि. 13 ते 15 डिसेंबर 2024 रोजी ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’तर्फे अर्थतज्ज्ञ, हिंदू जागृतीचे सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक आदी औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांना एका मंचावर आणण्यासाठी, जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राची पार्श्वभूमी विशद करण्यासाठीच शनिवार, दि. 2 मार्च रोजी ‘टेंपल इकोनॉमी’ या विषयावर उपाध्याय यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
मंदिरांकडे मुख्यत्वे अध्यात्मिक व सांस्कृतिक स्तंभ या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पण, या मंदिरांभोवती प्रचंड मोठी अर्थव्यवस्था केंद्रीत आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’नंतर आता ‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’चेही प्रचार-प्रसाराचे काम वेगाने सुरू आहे. यावेळी ‘टेंमल इकोनॉमी’ अर्थात मंदिर अर्थव्यवस्थेविषयी बोलताना अश्विनी उपाध्याय म्हणाले की, “भारतातील अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी मंदिर व हिंदू अर्थव्यवस्थेवर लक्ष दिल्यास दुसरे विशेष करण्याची काहीच गरज भासणार नाही. म्हणून भारतातील अर्थव्यवस्थेचा डंका जगभरात वाजवण्यासाठी हिंदू धर्म पुन्हा सांस्कृतिक व आर्थिक पातळीवर सक्षम करणे महत्त्वाचे आहे,”असे ते म्हणाले.
याविषयावर अधिक प्रकाश टाकताना उपाध्याय म्हणाले की, “शेकडो वर्षं भारतातील धर्मसत्ता मंदिरांच्या आवारात जरी असली, तरी बहुतांश मंदिर संस्थानांचे उत्पन्न हे सरकारच्या ताब्यात आहे.” याविषयीची अधिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना उपाध्याय यांनी काँग्रेसलाही टोला लगावला. ते म्हणाले की, “भारताच्या राजकीय इतिहासात पिता आणि कन्येच्या जोडीने संविधानात ढवळाढवळ करीत ’सेक्युलर’ शब्द वापरला व ’अल्पसंख्याक’ दर्जाच्या अंतर्गत लांगूलचालनाचेच धोरण राबविले. एकीकडे मंदिरांच्या उत्पन्नावर सरकारी कब्जा करण्याचे धोरण अवलंबिले, तर अन्य धर्मियांच्या धर्मस्थळांना मात्र खुली सूट देऊन, त्यांचे आर्थिक लांगुलचालन करण्यात आले.”
मंदिरांवरील सरकारी नियंत्रण लक्षात घेता, उपाध्याय यांनी यावेळी गरजूंना मदतीचा मार्गही सूचविला. ते म्हणाले की, “अडल्यानडलेल्यांना रोजगारासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करून किंवा त्यांना व्यवसायासाठी, अन्नछत्रासाठी मदत करून पर्यायी ’सधर्म अर्थव्यवस्था’ उभी करणे आजच्या काळात आवश्यक आहे.”
मंदिराचा विकास आणि पर्यटन याविषयी देखील उपाध्याय यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “भारतातील बहुतांश धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण करून तिथे जागतिक सुविधा निर्माण केल्या पाहिजे. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी मंदिर क्षेत्रातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविल्यास पर्यटन क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल,” असा विश्वासही यावेळी बोलताना उपाध्याय यांनी व्यक्त केला.
समान नागरी संहितेबरोबरच भारतीय प्रशासकीय व्यवस्था, कर यंत्रणा, पोलीस संहिता अशा अनेक व्यवस्थांमध्ये बदल करण्याबाबतही उपाध्याय यांनी विस्तृत विवेचन केले. भविष्यातील अशाप्रकारच्या मूलभूत सुधारणांविषयीची माहिती प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचयातील किमान दहा जणांना द्यायला हवी. कारण, हे बदल करायचे असल्यास मोदी सरकारला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे लागेल,” असे ते म्हणाले.
तसेच उपाध्याय यांनी भाषणाचा समारोप करताना, मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास अमृतकाळातील विकासाचा वेग वाढीस येईल, असे सांगत ‘अबकी बार 400 पार’चा नाराही दिला. यावेळी उपस्थितांना ‘हिंदू इकोनॉमिक फोरम’च्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले.