“आम्ही राजकारणातले कंत्राटी कामगार, चांगलं काम केलं तरच...”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
02-Mar-2024
Total Views | 74
पुणे : आम्ही राजकारणातले कंत्राटी कामगार, चांगलं काम केलं तरच लोकं आम्हाला पुन्हा संधी देतात. नाहीतर घरी बसवतात, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शनिवारी बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरंतर आम्ही राजकारणात काम करणारे लोकं म्हणजे कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर पाच वर्षांनी आपल्या कंत्राटाचे नूतनीकरण करावे लागते. चांगलं काम केलं तरच लोकं आम्हाला पुन्हा संधी देतात, नाही केलं तर लोकं आम्हाला घरी बसवतात. पण याठिकाणी जो रोजगार आम्ही देणार आहोत त्यात चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर तुमची प्रगतीच होणार आहे.”
पुढे ते म्हणाले की, “नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना बोलवून तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम आहे. नागपूरला झालेल्या पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ११ हजार लोकांना रोजगार मिळाला. ५० लाखापर्यंतचे पॅकेज त्यांना मिळाले. १० वी १२ वी पर्यंत शिकलेल्या तरुणांनाही रोजगाराची संधी मिळाली. त्यातूनच संपुर्ण महाराष्ट्रातच हे मेळावे करण्याबाबत निर्णय झाला.”
“आज पश्चिम महाराष्ट्रात हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून अजितदादांनी यासाठी खूप मेहनत केली आहे. यावेळी पहिल्यांदाच ५५ हजार पदे आहेत पण केवळ ३६ हजार अर्ज आले आहेत. इथे येणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या अभ्यासाप्रमाणे रोजगार मिळेल, अशी मला आशा आहे,” असेही ते म्हणाले.