ऐन तारुण्यात संधिवातासारख्या दुर्धर आजाराचे निदान झाले तरी न खचता, स्वतःच्या हिमतीवर ‘मोत्यांची शेती’ करणार्या पूजा भानुशाली यांची ही यशोगाथा...
पूजा भानुशाली यांचा जन्म १९८० साली गुजरातमधील कच्छ येथे झाला. त्यांचे वडील ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) मध्ये ’प्रोडक्शन मॅनेजर’ या पदावर कार्यरत होते. पुढे ते गुजरातमधून मुंबईला स्थायिक झाले. पूजा यांनी २००१ साली ’बीबीए’चे शिक्षण पूर्ण केले व लागलीच २००२ साली त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर पूजा यांनी काही काळ परदेशात देखील एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांना अगदी तरूण वयात संधिवाताचे निदान झाले. आता आयुष्यात पुढे कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. नोकरीसह त्यांनी काही काळ कपड्यांचा व्यवसायदेखील केला. परंतु, संधिवातामुळे त्यांना शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, प्रकृती साथ देत नव्हती. यामुळे त्यांना नैराश्याने ग्रासले होते.वर्तमानासह भविष्यही त्यांनी अंधकारमय दिसू लागले. पण, पूजा अजिबात डगमगल्या नाहीत. ‘बीबीए’ शिकलेल्या पूजाताई शिक्षणातून काही मिळते का, ते पाहत होत्या. प्रत्येक प्रश्न उत्तर घेऊनच जन्माला येतो, असे म्हणतात. त्यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. उपचार घेत असलेल्या मुंबईतल्या डॉक्टरांनी पूजा यांना तुम्ही ’पर्ल फार्मिंग’ अर्थात ’मोत्यांची शेती’ करा, असा सल्ला दिला आणि यानिमित्ताने पूजा यांची २०१६ साली मोती शेतीशी पहिली भेट झाली. सुरुवातीला या गोष्टीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही.
मात्र, मनात कुठे तरी शेती करण्याचा विचार सुरू होता. पुढे त्यांनी डॉक्टरांकडून या मोती शेतीविषयी माहिती जाणून घेतली. सोबतच ही शेती करणारे लोक, त्यांचे प्रकल्प यांची प्रत्यक्ष भेट घेतली. आता त्यांनी ’पर्ल फार्मिंग’ करण्याचा विचार पक्का केला. मात्र, या शेतीचे संपूर्ण शास्त्रोक्त शिक्षणही घेतले पाहिजे, याची जाणीव झाल्यानंतर, सरकारी संस्थांमार्फत यांचे शिक्षण घेतले.प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर, मोती शेतीसाठी आवश्यक असलेले तळे आणि पाणी याचा शोध घेत-घेत, त्या नाशिकमध्ये आल्या. शहरालगत असलेल्या सिन्नरजवळ त्यांनी ही मोती शेती सुरू केली. ’कोरोना’च्या एक वर्षांपूर्वी त्यांनी मोतींच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला. पुढे ‘कोरोना’ पूर्णपणे हद्दपार झाल्यावर, त्यांनी स्वतःच्या गुंतवणुकीवर शेती यशस्वी करत ’मौक्षिका पर्ल फार्म’ ही स्वतःची कंपनी उभी केली. सुरुवातीला अनेक वेळा मुंबई-नाशिक असा प्रवास दुचाकीने केला. पुढे भाड्याने घर घेऊन, त्या नाशिकमध्ये राहू लागल्या. त्यानंतर मात्र त्यांनी २०२१ साली संपूर्ण बिर्हाड नाशिकला हलविले आणि त्या नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. पूजा यांचे पती किशोर हे सध्या नाशिकमधील एका खासगी कंपनीत कर सल्लागार आहेत, तर त्यांची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासात पतीची मोलाची साथ आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाल्याचे, त्या आवर्जून सांगतात.
मोती शेती हा मत्स्यपालनाचाच एक भाग असल्यासारखाच. मात्र, या व्यवसायात ’ऑयस्टर’चे पालन करावे लागते. ज्यातून महागडे असे मोती मिळतात. इतर शेतीप्रमाणे या शेतीमध्येही जोखीम आहे. मात्र, यात परतावा चांगला मिळतो. या शेतीसाठी पाणी आणि शिंपले हे मुख्य घटक. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्यात नक्कीच ही शेती उत्तम होते. साधारपणे १२ ते १८ महिन्यांत मोती तयार होतात. मोत्याला नेहमीच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलीच मागणी असते. दर्जानुसार एक मोती २५० रुपये ते १५ हजार रुपयांत विकला जातो. एजंटमार्फत हे मोती विकल्यास, एका मोत्यास २५० ते ५०० रूपये मिळू शकतात. मोत्यांची जागतिक स्तरावरील बाजारपेठ ही २० हजार कोटींची आहे. भारत दरवर्षी जवळपास ५० कोटी रुपयांचे मोती आयात करतो, तर निर्यात १०० कोटींहून अधिकची. आपल्या देशात मोती खरेदीचे व्यवहार मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सूरत या शहरात जास्त होतात. असे हे मोती शेतीचे एक नैसर्गिक उत्पादन.
“आयुष्यात काहीही करायचे असल्यास, तुमची इच्छाशक्ती दृढ असावी लागते. मला संधिवात असूनदेखील मी सतत नवीन काय करता येऊ शकते, याच्या शोधात असते. इच्छाशक्ती दृढ असल्यास, संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी घडवून आणत असते, यावर माझा खूप विश्वास आहे आणि यातूनच आपोआप पुढची दिशा मिळत जाते. सुरुवातीला माझ्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि या शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असलेले तळेदेखील नव्हते. मग यातून मार्ग काढत, मी तळे भाड्याने घेतले आणि शेती सुरू केली. आता मी हळूहळू स्वतःच्या मालकीचे तळे उभे केले आहे. सुरुवातीला लोक स्वतःची तब्येत सांभाळली जात नाही, व्यवसाय काय सांभाळणार, अशा शब्दात खच्चीकरण करत. परंतु, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करत, आपल्या स्वप्नांचा प्रामाणिकपणे पाठलाग करा, यश नक्की मिळते,” असा संदेश पूजा देतात. पूजा भानुशाली यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
-गौरव परदेशी