राहुल गांधी म्हणतात, "माझी हिंदू धर्मातील शक्तीविरोधात लढाई!" मोदींनी दिलं चोख उत्तर
18-Mar-2024
Total Views | 102
(Shivaji Park Sabha)
हैदराबाद : "एकीकडे शक्ती नष्ट करण्याविषयी बोलणारे लोक आहेत, तर दुसरीकडे शक्तीची पूजा करणारे लोक आहेत. शक्तीचा नाश कोण करू शकतो आणि शक्तीचा आशीर्वाद कोणाला मिळू शकतो याचा निर्णय ४ जून रोजी होणार आहे." असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील जगतियाल येथे जाहीर सभेला संबोधित करताना केले.
त्यांच्या या वक्तव्याचा रोख राहुल गांधींचा वक्तव्यावर होता. राहुल गांधींनी मुंबईतील इंडी आघाडीच्या सभेत "माझी लढाई हिंदू धर्मातील शक्तीविरुद्ध आहे." असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " त्यांचा लढा सत्तेसाठी आहे. माझ्यासाठी प्रत्येक आई, मुलगी, बहीण हे 'शक्ती'चे रूप आहे. मी त्यांची पूजा करतो. मी विरोधकांचे आव्हान स्वीकारतो. या शक्तींच्या रक्षणासाठी मी माझा जीव धोक्यात घालेन."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जगतियाल येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडी आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडी आघाडीचा पहिला मेळावा मुंबईत झाला आणि त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपला लढा शक्तीविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. माझ्यासाठी प्रत्येक मुलगी ही शक्तीचे रूप आहे आणि मी माझ्या माता-भगिनींच्या रक्षणासाठी माझा जीव धोक्यात घालेन."
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील जनता भाजपला पाठिंबा देईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीचा जगातील सर्वात मोठा उत्सव सुरू झाला असून 13 मे रोजी तेलंगणातील जनता नवा इतिहास रचणार आहे. तेलंगणात 13 मे रोजी होणारे मतदान 'विकसित भारत'साठी असेल आणि जेव्हा भारताचा विकास होईल तेव्हा तेलंगणाचाही विकास होईल."