नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
केंद्रीयनिवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सूचनेनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ‘आयसी४’ विंगने समाजमाध्यमांवरून खोटा, दिशाभूल करणारा मजकूर आणि बनावट संदेश काढून टाकण्यासाठी सायबर तज्ञांची एक विशेष टीम तयार केली आहे. फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही समाजमाध्यमावरकोणतीही धोकादायक सामग्री पोस्ट केल्यास ‘आयसी४’ समाजमाध्यमप्रदात्याला ती सामग्री काढून टाकण्यास सांगणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘आयसी४’ ला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या धर्तीवर असे अधिकार बहाल केले आहेत.याशिवाय ‘आयसी४’ने फेक न्यूज संदर्भात एक विशेष प्रणाली देखील विकसित केली आहे, ज्याद्वारे देशभरातील कोणत्याही पोलीस ज्यांच्या परिसरात व्हायरल सामग्री आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.