मुंबई : इंडी आघाडी न चालण्याचं कारण म्हणजे यात सगळेच इंजिन आहेत. यात बोगी नाहीये, असे विश्लेषण भाऊ तोरसेकरांनी केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्यं केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाऊ तोरसेकर यांनी इंडी आघाडीचं खूप छान विश्लेषण केलं आहे. ते म्हणाले की, इंडी आघाडी न चालण्याचं कारण म्हणजे यात सगळेच इंजिन आहेत. यात बोगी नाहीये. त्यामुळे लोकं बसणार कुठे? त्यामुळे इंडी आघाडी चालणार नाही असे भाऊ तोरसेकरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला यथार्थपणे दिसत आहे. यातील सगळे इंजिन आपापल्या दिशेने जात आहेत. पण मोदीजी मजबूत इंजिन आणि एवढी मोठी ट्रेन घेऊन निघाले की, ज्यांना ज्यांना बसायचं आहे त्यांना बसण्यासाठी जागा आहे."
"भाजपने अनेक वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम केलेलं आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांचं असणं महत्वाचं आहे. पण आजच्या विरोधकांमध्ये आणि आमच्यात फरक आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना भारत प्रथम ही नीती कधीही सोडली नाही. निवडून येण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड केली नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज सुप्रीम कोर्टाने विरोधकांच्या पक्षात निर्णय दिला तर ते चांगलं आहे आणि जर त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर ते सुप्रीम कोर्टालाही शिव्या देतात. ते निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग, लोकशाही या सगळ्यालाच शिव्याशाप देतात. आपण मोदीजींना हरवू शकत नाही असं जेव्हा काँग्रेसला वाटतं त्यावेळी ते संविधानविरोधी ताकदींची मदत घेतात. नंतर संविधान धोक्यात असल्याचा बाता करतात," असेही ते म्हणाले आहेत.