दोडामार्ग - तळकटमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन; पर्यावरणीय संवेदशनील क्षेत्राचा प्रश्न रखडलेला

    16-Mar-2024   
Total Views |
tiger dodamarg



मुंबई (अक्षय मांडवकर) -
दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले (tiger in dodamarg). या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे (tiger in dodamarg). दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे. असे असूनही तालुक्याचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्याचा प्रश्न अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे. (tiger in dodamarg)


दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.

दोडामार्ग तालुक्यात पट्टेरी वाघाचा अधिवास फार पूर्वीपासून आहे. हा परिसर सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गामधील महत्त्वाचा परिसर आहे. कारण, या परिसरातून वाघांच्या प्रजननाचे पुरावे मिळाले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने देखील दोडामार्ग तालुका महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत देखील दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटाचे पर्यावरणीय संवेदशनशील क्षेत्र अजून घोषित झालेले नाही. राज्य सरकार व वन विभाग या दृष्टीने गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाघ आणि इतर वन्यजीवांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग सुंरक्षित करण्याचे दृष्टीने राज्य सरकाराने तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे. मुंबईत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या यासंदर्भातील याचिकेवर वन विभागाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.