"इस्लामफोबियाच का? हिंदूफोबिया, बौद्धफोबियावर पण बोला"
संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानने आणलेल्या प्रस्तावावर भारताची भूमिका
16-Mar-2024
Total Views | 304
वॉशिंग्टन डी.सी : भारताने संयुक्त राष्ट्र (UN) महासभेच्या ७८ व्या अधिवेशनात पाकिस्तानने आणलेल्या प्रस्तावावर मतदान करण्यास नकार दिला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात 'इस्लामफोबियाशी लढण्यासाठी उपाययोजना' हा प्रस्ताव पाकिस्तानने आणला होता. या प्रस्तावावर बोलताना भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी आपली भूमिका मांडली.
PR delivers the explanation of India's position during the adoption of the resolution on 'Measures to combat Islamophobia' at the United Nations General Assembly today. pic.twitter.com/AheU8UvpYM
पाकिस्तानच्या प्रस्तावावर बोलताना रुचिरा कंबोज म्हणाल्या की, " एखाद्याच्या धर्माशी किंवा विश्वासाशी संबंधित भीती केवळ इस्लामशी संबंधित नाही, तर इतर धर्माच्या लोकांनाही याचा त्रास होत आहे. फोबिया इस्लामिक असो किंवा हिंदू, ख्रिश्चन किंवा बौद्ध, आम्ही सर्वांचा निषेध करतो. केवळ इस्लामोफोबियाबद्दल बोलणे योग्य नाही, आपण सर्व प्रकारच्या धार्मिक भीती ओळखल्या पाहिजेत." असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना रुचिरा कंबोज म्हणाल्या की, "भारत सर्व प्रकारच्या धार्मिक द्वेषाच्या विरोधात उभा आहे, मग ख्रिश्चनविरोधी असो किंवा इस्लामोफोबिया असो, जसे आपण सर्व हिंदूविरोधी, बौद्धविरोधी आणि शीखविरोधी भावनांच्या विरोधात उभे आहोत." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "आज आपल्या जगात, आपण वाढत्या भौगोलिक-राजकीय तणाव आणि असमान विकासाचा सामना करत आहोत, परिणामी असहिष्णुता, भेदभाव आणि धर्मावर आधारित भेदभाव वाढला आहे. चिंताजनक वाढ झाली आहे."
आपल्या वक्तव्यात कंबोज यांनी भारताच्या विविध धर्माचा स्विकार करणाऱ्या समृद्ध इतिहासाची आठवण जगाला करुन दिली. त्या म्हणाल्या की, "विविध धर्मांचा स्वीकार करणारे बहुलवादी आणि लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचा समृद्ध इतिहास दीर्घकाळापासून छळ सहन करणाऱ्या लोकांसाठी आश्रयस्थान बनला आहे. पारशी असोत, बौद्ध असोत, ज्यू असोत किंवा इतर कोणत्याही धर्माचे असोत भारतात सर्वांना भेदभावमुक्त वातावरण मिळाले आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या अधिवेशनामध्ये 'इस्लामफोबियाशी लढण्यासाठी उपाय' या विषयावर ठराव मंजूर करण्यात आला, ११५ देशांनी बाजूने मतदान केले, विरोधात कोणीही नाही आणि ४४ देशांनी गैरहजर राहिले. ज्यात भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांचा समावेश आहे.