नुकताच ’ब्राह्मोस एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’ या अभय सदावर्ते यांच्या अनुवादित पुस्तकाला ’साहित्य अकादमी’चा २०२३ सालचा ’उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार’ जाहीर झाला. मराठी भाषेसाठी मिळालेला हा पुरस्कार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
सर्वप्रथम ’साहित्य अकादमी‘चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन. पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या काय भावना होत्या?
पुरस्कार प्राप्त झाला, तेव्हा आनंदच झाला. कारण, पुरस्कार जाहीर होणं, आनंदाचीच गोष्ट असते. पण, तरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो. माझ्या अनुवादित पुस्तकाला पुरस्कार जाहीर होईपर्यंत मला याबाबत माहिती नव्हते. प्रेस नोट आल्यानंतर, माझे नाव जाहीर झाल्याचे, माझ्या अनुवादित पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाल्याचे मला समजले. त्यासाठी मी कुठे सही केली नव्हती की, कशासाठी अर्जही केला नव्हता.
हे पुस्तक तुम्ही केव्हा वाचले आणि हे मूळ पुस्तक वाचताना असं काय सापडलं की, तुम्हाला ते अनुवादित करावेसे वाटले? या अनुवाद प्रवासाची थोडक्यात गोष्ट जाणून घ्यायला आवडेल.
माझं सारं बालपण सावरकरांच्या जन्मस्थानी गेलं. त्यामुळे मनावर त्यांचे संस्कार होतेच. क्रांतिकारक विचार बालपणापासूनच जोपासत आलो होतो. तेव्हापासूनच मला शस्त्रास्त्रांची आवड होती. भगूरला सावरकरांचा वाडा आहे, त्याच परिसरात माझे आयुष्य आकाराला आले. ’ब्राह्मोस’बद्दल बातम्यांमधून, टीव्हीवरून खूप ऐकलं होतं. हे जगापेक्षा काही वेगळं आहे, असं जाणवलं. त्याबद्दल उत्सुकता मला साहजिकच होती. यावर एक पुस्तक आल्याचं कळलं आणि मग मी ते वाचलं. त्यानंतर त्याचा अनुवाद करावासा वाटला. त्यामुळे एवढं नाव होईल, याची कल्पना नव्हती.
अनुवाद म्हणजे फक्त भाषांतर नव्हे. आपण एका भाषेतून केवळ दुसर्या भाषेत आशयाची मांडणी करत नाही, तर तो भावानुवाद असतो. तेव्हा मला विचारायला आवडेल की, अनुवाद करताना कोणत्या अडचणी येतात?
कोणत्याही कामासमोर अडचणी या असतातच. अनेक आव्हाने येतात. अनुवाद म्हणजे काय, आपण स्वतंत्रपणे काही लिहीत नसतो. हा असा रस्ता आहे, जो कुणीतरी आखून दिलेला आहे. त्या ठरवून दिलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करायचे आहे, हेच सर्वात जास्त आव्हानात्मक असते. तुम्हाला तुमच्या मनातून आलेल्या गोष्टी लिहायच्या नसतात, तर इतर कुणी मांडलेल्या, सांगितलेल्या त्यांच्याच लेखनशैलीचा बाज राखून पुन्हा मांडायच्या असतात. केवळ भाषा वेगळी. स्वतःचं मत त्यात जराही येणार नाही, याची काळजी घेताना, मूळ लेखकाला काय सांगायचंय, हे सर्वप्रथम आपण समजून घेऊन, या नंतर दुसर्या भाषेतून आंजारून सांगायचं असतं. हे आपण सहज कागदावर उतरवू शकत नाही. हे फार कठीण आहे. मी सर्वात पहिले अब्दुल कलाम यांचे पुस्तक अनुवादित केले होते. त्या पुस्तकाचं नाव होत-’इंडिया 2020’ मी सहज म्हणून ते पुस्तक वाचले. मला वाचनाची आवड आहे. घरात वाचनाचे संस्कार झाल्यामुळे, लहानपणीपासूनच मी उत्तम पुस्तके जमवून वाचली आहेत. मला माझ्या एका स्नेहींनी या पुस्तकाबद्दकल सांगितलं होतं. वाचल्यावर एकदा चर्चा करताना पुन्हा म्हणाले, “तुझं मराठी इतकं उत्कृष्ट आहे. तसेच तुझं मराठी वाचन स्वच्छ आहे, तर तू याचा अनुवाद करावा, अशी इच्छा आहे.” मग ते पुस्तक ठेवून गेले आणि त्यानंतर त्याचं पहिलं अनुवादित पुस्तक झालं.
मूळ भाषेतील पुस्तकांइतकीच अनुवादित पुस्तक का महत्त्वाची आहेत?
पहिली गोष्ट म्हणजे, प्रत्येकाला इंग्रजी येते आणि त्याला सर्व भाषेत वाचता येते असे नाही. म्हणजे काहींना इंग्रजी भाषा येतेही. परंतु, प्रथम भाषा मराठी असेल किंवा अन्य कोणतीही, तर वाचन मुख्यत्वे आपल्या मातृभाषेतून केले जाते. काही पुस्तके लोकप्रिय होतात, अभिजात भाषेत असतात; पण मला भाषा येत नाही, म्हणून माझी अडचण व्हायला नको, तेव्हा अनुवाद प्रकार महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. अनुवाद नसल्याने, माझ्या ज्ञानार्जनावर मर्यादा येतायत का? खरं तर महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला ज्या भाषेत समजेल, त्या भाषेत ज्ञान मिळणे महत्त्वाचे. त्यानंतर प्रत्येकालाच उत्तम इंग्रजी यावे, असा आग्रहसुद्धा नसावा. वाचन पुढेही होत राहणार आहे, तेव्हा अनुवादित पुस्तकांना मोठा ‘स्कोप’ आहे, असं मला वाटतं.