गांधीनगर : गुजरातमधील वडोदरामधील अजवा रोडवर असलेल्या एकतानगरमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली म्हणून कट्टरपंथी जमावाने विरोध केला. त्यानंतर मंदिर परिसरात दगडफेक केली. या दगडफेकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च रोजी अजवा रोडवरील एकतानगरमध्ये असलेल्या मंदिरात नेहमीप्रमाणे लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण सुरु होती. पंरतु कट्टरपंथी जमावाने त्यावर आक्षेप घेतला आणि नंतर दगडफेक सुरु झाली. यावेळी २५ ते ३० लोक तिथे जमा झाली. त्यामुळे स्थानिक हिंदूंनी, कट्टरपंथी जमावाने हनुमान चालीसा बंद करण्यासाठी हा गोंधळ घातल्याचं म्हणटले आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, हा गोंधळ लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्यासाठी होता.
एका वृत्तसंस्थेने सांगितले की, सुरुवातीला मंदिरात हरीश सरनिया आणि दीपक सरनिया नावाचे दोन तरुण उपस्थित होते. प्रथम राहिल शेख आणि इतर कट्टरपंथी त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर हाणामारी झाली आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली. यादरम्यान कट्टरपंथी जमावाने मंदिरात गोंधळ घातला आणि तेथे लावलेले लाऊडस्पीकरही तोडले. या मारामारीत दीपक, हरीश आणि राहिल जखमी झाले आणि त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता.
दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत बापोद पोलीस ठाण्यात एकूण ७ तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहिल शेख, आसिफ शेख, सेजन अन्सारी, हुसेन लतीफ, दीपक आणि हरीश सरनिया अशी आरोपींची नावे आहेत.या घटनेबाबत वडोदराचे सह पोलिस आयुक्त मनोज निनामा म्हणाले, “एकता नगर हा हिंदू-मुस्लिम लोकवस्तीचा परिसर आहे. येथे आधी लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद झाला आणि नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. याबाबत बापोद पोलिस ठाण्यात कारवाई सुरू आहे. तिन्ही जखमींवर उपचार सुरू असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत नसून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. जखमींमध्ये २ हिंदू आणि १ मुस्लिम आहे. परिसरात आता शांतता आहे.”दरम्यान मंदिर परिसरातील व्हिडिओ फुटेज, साक्षीदार आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.