"उद्धवजी, कोकणी माणूस तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही!"
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा टोला
14-Mar-2024
Total Views | 157
मुंबई : तुमच्या भूलथापांना कोकणी माणूस बळी पडणार नाही, असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी कोकण दौऱ्यावर असून गुहागर आणि दापोली इथे त्यांची सभा होणार आहे. यावर आता चित्रा वाघ यांनी टीका केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी कोकणाने अस्मानी संकटाचा कहर अनुभवला होता. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदावर असताना कोकण दौऱ्याच्या नावाखाली चिपी विमानतळावरच अधिकाऱ्यांना बोलावून दौऱ्याचे तोंडदेखले सोपस्कार पूर्ण केले होते."
"वादळाने चार तास थैमान घातलं. पण तुम्ही कोकणी जनतेला आधार देण्यासाठी तितकाही वेळ थांबला नाहीत. आल्या पावली मातोश्री गाठली. याउलट, तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तीन दिवस कोकणात तळ ठोकून होते. वादळाने हैदोस घातलेल्या किनारपट्टीवरल्या गावांमध्ये तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करून नुकसानीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सगळी मदत मिळवून दिली," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "नेतृत्वात फरक असतो तो असा. पायाला भिंगरी बांधून कोकण पालथं घालत जनतेचे अश्रू पुसणारा देवेंद्रजींसारखा नेता एकीकडे आणि ठायीठायी वडिलांचा आधार घेऊन सहानुभूतीचा कटोरा जनतेसमोर फिरवणारा तुमच्यासारखा नेता दुसरीकडे," असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.