नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन, द्वारकानगरी जिथे पाण्याखाली गेली होती, त्या ठिकाणी प्रार्थना केली. समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या द्वारकानगरीला पंतप्रधानांनी यावेळी आदरांजली वाहिली. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाने उभारलेल्या द्वारकानगरीचे महत्त्व आणि त्यावरील शोधांचा आढावा घेणारा हा लेख...
'वायू’ नामक वादळ गुजरातला चाटून गेले होते. प्राचीन काळी असाच खवळला होता समुद्र. त्यावेळचे जुन्या ग्रंथांमधील वर्णन आणि आजचे समुद्राचे तांडव यांच्या वर्णनातील साम्य-भेदाची स्थळे नोंद घेण्यासारखी आहेत.’समुद्राच्या लाटा नेहमीप्रमाणे किनार्यावर आपटत होत्या. काय झाले कुणास ठाऊक? पण, लाटांनी निसर्गनिर्मित किनारा एकाएकी ओलांडला आणि समुद्राचे पाणी वेगाने द्वारकेत घुसले. त्या अतीव सुंदर शहराच्या रस्त्यांवरून वळसे घेत, त्यांनी संपूर्ण शहर व्यापले आणि द्वारका दिसेनाशी झाली. द्वारकेतील एकेक महाल एकापाठोपाठ बुडत असताना, अर्जुन सुन्न होऊन पाहत होता. त्याने श्रीकृष्णाच्या महालाचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. तोच तो प्रासादही पाण्यात बुडून दिसेनासा झाला. आता समोर एक मोठे सरोवर तेवढे दिसत होते. द्वारकेचा मागमूसही दिसत नव्हता. यापुढे पांडवांचीही आवडती असलेली द्वारका नावापुरती आणि स्मृतीतच शिल्लक राहणार होती. हे वर्णन समुद्राने एखादे शहर गिळंकृत करतानाचे वाटत नाही का?
द्वारकानगरी का उभारली?
द्वारकेच्या निर्मितीची कथा पुराणात अशी वर्णन केलेली आहे. जरासंध आणि कालयवन यांचा मथुरेला सतत उपद्रव होत होता. म्हणून श्रीकृष्णाने यादवांसह मथुरेचा त्याग करायचे ठरवून, सौराष्ट्राचा किनारा गाठला. समुद्रकिनारी आपली राजधानी उभारण्याचे ठरवून, श्रीकृष्णाने वास्तुदेव विश्वकर्म्याला आवाहन केले. विश्वकर्मा तत्काळ प्रगट झाले. “समुद्र देवाने आपल्याला आणखी १२ योजने जमीन दिली; तरच नगरी उभारता येईल,” असे विश्वकर्म्याने सांगितल्यामुळे, श्रीकृष्णाने समुद्र देवाची पूजा केली. तसे समुद्र देव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुरेशी जमीन दिली. यानंतर विश्वकर्म्याने या जमिनीवर स्वर्णनगरी द्वारकेची उभारणी केली.त्याकाळी द्वारका नगरी ‘द्वारामती‘, ‘द्वारावती’ आणि ‘कुशस्थली’ अशा नावांनी ओळखली जायची. सोमनाथजवळच्या भल्क तीर्थ या ठिकाणी शिकार्याचा बाण लागून, श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि लगेच द्वारका समुद्रात बडाली, अशीही एक कथा सांगतात.
उत्खननात मिळालेली द्वारका आणि मूळ द्वारका
आजवर या भागात झालेल्या उत्खननात जी माहिती समोर आली आहे आणि ज्या वस्तू/सामग्री मिळाली आहे, त्या वस्तूंचे रूप मूळ द्वारकेतील वस्तूंच्या वर्णनाशी जुळते. भारतातील मणिपूर, इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड आणि जर्मनीतील हॅनोव्हर येथील विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये येथे सापडलेले लाकडाचे तुकडे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, प्राण्यांची हाडे तपासण्यासाठी पाठविले होते. या वस्तू नऊ हजार वर्षे जुन्या आहेत, असा निष्कर्ष आहे. याच काळात शीतयुग संपले होते. काही वस्तू तर ३२ हजार वर्षे पूर्वीच्या आहेत. महाभारत आणि संस्कृत साहित्यात द्वारकेचे समुद्रात बुडतानाचे वर्णन प्रारंभी केल्याप्रमाणे वर्णनाप्रमाणे आहे. समुद्राने मागे सरून किंवा समुद्राला मागे सारून उपलब्ध झालेल्या/करून दिलेल्या जमिनीवर द्वारका वसली होती, हे नक्की. जगातील ही सगळ्यात जुनी संस्कृती होती, यातही शंका नाही. आज द्वारकेत आढळणारे, द्वारकाधीशाचे मंदिर श्रीकृष्णाच्या नातवाने वज्रनभाने हरिगृहावर म्हणजे श्रीकृष्णाच्या राहत्या महालावर बांधले होते. असे दिसते की, केवळ द्वारकाच नव्हे, तर भारताच्या पश्चिम किनार्याचा बराच मोठा भाग समुद्राने गिळंकृत केलेला आहे. हा प्रकार इसवी सनापूर्वी १५०० वर्षे अगोदर घडला होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पाश्चात्यांनी या संशोधनाला महत्त्व दिले नाही आणि कदाचित म्हणूनच आपल्यालाही ही बाब महत्त्वाची वाटली नसावी.
द्वारकेच्या शोधाचे महत्त्व
इसवी सन ५७४ मध्ये ‘सौराष्ट्राची राजधानी द्वारका’ असा लेखच आढळतो असे नाही, तर ’श्रीकृष्ण इथे राहत असे’ असाही उल्लेख आहे. आदी शंकराचार्यांनी चार पीठांपैकी एक पीठ आठव्या शतकात द्वारकेला स्थापन केले. एवढे त्यांना द्वारकेचे धार्मिक महत्त्व वाटत होते. याचे कारण काय असावे?डॉ. एस. आर. राव म्हणतात की, ”बुडालेल्या द्वारकेच्या शोधाचे भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे महाभारत काव्य की इतिहास, हा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. वैदिक काळ आणि वर्तमान काळ यातील सातत्य सांगणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे द्वारकेचे अस्तित्व होय.“ येथील उत्खननात देवादिकांच्या मूर्ती सापडल्या आहेत, म्हणजे ही नगरी एक धर्मस्थळही होते, असे मानणे प्राप्त आहे.
श्रीकृष्णाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व
श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व एवढे उत्तुंग होते की, त्याच्यातील ’मानव’ त्याच्यातील ’देवापासून’ वेगळा करणे कठीण होऊन बसले आहे. ’श्रीकृष्ण’ हेच एक महान गूढ असून, ज्याने त्याने आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. योगींना त्याच्या व्यक्तिमत्त्वात ’सत्याचा आविष्कार’ झाला, तर गोपींना ’दिव्य प्रेमाचा साक्षात्कार’ झाला. योद्ध्यांना तो नायक वाटतो, तर कंसासाठी तो मूर्तिमंत भीतीच्या स्वरुपात होता. शिशुपालासाठी श्रीकृष्ण ही पराकोटीचा द्वेश करावा, अशी व्यक्ती होती. हे काहीही असले तरी प्रत्येकाने तो आपल्याला साध्य व्हावा, असेच प्रयत्न केले आहेत. युधिष्ठिराने त्याला मित्रत्वाने आपलेसे केले, तर नारदाने भक्तीने. काहींसाठी तो मूर्तिमंत बुद्धीच्या स्वरुपात होता, तर काहींसाठी मूर्तिमंत आध्यात्मिकतेच्या स्वरुपात. धर्म, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य यांवर सारखाच प्रभाव असलेले श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व एकमेकाद्वितीय आहे. बालपणातील श्रीकृष्ण हे महदाश्चर्य आहे, तर तरूण श्रीकृष्ण परिपूर्ण शरीरसौष्ठव असलेली देखणी व्यक्ती आहे. त्याची बुद्धिमत्ता वैदिक विद्वानाची आहे, तर गीतेतील त्याचा उपदेश निष्काम कर्मयोग, ज्ञान आणि निस्सीम भक्ती यांचे शाश्वत स्वरूप आहे. योद्धा म्हणून त्याला स्पर्धक नाही, त्याच्यासारखा चतुर मुत्सद्दी सापडणार नाही. सामाजिक चिंतक म्हणून विचार केला, तर त्याच्याइतका उदारमतवादी तोच म्हटला पाहिजे. गुरू म्हणून त्याचे वक्तृत्व अतुलनीय आहे, तर मित्र म्हणून विचार करावा, तर श्रीकृष्णासारखा कधीही अंतर न देणारा दुसरा सखा नाही. त्याची साथ नसती, तर पांडवांवरच्या संकटांचे निवारण झाले असते का? पांडवांना महाभारताचे युद्ध जिंकता आले असते का?
श्रीकृष्ण कुणाला कसा दिसला...
अॅनी बेझंट आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी श्रीकृष्णाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. तो देवांचाही देव, मानवातील परिपूर्ण मानव, प्रेमिकांचा सखा, नवदाम्पत्यांना कृपाशीर्वाद देणारा, आपल्या पहिल्यावहिल्या बालकाला कुशीत घेतलेल्या मातेकडे प्रसन्न मुद्रेने पाहणारा, प्रेम आणि सुखाचा परमेश्वर होता. त्यामुळे मानवांच्या हृदयावर त्याचे कायमस्वरुपी अधिराज्य असावे, यात आश्चर्य ते काय? भगिनी निवेदिता (मार्गारेट नोबल) यांनी म्हटले आहे की, ”भारतीय धर्मतत्त्वांचा उद्गाता असलेला, शिवाचे मूर्तरूप, ग्रीकांच्या हरक्युलिससारखे पौरूष, येशूसारखी निष्कपटता, बुद्धासारखा हळवेपणा श्रीकृष्णाच्या ठायी होता. तो शांत, तपश्चर्या करणारा, ज्ञानी असा उपनिषदांचा भाष्यकार होता. कुरुक्षेत्रावर त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व उठून दिसत होते.”महाभारतात तसेच गीतेतही श्रीकृष्णाला मानव आणि देव अशा दोन्ही स्वरुपात प्रस्तुत केले आहे. छंदोपनिषदात श्रीकृष्णाचे देवरूप वर्णन केलेले आढळते. हा ऐतिहासिक दाखला म्हणता येईल. देवकीपुत्र कृष्णाशी अंगीरसाने चर्चा केल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकात पाणिनीने ’अष्टाध्यायी’मध्ये वासुदेवक म्हणजे वासुदेवाचा भक्त असा अर्थ सांगितला आहे.
आपल्या दृष्टीने यातील व्याकरण महत्त्वाचे नसून, वासुदेवाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. याचसोबत अर्जुनाचाही उल्लेख आहे, या बाबीची नोंद घेतली पाहिजे. चंद्रगुप्ताच्या दरबारात मॅगॅसथेनिस हा वकील होता. त्याने लिहिले आहे की, “शूरसेन हेराकल्सची पूजा करीत असे.” हेराकल्सचा अर्थ श्रीकृष्ण असा संदर्भांवरून लागतो. याची बहीण पांडय्या हिचे दक्षिण भारतात राज्य होते. पांड्यांची राजधानी मदुराई होती. मथुरा आणि मदुराई या नावांमधील साम्य नजरेत भरणारे आहे.ग्रीक राजा गाथोक्लेस याने ’चक्रधारी’ वासुदेवाचे चित्र असलेली नाणी चलनात आणली होती.व्याकरणकर्त्या पतंजलीने पाणिनीच्या व्याकरणावर ’महाभाष्य’ लिहिले आहे. यात कृष्णाचा उल्लेख आहे. इसवी सनापूर्वी दोन शतक अगोदर गॅथोक्लेस नावाच्या ग्रीक राजाने श्रीकृष्ण व बलराम यांची चित्रे असलेली नाणी चलनात आणली होती. तो कृष्णभक्त मानला जातो. ही नाणी अफगाणिस्तानमध्ये उत्खननात सापडली आहेत. हा काही ऐतिहासिक लेख नाही, तरीही हे उल्लेख श्रीकृष्णाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यास पुरेसे वाटतात/वाटावेत. पण, एक गूढ उकलत नाही. श्रीकृष्णाचा मृत्यू होताच, द्वारकाही का बुडावी? श्रीकृष्णाचा विरह सहन न झाल्यामुळे, तिने जलसमाधी तर घेतली नसेल ना?
वसंत गणेश काणे