सर्व गुणांचा साठा रामाच्या ठिकाणी आहे. रामकथांतून ते गुण उलगडत जातात. त्यामुळे भक्त रामकथा ऐकताना तल्लीन होऊन जातो. रामाच्या उपदेशाचा अभ्यास करताना देहभावना नाहिशी होते. ’मी देह आहे’ या कल्पनेत अडकलेल्या भक्ताची देहबुद्धी कमी होते, तेव्हा मन विस्तार पावून ते ज्ञानरूप व आनंदरूप होऊ लागते. रामासारखे शाश्वत आलंबन सापडल्याने देहभावना ही क्षूद्र, याची जाणीव होऊ लागून, भक्त खर्या सुखाचा अनुभव घेऊ लागतो.
आजची पिढी विज्ञाननिष्ठ आहे, हे आपण मागील काही लेखांतून पाहिले. माणसाने विज्ञाननिष्ठ, बुद्धीनिष्ठ, तर्कनिष्ठ असणे हा भौतिक प्रपंचात आवश्यक असा गुण आहे. त्यामुळे माणूस वरवर दिसणार्या व्यावहारिक गोष्टींवर लगेच विश्वास ठेवत नाही. त्यांच्या अंगी व्यावहारिक अथवा प्रापंचिक भोळसर मूर्खपणा येत नाही. यासाठी विज्ञान, बुद्धी, तर्क यांच्या आश्रमाने विचार करणे, हे सामान्यपणे ज्ञानीपणाचे लक्षण आहे, असा माणूस चाणाक्षपणे आपला प्रपंच करीत असतो. परंतु, त्याचा अतिरेक नसावा. त्याच्या अतिरेकाने घमेंड, ताठा, अहंकार आणि देहबुद्धी यांचे वास्तव्य पक्के झाल्याने ‘मी सर्वश्रेष्ठ’ ही भावना उदय पावून सारासार विवेक मावळतो. मग अशा माणसांना वाटू लागते की, वैज्ञानिक प्रयोग सिद्धतेव्यतिरिक्त जे आहे, ते सारे असत्य व कपोलकल्पित आहे. देहबुद्धी व विलक्षण अहंकाराने, देव किंवा भगवंत न मानण्याकडे कल होतो, अहंकार दुणावतो, असे चिवट अहंकार व देहबुद्धी अध्यात्मात घात करतात. माणसाचे पारमार्थिक स्वास्थ्य बिघडवतात, सुख नाहीसे करतात.
विवेक, नाहीसा झाल्याने हे त्यांच्या लक्षात येत नाही की, भौतिकशास्त्राचे नियम जसेच्या तसे अध्यात्मात चालत नाहीत. अध्यात्मशास्त्र हे अनुभूतीचे शास्त्र आहे. अध्यात्माच्या अभ्यासाने मन व बुद्धी यांच्या पलीकडील सर्वज्ञ, सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. अध्यात्म हे अमर्याद, अथांग व ज्ञानरूप आहे, तसे भौतिकशास्त्र नाही, भौतिकशास्त्र सिद्धांताला मर्यादा असते, म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते प्रापंचिक सत्य उजेडात आणते, पण त्या पुढील विज्ञानातील तार्किकता, बुद्धीच्या जोरावर विज्ञान स्पष्ट करू शकत नाही. त्यामुळे सुख मिळवण्यासाठी विज्ञानाचा उपयोग मर्यादित स्वरूपाचा असतो. विज्ञानाने अनेक सोयी उपलब्ध करून मानवी जीवन सुखकर केले, यात वाद नाही. पण, ते सुख मिळवण्यासाठी माणसाला अशाश्वत भौतिक आलंबनावर अवलंबून राहावे लागते. भौतिकतेच्या आनंदाबरोबर अप्रत्यक्षपणे येणारे दुःखही भोगावे लागते. थोडक्यात, अशाश्वत आलंबनापासून निर्भेळ सुखाची अपेक्षा करता येत नाही. मन कधी सुखी तर कधी दुःखी, निराश या फेर्यात फिरत राहाते.
पूर्वीच्या काळी भिंतीवर टांगलेली लंबकाची घड्याळे असत. त्या घड्याळात टांगलेला लंबक एकदा इकडे तर लगेच तिकडे, असा गतिमान होत असतो. गुरुत्वाकर्षणामुळे लंबकाची दोलायमान अवस्था सतत चालू असते. माणसाचे मनही या लंबकाप्रमाणे सुख शोधण्यासाठी एकदा इकडे तर एकदा तिकडे फिरत असते. मन चंचल असते. सुखासाठी ते आलंबन शोधीत असते. आपल्यला आवडणार्या व्यक्तीकडून आनंद मिळेल किंवा आवडणार्या वस्तूच्या सेवनाने आनंद प्राप्त होईल, असे वाटल्याने माणूस अशा वस्तूजाताच्या शोधात आयुष्यातील बराच काळ व्यतीत करतो. पण, हवा तो आनंद, हवे ते सुख त्याच्या वाट्याला येत नाही. कारण, अशाश्वत, भौतिक, फार काळ न टिकणारे आलंबन माध्यम त्याला सुख देऊ शकत नाही. अक्षय्य सुखासाठी माणूस आयुष्यभर निरनिराळे प्रयोग करीत राहून अखेरीस त्याच्या वाट्याला येते ती अल्पकालीन सुखाची झलक आणि दु:ख व निराशा! समर्थांना सर्वसामान्य माणसाच्या या दु:खाची कल्पना आहे. समर्थांच्या मते, आपण जे सुख अशाश्वत भौतिक माध्यमात शोधत असतो, ते माध्यम जर शाश्वत असणारे सापडले, तर आपल्याला सुखाचा शोध लागेल. त्यासाठी आपण भगवंतासारख्या शाश्वत आलंबनाची निवड केली व त्यातील सुख शोधले, तर ते नक्की सापडेल. त्यासाठी राम हे सर्वात्तम आलंबन आहे, असे स्वामींना वाटते. रामनामातून मिळणारे सुख, रामकथेतून मिळणारा सात्विक आनंद आणि रामाच्या बोधातून मिळणारी विवेकपूर्ण मनाला शांतता देणारी शिकवण, यातून खर्या सुखाची प्राप्ती होणार आहे ते सुख भौतिकसुखाच्या कैक पटीने जास्त असेल, मनाच्या श्लोकांतील पुढील श्लोक हे सांगणारा आहे-
जगी धन्य तो रामसुखें निवाला।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला।
देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरुपी बुडाली॥ १२७॥
मनाच्या श्लोकांत या पूर्वीच्या काही श्लोकांची शेवटची ओळ ‘जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ अशी आहे. तशी धन्यता रामसुखाने समाधानी झालेल्या भक्ताविषयी वाटते, हे या श्लोकाच्या पहिल्या ओळीत स्वामींनी सांगून टाकले. पण, अशा स्वरुपाचा रामाचा भक्त किंवा दास होणे सोपे नाही. एक रामदासच रामाचे खर्या अर्थाने दास होऊ शकले.ज्ञानी भक्ताचे आचरण शुद्ध असते. भगवंताला, रामाला आपला आदर्श मानल्याने भक्ताच्या आचरणात त्याचा प्रभाव दिसून येतो. ज्ञानी भक्ताचे आचरण सर्वकाळी, सर्व ठिकाणी चारित्र्यसंपन्न व नीतिन्यायाचे असते; राम आनंदमय आहे अशी भक्ताची चिंतनाने अभ्यासाने चिंतनाने खाली झालेली असते. आनंदमय रामाच्या अनुसंधानाने त्याचे थोडे तरी गुण भक्तात उतरले पाहिजेत. रामाचे काहीही गुण आचरणात आले नसतील, तर तो रामाचा खरा भक्त नव्हेच! त्याची भक्ती केवळ दिखावू दांभिक स्वरूपाची असून तो केवळ लोकात मान मिळावा, लोकांनी चांगले म्हणावे, या लालसेपोटी आपण रामाचा भक्त असल्याचे भासवत असतो. या पूर्वीच्या श्लेक क्र. ११६ ते १२६ या श्लोेकगटात स्वामींनी, ’देवाला भक्ताचा अभिमान असतो. देव भक्ताची उपेक्षा करीत नाही,’ असे म्हटले आहे. मग अशा दांभिक भक्ताला देवाला काय कोणालाही अभिमान वाटणार नाही.
खरा ज्ञानी भक्त होऊन गुणसंपन्न रामाचे गुण मिळवण्याचा प्रयत्न करणारा व रामाच्या सुखात ज्याच्या चित्रवृत्ती शांत झाल्या, समाधानी झाल्या तो भक्त धन्य होय, असे स्वामींना वाटते. ’निवाला’ या शब्दात स्वामींनी तळमळ शांत होऊन स्थिरता प्राप्त झालेल्या भक्ताचे चित्रण केले आहे. रामाच्या गुणांचा शोध भक्ताला रामचरित्र्याच्या कथांमधून होतो.सर्व गुणांचा साठा रामाच्या ठिकाणी आहे. रामकथांतून ते गुण उलगडत जातात. त्यामुळे भक्त रामकथा ऐकताना तल्लीन होऊन जातो. रामाच्या उपदेशाचा अभ्यास करताना देहभावना नाहिशी होते. ’मी देह आहे’ या कल्पनेत अडकलेल्या भक्ताची देहबुद्धी कमी होते, तेव्हा मन विस्तार पावून ते ज्ञानरूप व आनंदरूप होऊ लागते. रामासारखे शाश्वत आलंबन सापडल्याने देहभावना ही क्षूद्र, याची जाणीव होऊ लागून, भक्त खर्या सुखाचा अनुभव घेऊ लागतो. देहभावना क्षीण झाल्याने मनात वासना, भौतिक सुखाची आशाआकांक्षा सर्व रामरूपात अंतर्धान पावते. उरतो तो फक्त सुखानंद. रामाच्या चरणी मन समर्पित केल्यावर रामरूपाशी ते तद्रूप होते. संकुचित देहभावना अथांग ज्ञानसागरात, आनंदरूपात मिसळून आपल्या अनंत रुपाची जाणीव करून देते.
सुरेश जाखडी