"...तर राहूल गांधींना महाराष्ट्रात फिरु देणार नाही"; मनसेचा इशारा
13-Mar-2024
Total Views | 144
मुंबई : इकडे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यास महराष्ट्रातील जनता राहूल गांधींना इथे फिरु देणार नाही, अशा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे. राहूल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणार आहे. तसेच येत्या १७ तारखेला शिवाजी पार्कवर राहूल गांधींची मोठी सभा होणार आहे. दरम्यान, त्याआधी मनसेकडून राहूल गांधींना इशारा देण्यात आला.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहे. त्याच शिवतीर्थावर दुर्दैवाने १७ तारखेला काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई ऐकण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राला लाभणार आहे. त्याचबरोबर वाघाचं कातडं पाघरलेले लांडगेही त्यांच्यासोबत असतील."
"लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतू, राहूल गांधींना एकच सांगतो की, शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घरही शिवाजी पार्क मैदानाजवळच आहे. तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुमचं म्हणणं मांडावं. याला आमची काहीही हरकत नाही. पण इथे येऊन जर मागच्यासारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलंही अपमानजनक वक्तव्य केलं तर महाराष्ट्रातील १४ कोटी जनता राहूल गांधींना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही," असा थेट इशारा संदीप देशपांडेंनी राहूल गांधींना दिला आहे.