सेमीकंडक्टर क्षेत्रातही भारत महासत्ता होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
13-Mar-2024
Total Views | 42
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यापैकी 2 प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये आहे. भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत असून सेमीकंडक्टर चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
सध्याचे एकविसावे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित शतक आहे. सेमीकंडक्टरशिवाय त्याची कल्पनाही करता येत नाही. त्यातून भारताला आधुनिकतेकडे नेण्याची क्षमता निर्माण होईल. भारत आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असून एक क्षणही वाया घालवायची भारताची तयारी नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर मिशन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेगवान कार्यवाही करून आज सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू होत असून सेमीकंडक्टरची निर्मिती करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत आपल्या उपस्थितीसाठी सर्वांगीण कार्य करत असल्याचे भारतीय तरुण बघत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले. या प्रयत्नांमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल आणि आत्मविश्वासू तरुण जेथे असेल तेथून तो आपल्या देशास बळकटी देण्यासाठी सज्ज होणार आहे. भारत अणु आणि अवकाश क्षेत्रामध्ये महाशक्ती आहे. आता लवकरच सेमीकंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन केले जाईल आणि येत्या काही दिवसांत भारत या क्षेत्रातही महासत्ता बनेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
असे आहेत सेमीकंडक्टर प्रकल्प
1. भारतात सेमीकंडक्टर फॅब्सच्या स्थापनेसाठी सुधारित योजनेअंतर्गत टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) द्वारे धोलेरा विशेष गुंतवणूक प्रदेशात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा स्थापित केली जाईल. एकूण 91,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीसह हे देशातील पहिले व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब असेल.
2. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) द्वारे सेमीकंडक्टर जोडणी, चाचणी, अंकन आणि वेष्टनासाठी (एटीएमपी) सुधारित योजनेअंतर्गत आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा एकूण सुमारे 27,000 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुरू केली जाईल.
3. सेमीकंडक्टर जोडणी, चाचणी, अंकन आणि वेष्टनासाठी (एटीएमपी) सुधारित योजनेअंतर्गत सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडद्वारे साणंदमध्ये बाह्यस्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा एकूण सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुरू केली जाईल.