हायड्राॅईड्सच्या दुर्मीळ प्रजातीचे ७१ वर्षांनी दर्शन; वसईतील 'या' किनाऱ्यावर आढळ

    13-Mar-2024   
Total Views | 168

Hydroid

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रात हायड्राॅईड्स (Hydroid) या समुद्री जीवाच्या 'कॉरिमॉर्फा' कुळाचे ७१ वर्षांनी दर्शन झाले. वसई तालुक्यातील भुईगाव किनाऱ्यावर या जीवाचे दर्शन झाले असून राज्यातून १९५३ साली 'कॉरिमॉर्फा' कुळाची शेवटची नोंद करण्यात आली होती. हायड्राॅईड्स (Hydroid) या जीवावर राज्यात फार कमी अभ्यास झाला असून यानिमित्ताने या जीवाच्या प्रजातींवर अभ्यास करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Hydroid)

 

'निडॅरियन' या संघात हायड्राॅईड्सचा समावेश होतो. या संघात १२ हजाराहून अधिक जलचर आणि मुख्यत: सागरी प्राण्यांच्या प्रजाती आहेत. भक्ष्य पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'निडोसाईट्स' या वेगळ्या प्रकारच्या पेशी हे या संघातील प्राण्यांचे वैशिष्ट्य. छत्रीसारखा पोहू शकणारा देह आणि एका जागी स्थिर नळीसारखा देह अशा दोन अवस्थांमध्ये हे प्राणी आढळतात. या संघातील प्राण्यांची विभागणी चार गटांमध्ये होत असून त्यामधील 'हायड्रोझोआ' या गटात हायड्राॅईड्सचा समावेश होतो. यामधील 'कॉरिमॉर्फा' कुळाचे ७१ वर्षांनी राज्यात दर्शन झाले आहे. तारापोरवाला मत्स्यालयाचे तत्कालीन जीवशास्त्रज्ञ एम.आर.रानडे यांना १९५३ साली या कुळामधील एक प्रजात कुलाब्याच्या किनाऱ्यावर शेवटची दिसली होती. तारापोरवाला मत्स्यालयासाठी कुलाबा किनाऱ्यावर सागरी जीव गोळा करण्यासाठी गेलो असता आॅगस्ट १९५३ साली 'कॉरिमॉर्फा' कुळातील एक प्रजात दिसल्याची नोंद रानडे यांनी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या नियतकालीकामध्ये केली आहे. त्यानंतर आता जवळपास ७१ वर्षांनी 'कॉरिमॉर्फा' कुळाचे दर्शन वसईच्या भुईगाव किनाऱ्यावर झाले आहे.

 

hydriod 

गेल्या आठवड्यात वसई गावातील सागरी निरीक्षक दत्ता पेडणेकर आपल्या कुटुंबियांसमेवत भुईगावच्या किनाऱ्यावर निरीक्षणासाठी गेला असता त्यांना हा जीव आढळून आला. आम्ही लागलीच या जीवाचे छायाचित्र टिपून ओळख पटवण्याच्या दृष्टीने त्याची छायाचित्रे सागरी जीवशास्त्रज्ञ विशाल भावे यांना पाठवल्याची माहिती पेडणेकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. भावे यांनी ही प्रजात हायड्राॅईड्सच्या 'कॉरिमॉर्फा' कुळातील असल्याचे आम्हाला सांगितल्याचे पेडणेकर म्हणाले. 'कॉरिमॉर्फा' कुळातील या प्रजातीची ओळख अजून पटलेली नसून त्याकरिता सूक्ष्म अभ्यासाची गरज आहे.


अभ्यास आवश्यक
पेडणेकर यांना भुईगावच्या किनाऱ्यावर सापडलेली हायड्राॅईड्सची प्रजात ही
'काॅरिमाॅर्फा' कुळातील आहे. या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी तिचा नमुना गोळा करणे आवश्यक आहे. हायड्राॅईड्सच्या या सागरी जीवावर राज्यात फार कमी अभ्यास झाला आहे. त्यामुळे यांसारख्या दुर्लक्षित जीवांवर अभ्यास होणे आवश्यक आहे. - विशाल भावे, उपसंचालक (सागरी विभाग, सृष्टी काॅन्झर्वेशन फाऊंडेशन)


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121