कर्नाटकमध्ये 'रमजान'साठी शाळांच्या वेळेत बदल! नेटकऱ्यांनी काँग्रेसला घेतले फैलावर
12-Mar-2024
Total Views | 35
बंगळुरू : रमजान महिना सुरू होताच, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा आदेश जारी केला आहे, जेणेकरून रमजान महिन्यात अभ्यास आणि प्रार्थना एकाच वेळी चालू राहतील. कर्नाटकातील उर्दू आणि इतर अल्पसंख्याक भाषा शाळा संचालनालयाने रमजानच्या काळात शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. ६ मार्च रोजीच जारी करण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये शाळेच्या वेळेत बदल रमजानच्या पहिल्या दिवसापासून लागू झाला आहे. हा आदेश १० एप्रिल २०२४ पर्यंत लागू राहील. अधिकृत आदेशानुसार, शाळा ८ ते १२.४५ पर्यंत चालतील आणि विद्यार्थ्यांना (सकाळी १० ते १०.१५ पर्यंत) १५ मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. यापूर्वीही असे आदेश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्नाटकाबरोबरच आंध्र प्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आजपासून (१२ मार्च २०२४) ते १० एप्रिलपर्यंत शाळा सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत चालतील. अल्पसंख्याक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी सरकारकडे केलेल्या अनेक मागण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश राज्यभरातील उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, समांतर वर्गांना लागू आहे.
नेटकऱ्यांनी कर्नाटक सरकारच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. कर्नाटक सरकार धार्मिक अधारावर भेदभाव करत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.