'स्वातंत्र्यवीर सावरकर' मराठी चित्रपटासाठी 'या' कलाकाराने दिला आवाज
11-Mar-2024
Total Views | 167
रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित, लिखित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer savarkar) या चरित्रपटाचा मराठी ट्रेलर आज पुण्यात प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारणारे अभिनेते रणदीप हुड्डा आणि यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित होते. मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेला विशेष अवजर लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या रणदीप हुड्डा (Swatantryaveer savarkar) यांच्या व्यक्तिरेखेला अर्थात सावरकर यांच्या भूमिकेला अभिनेते सुबोध भावे यांनी हात आवाज दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यावेळी मुंबई तरुण भारतच्या प्रश्नाला उत्तर देत वीर सावरकर (Swatantryaveer savarkar) यांच्याकडून लिखाणाची रुची, हिंदुत्व आणि देशप्रेम या तीन महत्वपुर्ण गोष्टी आत्मसात केल्याची कबूली दिली.
...म्हणून सावरकरांचे विचार आजही एकरुप वाटतात
चित्रपटाच्या ट्रेलर सोहळ्यादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर आजच्या काळातील विचारांशी एकरुप का वाटतात असा प्रश्न विचारला असता रणदीप म्हणाला, “वीर सावरकर आजच्या काळाशी एकरुप आहेत कारण सावरकरांनी एक सुसंस्कृत भारत, संस्कृतीशी एकनिष्ठ होणारा भारत आणि अखंड भारत पाहिला. आजचा आपला भारत देश या सर्व गोष्टींना पुरक ठरणारा आहे. तसेच, भारताने लष्करीदृष्ट्या सशक्त राहिले पाहिजे ही सावरकरांनी पाहिलेली दुरदृष्टी होती. आणि आज वर्तमानकाळात आपली लष्कराची बाजू भरभक्कम आहे. याशिवाय हिंदुत्व ही त्यांची विचारधारा आज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजली आहे. याशिवाय भारतांने संघटित राहावे हा सावरकरांचा अटट्हास आणि स्वप्न आजचा भारत परिपुर्ण करत आहे. आणि याच कारणांमुळे आजही वीर सावरकर यांचे विचार काळाशी एकरुप ठरतात”, असे ठाम उत्तर रणदीपने दिले.
मराठीत हा चित्रपट अधिक सुंदर वाटला
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. यावर आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ज्यावेळी मराठी भाषेत पाहिला त्यावेळी मला अधिक सुंदर वाटला. सध्या जरी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होत असला तरी जगभरातील प्रत्येक भाषेत हा चित्रपट व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण देश विदेशात वीर सावरकरांचा इतिहास त्यांची कथा पोहोचली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे”, असे देखील रणदीप याने म्हटले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अखंड भारत ते हिंदुत्व या विचारधारेचा संपूर्ण इतिहास आणि त्यांची निस्सीम देशभक्ती सांगणारा स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.