पदवीधर ते यशस्वी महिला शेतकरी

    11-Mar-2024
Total Views | 101
Sangeeta Pingle


पतीच्या निधनानंतर अजिबात खचून न जाता, शेतीतला कुठलाही अनुभव नसताना, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेती करणार्‍या संगीता पिंगळे यांची ही यशोगाथा...
 
संगीता पिंगळे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील शिलापूर गावचा. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या संगीता यांनी २००० साली ‘रसायनशास्त्र’ विषयात पदवी पूर्ण केली. संगीता यांचे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन सरकारी अधिकारी म्हणून देशसेवेचे स्वप्न होते. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. संगीता यांचे वडील कै. हरिश्चंद्र कहांडळ यांनी नाशिकमधील मातोरी येथील प्रगतिशील शेतकरी अनिल पिंगळे यांच्याशी संगीता यांचा २००० साली विवाह लावून दिला. लग्नानंतर गृहिणी म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. उच्च शिक्षित असूनही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत संगीता यांच्या मनात आजही कायम आहे. २००१ साली त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुढे २००४ साली एक पुत्ररत्नही पोटी जन्मले. मात्र, बाळ जन्मत:च दिव्यांग असल्याने, पाच वर्षे सांभाळ करूनही, दुर्दैवाने ते मृत पावले.

अशाप्रकारे एका मागून एक दुःख आणि संकटांचा संगीता यांना सामना करावा लागला. अशातच २००७ साली दुःखाचा सर्वात मोठा डोंगर त्यांच्यावर कोसळला. त्यांच्या सुखी संसाराला जणू दृष्ट लागली. गरोदरपणात नववा महिना सुरू असताना, पती अनिल यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने, संगीता यांच्यावर एकाकी आभाळ कोसळले. पतीच्या निधनानंतर १५ दिवसांनी त्यांना मुलगा झाला. पतीच्या निधनानंतर नऊ वर्षे संगीता एकत्रित कुटुंबात राहिल्या. मात्र, २०१६ साली कुटुंब विभक्त झाल्यानंतर, संगीताताईंच्या वाट्याला १३ एकर शेती आली. त्यावेळी शेतात जाण्याची सुद्धा माहेरी सवय नव्हती. अशावेळी शेती करायची कशी, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर प्रारंभी उभा ठाकला. त्यावेळी सासरे रामदास पिंगळे, सासू अनुसया यांनी संगीता यांना भक्कम आधार दिला. शेतीचा कोणताच पूर्वानुभव गाठीशी नसताना, केवळ सासरच्यांनी प्रोत्साहन दिल्याने, त्या शेतीमध्ये हळूहळू रमू लागल्या. मात्र, दुर्दैवाने पुढे तीन महिन्यांतच सासर्‍यांचेही निधन झाले. यानंतर सासू, मुलगी, मुलगा हे सोबतीला होते. त्या एकामागून एक येणार्‍या संकटाशी दोन हात करत लढत राहिल्या.
 
घरातली महिला आता शेती करणार, ही बाब काहींना रुचणारी नव्हती. अशात ‘शेती म्हणजे तोंडाचा खेळ नाही, बोलणे सोपे; पण करणे कठीण!’ असे टोमणे अधूनमधून त्यांच्या कानी येत. मात्र, शेतीशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, हे संगीता यांच्या लक्षात आले होते. त्यांनीही आता शेती करायचीच, हा चंग बांधला. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, संगीता पूर्णपणे शेतीत उतरल्या. प्रारंभी शेतीतील अनेक गोष्टी त्यांचासाठी नवीन असल्याने, त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर कस लागे. पण, हळूहळू त्या शेतीत मुरत गेल्या. दरम्यान, त्यांच्याकडे घराबाहेर पडण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने, मोठी अडचण होत असे. मग त्यांनी त्यांचे स्त्रीधन गहाण ठेवून, स्कुटी खरेदी केली. यामुळे त्यांचे श्रम काहीसे कमी झाले. शेती जरी नावावर असली, तरी मुलगा लहान असल्याने, त्यांना शेतीसाठी कुठलेही कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे संगीता यांनी नातेवाईकांकडून भांडवलाची जुळवाजुळव करून, टोमॅटोची लागवड केली. सुयोग्य नियोजन आणि प्रामाणिक कष्टामुळे त्यांना चांगला नफा झाला. टोमॅटोच्या उत्पन्नातून त्यांनी द्राक्ष शेतीसाठी भांडवल उभे केले. द्राक्षशेती नियोजनामध्ये त्यांच्या भावंडांनी त्यांना मोलाची साथ आणि मार्गदर्शन केले. भांडवल, वीजपुरवठा, रोगांचा प्रादुर्भाव आणि अस्थिर बाजारपेठ अशी अनेक आव्हाने त्यांच्या समोर होती. सुरुवातीला अनुभव नसल्याने, द्राक्ष शेतीचे कामकाज समजून घेतले. त्यानंतर ऑक्टोबर बहर छाटणी, सिंचन व्यवस्थापन, शेती यंत्रांची दुरुस्ती, मजूर व्यवस्थापन आणि शेतीमाल विक्री अशी कामे अनुभवातून संगीता शिकत गेल्या.

पहिल्याच वर्षी एकरी १२ टन द्राक्ष उत्पादन हाती आल्याने, त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यातूनच पहिल्या वर्षात घेतलेल्या आर्थिक मदतीची त्यांनी परतफेड केली. एवढेच नाही, तर घरातल्या कर्त्या पुरुषांप्रमाणे इंधन खरेदी, किराणा, मुलांचे शिक्षण, आजारपण या सर्व जबाबदार्‍या त्यांनी लीलया पार पाडल्या. एकटी महिला शेती करू शकत नाही, ही भावना संगीत यांनी कष्टाचे सिंचन करीत मोडीत काढली. “मी जेव्हा शेती करायला सुरुवात केली, तेव्हा गावात कोणतीही महिला शेती करत नव्हती. परंतु, माझ्यावर तशी परिस्थिती आल्याने, मला शेतीकडे वळावे लागले. निश्चितच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महिलांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, थोडे जास्तीचे कष्ट उपसावे लागतात. बर्‍याचदा समाजाचा, घरच्यांचा पाठिंबादेखील लवकर मिळत नाही. अशा वेळी खचायला होते. परंतु, महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता, परिस्थितीशी दोन हात करायला हवे. सुरुवातीला भीती वाटते, लोक काय म्हणतील, याचे विचार येतात. परंतु, ही लढाई स्वतःची असून, स्वतःच जिंकायची आहे. एवढे ध्यानात ठेवावे. एखादी गोष्ट करून पाहायची इच्छा असल्यास, नक्की करून पाहा, जमलं तर ठीक आहे. नाही जमलं, तर किमान त्या गोष्टीचा अनुभव तुमच्या पाठीशी राहील. आयुष्यात काहीच न करता, माघार घेऊ नका,” असा संदेश महिलावर्गाला देणार्‍या संगीता पिंगळे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
गौरव परदेशी



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121