शिस्तबद्ध मुले त्यांच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यास आपसूक शिकतात आणि ते जबाबदार निवडी करण्यात अधिक सक्षम बनतात. शैक्षणिक यशासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण, जे विद्यार्थी आपल्या भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवू शकतात ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, ते शाळेत चांगले शैक्षणिक आणि अवांतर प्रदर्शन करतात. शिवाय, आत्म-शिस्त ही जीवनातील यशासाठी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
‘शिस्त’ किंवा ‘discipline’ या लॅटिन शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे ’शिकवणे’. तुमच्या मुलांना शिस्त लावणे म्हणजे त्यांना जबाबदार वागणूक कशी असावी आणि आत्मनियंत्रण कसे असावे, हे शिकवणे. योग्य आणि सातत्यपूर्ण शिस्तीने, तुमची मुले आयुष्यात होणार्या परिणामांबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्यास शिकतील. मुलाला त्यांच्या भावना आणि वर्तन दोन्ही व्यवस्थापित करण्यास प्रोत्साहित करणे, हे शिस्तीचे अंतिम उद्दिष्ट आहे. याला ‘स्व-निरीक्षण’म्हणतात.शिस्त म्हणजे मुलांना फक्त परिणामाबद्दल ज्ञान देणे असे नाही. त्याऐवजी, शिस्त हे सुनिश्चित करते की मुले भविष्यात एक जबाबदार प्रौढ होण्यासाठी आवश्यक कौशल्ये कशी मिळवत आहेत. पालकत्वासाठी अनेक प्रकारची शिस्तबंधने नियम, अटी आणि विविध दृष्टिकोन आहेत. पण, शेवटी, पालक कोणत्या प्रकारचा शिस्तीचा वापर कसा करतात, यावर शिस्त मुलांना अनेक फायदे देते.
मुलांना सीमा जाणवणे महत्त्वाचे...
मुलाने तुमची वेळोवेळी परीक्षा घेणे स्वाभाविक आहे; खरं तर हे अपेक्षित आहे. कारण, मुलं अशा प्रकारे शिकतात. मुलांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना काय स्वीकार्ह आहे आणि काय नाही, हे जाणून घेण्यासाठी अशी चाचणी आवश्यक आहे. पण, त्याही पुढे जाऊन मुलांना सीमा जाणवणे आवश्यक आहे. कारण, ते त्यांना सुरक्षितता आणि बचावात्मक दृष्टी प्रदान करते, जी भावनिक आणि बौद्धिक शिक्षणाचा आधार आहे. जेव्हा मुलांना सुरक्षित वाटतं, तेव्हाच ते त्यांच्या सभोवतालच्या जगाला गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांची ऊर्जा निर्देशित करण्यास सक्षम बनतात. जर त्या सीमा नसतील, तर त्या मुलाची ऊर्जा नकारात्मक गोष्टी करण्याकडे (व्यसनाधीनता)आणि सदोष वर्तणुकीकडे जाते.
मुलांना संरक्षित वाटण्याची जन्मजात गरज असते आणि पालकांनी पुरेशा शिस्तीने निर्माण केलेल्या सीमा त्यांच्यासाठी आवश्यक सुरक्षा प्रदान करून ती गरज पूर्ण करतात. वेळोवेळी शिस्त लावत असताना, प्रौढ व्यक्तीसाठी मुलांकडून संदेश असतो. मुलतः मुले तुमच्याकडे त्याला किंवा तिला काही गोष्टीपासून थांबवण्याची विनंती करत असतात. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुला थांबवणार आहे,’ असा प्रतिसाद देणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे. वर्गात, सर्व प्रकारची मुले असतात, जी वारंवार त्यांच्या सीमा अनेक प्रकारे तपासतात. कधी गडबड करणे, कधी शिस्तभंग करणे, कधी खोड्या काढणे अशा घटनांमध्ये, ते वर्गातील अभ्यासात किंवा साहित्यात गुंतू शकत नाहीत किंवा त्यांच्या समवयस्कांशी संबंध निर्माण करू शकत नाहीत. कारण, ‘कोणीतरी मला थांबवत नाही तोपर्यंत मी आणखी काय करू शकतो?’ अशा विचारांत ती गुंतलेली असतात.
आत्म-नियंत्रण आणि आत्म-शिस्तीचा विकास
शिस्तबद्ध मुले त्यांच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यास आपसूक शिकतात आणि ते जबाबदार निवडी करण्यात अधिक सक्षम बनतात. शैक्षणिक यशासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण, जे विद्यार्थी आपल्या भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवू शकतात ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, ते शाळेत चांगले शैक्षणिक आणि अवांतर प्रदर्शन करतात. शिवाय, आत्म-शिस्त ही जीवनातील यशासाठी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. कारण, ती व्यक्तींना अडथळ्यांवर आणि आव्हानांवर मात करण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करते. आत्म-नियंत्रण वाढवण्याव्यतिरिक्त, शिस्त मुलांमध्ये जबाबदारीची भावनादेखील वाढवू शकते. जेव्हा मुलांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाते, तेव्हा ते त्यांच्या चुकांची जबाबदारी घेण्यास आणि त्यांच्या चुकीच्या कृत्यांसाठी दुरूस्ती करण्यास स्वतःहून शिकतात. अनेक असत्य कारणे पुढे करणे, आपल्या चुका नाकारणे, दुसर्यांवर आरोप टाकणे असे त्रासदायक प्रकार जबाबदार मुले सहसा करत नाहीत. मुलांना सहानुभूती आणि निष्पक्षतेची भावना विकसित करण्यात आत्मनियंत्रण ब़र्यापैकी मदत करू शकते, कारण ते इतरांवर त्यांच्या कृतीमुळे होणारा बरेवाईट प्रभाव विचारात घेण्यास शिकतात.
मुलांना त्यांच्या वर्तनासाठी जबाबदार धरून, जबाबदार पालक आणि शिक्षक त्यांना त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या निवडींवर त्यांची स्वतःची मालकीची भावना विकसित करण्यात मदत करू शकतात. शिस्तीमुळे मुले आपल्या धारणा आणि दिनचर्यादेखील नियंत्रित करू शकतात, जे त्यांच्या भावनिक आणि मानसिक सुदृढतेसाठी आवश्यक आहे. शिस्त त्यांच्या जीवनात सुव्यवस्था आणि दिनचर्या स्थापित करण्यात मदत करू शकते, अशी मुले सुसंगत वातावरणात भरभराट करतात. गोंधळलेल्या किंवा अस्थिर पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांसाठी शिस्त आणि नियंत्रण विशेषतः महत्त्वाचे असू शकते, कारण ते त्यांना स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना प्रदान करू शकते.
बर्याच चांगल्या कुटुंबांनी घराच्या सकस नियमांच्या रूपात त्यांच्या घरांमध्ये खूप उबदारपणा आणि उत्तम नियमितता आणलेली असते; कुटुंबात स्वीकारले जाणारे वर्तन कसे असावे, कुटुंबीयांच्या लहान थोरांच्या जबाबदार्या कशा असाव्यात - त्यांचे गृहपाठ किंवा त्यांची कामे जी त्यांनी करायची आहेत, ती त्यांनी कशी करावीत इत्यादी. मुख्य म्हणजे, या सगळ्यात सातत्य असणे आवश्यक आहे. तुम्ही एकदा का ते नियम आणि मर्यादा ठरवल्यावर त्यांचे पालन करा, मुलांप्रती आदर दाखवा आणि शांत राहा.हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, शिस्त दंडात्मक किंवा हुकूमशाहीकडे झुकणारी असणे आवश्यक नाही. खरे तर, शिस्त ही शिक्षेपेक्षा मुलांच्या व्यक्तिमत्वाचे सकारात्मक मजबुतीकरण करण्याकडे आणि वेळोवेळी मार्गदर्शनावर आधारित असावी. पालक आणि शिक्षकांनी वाईट वागणुकीला शिक्षा करण्यापेक्षा चांगल्या वर्तनावर बक्षीस देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे मुलांना त्यांचा आत्मसन्मान आणि आत्म-मूल्याची सकारात्मक भावना विकसित करण्यात मदत करू शकते, जे भविष्यात त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक यशासाठी आवश्यक आहे.
(क्रमशः)
डॉ. शुभांगी पारकर