पुणे : रोहित पवारांची चौकशी अयोग्य असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली असून याबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. यासंदर्भात शरद पवारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
शरद पवार म्हणाले की, "यापुर्वी देशात निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यंत्रणांचा वापर ठी फारसा केला जात नव्हता. पण आता ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर ठिकठिकाणी केला जात आहे. हा गैरवापर आहे. एकप्रकारे ईडीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे."
"आता रोहित पवार यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करणं सुरु आहे. बँकांना विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटींच्या आत विकले गेलेत. सार्वजनिक जीवनात अॅक्टिव असलेल्या कार्यकर्त्याला जाणूनबूजून थांबायचं कसं, दहशत कशी निर्माण करायची, याचा प्रयत्न सुरु आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही सगळी माहिती मिळवली त्यावेळी समोर आलं की २००५ ते २०२३ या सतरा वर्षांच्या काळात दोन सरकारे होती. एक आमचे सरकार सरकार होते आणि आत्ताचे सरकार आहे. या काळात ५९०६ केसेस नोंदवल्या गेल्या. यापैकी चौकशी करुन निर्णय लागलेल्या केसेस फक्त २५ आहेत. २०२२ पर्यंत ईडीने १४७ नेत्यांची चौकशी केली. त्यामध्ये ८५ टक्के विरोधी पक्षाचे नेते होते. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात ईडीने २६ नेत्यांवर कारवाई केली. त्यामध्ये काँग्रेसचे पाच तर भाजपचे तीन नेते आहेत. यावरून असं दिसते की, युपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती. पण आज राजकीय सुडापोटी कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनला आहे," असेही ते म्हणाले.