‘तेलुगू देसम’ची घरवापसी आणि आंध्रच्या राजकारणाला कलाटणी

    11-Mar-2024   
Total Views |
 Andhra Pradesh Assembly polls


भाजपसमवेत झालेल्या युतीमुळे तेलुगू देसम, जनसेना या पक्षांचाही लाभ होईल, अशी चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशातील विद्यमान जगनमोहन सरकारविरूद्ध कमालीची नाराजी असल्याने त्याचा फटका त्या पक्षास बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अवघे काहे दिवस राहिले असतानाच, विविध राजकीय पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होऊ लागले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी ‘इंडी’ आघाडी आहे, त्या आघाडीत जे पक्ष सहभागी झाले होते, तेच त्या आघाडीतून काढता पाय घेऊ लागले असल्याचे दिसत आहे. ‘इंडी’ आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस या पक्षाने प. बंगालमधील सर्वच्या सर्व म्हणजे ४२ जागा लढवत असल्याचे रविवार, दि. १० मार्च रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित सभेत घोषित करून टाकले. तृणमूल काँग्रेस हा ‘इंडी’ आघाडीतील महत्त्वाचा पक्ष. पण, त्या पक्षास जागावाटपात जसे महत्त्व द्यायला हवे होते तसे न दिले गेल्याने ‘एकला चलो रे’चा निर्णय त्या पक्षाने घेतला. तृणमूल काँग्रेसच्या निर्णयाने ‘इंडी’ आघाडीला जबर धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल, अशी आशा काँग्रेसला वाटते.


पण, याप्रकारे तृणमूल काँग्रेसने आपला निर्णय घोषित केला, तो पाहता त्या पक्षास आता ‘इंडी’ आघाडीमध्ये स्वारस्य उरले नसल्याचे दिसून येते. विरोधकांच्या आघाडीतून या आधी नितीशकुमार बाहेर पडले. आता ममतादीदी यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे भाजपविरूद्ध एकास एक उमेदवार उभा करून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे विरोधकांचे मनोरथ आताच हवेत विरल्याचे दिसून येते. विरोधकांची अशी बिकट अवस्था असताना, भाजप पुन्हा जुन्या मित्रांना जवळ करण्याच्या आणि नवीन मित्र गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. भाजप आणि आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम व जनसेना पक्ष यांच्यात झालेली युती हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष होता. पण, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळायला हवा, ही त्या पक्षाची मागणी मान्य न झाल्याचे कारण पुढे करून तो पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. भाजपसमवेत तेलुगू देसमचे एवढे तीव्र मतभेद झाले होते की, भाजपविरूद्ध विरोधकांची आघाडी उभी करण्याचे प्रयत्न चंद्राबाबू नायडू यांनी चालविले होते. पण, त्याच चंद्राबाबू नायडू यांना आपली चूक उमजली असावी.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले. भाजप, तेलुगू देसम आणि जनसेना पक्ष यांची युती एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय या तीन पक्षांनी घेतला आहे.“आमची ही जी युती आहे ती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवेल,” असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील जगनमोहन सरकारने राज्याची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली आहे, अशी टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली. या युतीतील जागावाटप लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. आंध्र प्रदेशमधून लोकसभेचे २५ खासदार निवडले जातात. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभेचे संख्याबळ १७५ आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २२ जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभेच्या १५१ जागा जिंकल्या होत्या. तेलुगू देसमला लोकसभेच्या फक्त तीन आणि विधानसभेच्या २३ जागा मिळाल्या होत्या, तर जनसेना पक्षास केवळ विधानसभेची एक जागा मिळाली होती. हे लक्षात घेता, भाजपसमवेत झालेल्या युतीमुळे या तीनही पक्षांचा लाभ होईल,अशी चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशातील विद्यमान जगनमोहन सरकारविरूद्ध कमालीची नाराजी असल्याने त्याचा फटका त्या पक्षास बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मात्र, तेलुगू देसम पक्षाने भाजपसमवेत केलेली युती जगनमोहन रेडी यांच्या पक्षास किंवा काँग्रेस पक्षास रुचली नसल्याचे दिसून येते. भाजपशी युती करून तेलुगू देसम पक्षाने तेलुगू अस्मिता, सन्मान हे सर्व मोडीत काढले आहे. मोदी यांच्यावर आतापर्यंत जी बोचरी टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली होती, ते सर्व विसरून आता त्यांनी भाजपपुढे शरणागती पत्करली आहे, अशी टीका वायएसआर काँग्रेसने केली. तर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा दिला जात नसल्याबद्दल २०१८ मध्ये तेलुगू देसम पक्ष आघाडीतून बाहेर पडला होता, त्याचे स्मरण करून दिले. मोदी सरकारने त्या दिशेने काही केले नसताना, तो पक्ष पुन्हा भाजपसमवेत गेला, असे जयराम रमेश म्हणाले. तेलुगू देसम पक्ष भाजपसमवेत गेल्याने विरोधकांना कशी पोटदुखी सुरू झाली आहे ते यावरून दिसून येते.भाजपच्या ‘३७०’ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मिळून ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या दिशेने भाजपची पावले पडत आहेत, तर विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडी नावाच्या मोटेला मोठी छिद्रे पडत असून त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाताना दिसत आहे. भाजप आणि तेलुगू देसम यांच्यात झालेली युती नक्कीच फायद्याची ठरेल, असे वाटत आहे.

करुणानिधी यांच्या गावी उत्खननात रामाची मूर्ती!


द्रमुकचे अनेक नेते सध्या प्रभू रामचंद्र, सनातन धर्म यांच्यावर वाटेल त्या भाषेत टीका करताना दिसत आहेत. ज्या रामस्वामी नायकर यांनी प्रभू रामचंद्र आणि अन्य हिंदू देवदेवतांची विटंबना केली होती, त्यांचेच हे अनुयायी असल्याने त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार? पण, काळ अशा लोकांवर कसा सूड उगवतो त्याचे एक उदाहरण तामिळनाडूमध्ये आढळून आले. द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचे तिरुवरुर हे गाव. त्या गावामध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना भगवान रामाची मूर्ती सापडली. भगवान राम ही पौराणिक, काल्पनिक व्यक्तिरेखा आहे आणि ती प्रामुख्याने उत्तरेकडील जनतेची देवता आहे, असा अप्रचार द्रमुक नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्याच द्रमुक नेते करुणानिधी यांच्या गावात रामाची मूर्ती सापडली. प्रभू रामचंद्र उत्तरेकडील जनतेचे दैवत आहेत, असा प्रचार करणार्‍यांना या घटनेने परस्पर सणसणीत उत्तर मिळाले आहे. रामायण, महाभारत हे ग्रंथ काल्पनिक असल्याचे द्राविडी चळवळीतील नेत्यांचे म्हणणे होते आणि आहे. त्यातूनच हे नेते अत्यंत अर्वाच्य भाषेत हिंदू देवदेवतांची अवहेलना करीत असतात. प्रभू रामाप्रमाणे गणेश, शिव, मुरुगन हे देवदेखील उत्तर भारतातील आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रभू रामचंद्र आणि अन्य देवदेवता यांच्यावर टीका करणार्‍या नेत्यांचे एकेकाळी जे मार्गदर्शक होते त्या करुणानिधी यांच्या गावीच रामाची मूर्ती सापडावी. मुख्यमंत्री स्टॅलिन प्रभू रामचंद्र संपूर्ण भारतात असल्याची आत्ता तरी खात्री पटली का?

‘सेवा भारती’वर आक्षेपार्ह आरोप केल्याबद्दल एक कोटीचा दंड!
 
सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असलेल्या ‘सेवा भारती’ या प्रसिद्ध संघटनेवर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आक्षेपार्ह आरोप केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने करुप्पार कुटाम चॅनलला एक कोटी रुपये दंड ठोठविला आहे. कोठडीत झालेल्या मृत्यूबद्दल सदर युट्यूबने ‘सेवा भारती’चा त्या घटनेशी संबंध जोडला होता. त्याबद्दल ‘सेवा भारती’ने अब्रुनुकसानीचा दावा केला होता. सदर वृत्त प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात यावी आणि त्या युट्यूब चॅनलला एक कोटी रुपये दंड करावा, अशी विनंती न्यायालयास करण्यात आली होती. २०२० मध्ये हा खटला दाखल करण्यात आला होता. ‘सेवा भारती’विरूद्ध जे आरोप करण्यात आले होते, त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे आढळले. त्यामुळे न्यायालयाने एक कोटींचा दंड करुप्पार कुटामला ठोठविला.


 
दत्ता पंचवाघ
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.