साहित्यातील पर्यटन ‘वाटा’

    01-Mar-2024   
Total Views | 60
 travelogue

प्रवास मनुष्याला समृद्ध बनवतो. या प्रवासाची वर्णनेही अगदी अनादिकालापासून मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. आपला प्रांत सोडून जाऊ न शकणार्‍यांना ही प्रवासवर्णने दृष्टी देतात. परंतु, अजूनही हा साहित्यप्रकार मुख्य प्रवाहात म्हणावा तेवढा रुळलेला दिसत नाही. नुकताच ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न झाला. तेव्हा, प्रवासाचे आणि साहित्याचे नेमके नाते काय, हे उलगडून सांगणार्‍या पर्यटनाशी संबंधित काही लेखकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया...
 
...आणि मला कळलं, मी लिहू शकते!

माझे पती परदेशात राहणारे. पण, फिरणं तसंही नव्हतंच. अशातच दूरची एक नोकरी चालून आली आणि स्वीकारली. माझी माणसं सोबतीला नाहीत, या एकटेपणातून पत्र लिहू लागले होते. शाळेतल्या शिक्षकांसोबत, पदयात्रेसोबत फिरून थोडं थोडं जाणून घेतलं. रोजच्याच गल्ल्या आता ओळखीच्या वाटू लागल्या. अचानक माझा पत्रव्यवहार बंद झाला तशी घरून विचारणा झाली. अरेच्चा! सामूहिक वाचन होत होतं तर! लोकांना आवडत होतं. अधेमध्ये दिवाळी अंकात काहीबाही लिहीलं होतं, भाषेची सवय होतीच. अशातच माझा एक इंग्लिश मित्र म्हणाला, त्याच्या अनुभवांचा मराठीत अनुवाद कर आणि मी लिहू लागले. सहज हात चालू लागले आणि माझा सूर मला गवसला. पुढे काही-काही घडत होतं, माझ्या अवतीभवती. माझी जिज्ञासू वृत्ती, शांत बसू देईना. लिहायला हवंच, असं जाणवू लागलं आतून आणि मी ढकलले गेले. एकदा असं बाड घेऊन संपादकांकडे गेले. त्यांनी दोन महिन्यांनी बोलावले. त्यात खूप काही होतं. परंतु, लेखन संस्कार व्हायचे बाकी होते. फार मेहनतीने ते घडवून घेतले आणि माझ्यातल्या उपजत प्रतिभेला, जिज्ञासू वृत्तीला त्या भाषिक कौशल्यांची जोड मिळाली आणि मला कळलं मी लिहू शकते!

- डॉ. मीना प्रभू, सुप्रसिद्ध लेखिका आणि प्रवासवर्णनकार

प्रवासवर्णनालाही हवा अभिजात साहित्याचा दर्जा

पर्यटन आणि निर्मिती किंवा कला क्षेत्र याचा फार दृढ संबंध. आपल्या रोजच्या जीवनात व्यवहारात, व्यवसायात अनेक तर्‍हेने पर्यटन आपणास मदतीला येते. आज काही आघाडीचे फॅशन डिझायनर त्यांच्या आवडत्या शहरात नेहमी भेट देत असतात. बनारसमधील घाट, तेथील मंदिरे, बनारसी पान मिठाईची-खाण्याची दुकाने अशी कुठलीही गोष्ट एखादी नवीन प्रेरणा देण्यास पुरेशी असते. असं म्हणतात की, भरपूर प्रवास केलेली आणि वाचन केलेली माणसे सहज कळून येतात. पर्यटनाने उपजत शहाणपण वाढीस लागते. एखादा नेहमीच प्रवास करणारा माणूस हा जास्त परिस्थितीशी जुळवून घेणारा दिसतो. काश्मिरात पानगळीनंतर पूर्ण परिसर जेव्हा बर्फाच्छादित होताना सृजन मनास माहीत असते की, ‘बहारे फिर नजर आऍंगी...’ बदलणारे ऋतू नित्य प्रवास करणार्‍यास आव्हाने पेलण्याची असामान्य वृत्ती देते. सृजनाच्या या सोहळ्यांना वाचकांपर्यंत नेणार्‍या लेखकांना अजूनही आपण ‘साहित्यिक’ म्हणून मान्यता द्यायला कचरतो. त्यांच्याकडे थोड्याशा दुजाभावाने पाहतो. अजूनही प्रवासवर्णन हा प्रकार अभिजात साहित्याचा भाग मानला जात नाही. त्याला साहित्याचा दर्जा आपण द्यायला हवा!

- डॉ. सोनाली चितळे, पर्यटन शिक्षिका, गरवारे इन्स्टिट्यूट, मुंबई विद्यापीठ

प्रवास जागरूक असेल, तर लेखन वाचनीय...
 
सध्या भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पर्यटन क्षेत्रात सुमारे २० टक्के वाढ झाल्याचे दिसते. परंतु, त्याचे रूपांतर म्हणावे तेवढे साहित्यात प्रतिबिंबित होत नाही, हे खरे. मी स्वतः इजिप्त, इस्रायल, ग्रीस इत्यादी देशांना भेटी दिल्या आहेत. कैरोपासून इस्रायलपर्यंत रस्तामार्गे चार वेळा गेलेलो आहे. हा थोडा भीतीदायक रस्ता सोडून दिल्यास वर उल्लेख केलेल्या देशांमध्येसुद्धा पाहण्यासारखी ठिकाणे भरपूर आहेत आणि ती रूढ पर्यटनस्थळांपेक्षा वेगळी आहेत. परंतु, असा वेगळा अनुभव घेण्यास भारतीय पर्यटक सहसा तयार नसतात. भारतीय पर्यटक बर्‍याचदा वरवरचे वर्णन लिहितात. आपण एखादी वास्तू पाहिली की, त्याविषयी अधिक जाणून घेण्याची तसदीही घेत नाही. एवढी अप्रतिम कलाकृती निर्माण करणार्‍या कलाकारांची प्रेरणा काय असेल? असा विचारच पर्यटक करत नाहीत. आता अशा पर्यटकांनी कितीही प्रवासवर्णने लिहिली तरी त्यात सखोलता आणि अभिजातता कशी येईल? म्हणून प्रवास जागरूक असावेत, असे वाटते. म्हणजे वाचनीय होतील आणि अभिजातसुद्धा!

- उमाकांत तासगांवकर, पर्यटन व्यावसायिक व सल्लागार

...आणि मी पहिला लेख लिहिला!

भटकंतीची तशी मला लहानपणापासूनच आवड. पुरातन वास्तूंविषयीच्या माझ्या आवडीमुळे दक्षिण भारतातील बरीच मंदिरे फिरलो. याच आवडीतून कंबोडियाला गेलो. माझ्याइतकी मंदिरे जगात क्वचितच एखादा नास्तिक फिरला असेल. ५० ० एकराचे आवार असलेल्या ‘अंग्कोर वाट’ मंदिरात असलेल्या हजारो परदेशी प्रवाशांमध्ये त्या दिवशी तिथला मी एकटाच भारतीय होतो. खिन्नता आली. भारतीयांना या अद्भुत आणि अफाट मंदिराविषयी सांगायला हवे, असे वाटून गेले आणि ‘अंग्कोर वाट’च्या पायर्‍यांवर बसून मी माझा पहिला लेख लिहिला. वाचक होतो, लेखक बनलो. लिखाण फक्त मंदिरावर न थांबता, महिनाभराच्या एकांड्या मुशाफिरीवर लिहितच गेलो. लोकांना आवडत गेले आणि ‘कंबोडायण’ साकारले. पुढे इंडोनेशियाला गेलो, तेव्हा ‘कंबोडायण’च्या यशामुळे वाचक इंडोनेशियावरील पुस्तकाची अपेक्षा ठेवू लागले. इंडोनेशियामुळे आपण लेखक आहोत, असे वाटू लागले. इजिप्तहून आल्यावर ‘इजिप्सी’ लिहिले. लिहिण्यासारखे बरेच अनुभवले होते, ते मनाला वाटेल तसे टंकित करीत गेलो. थांबल्यावर जाणवले की, मराठीतील एकाच देशावरचे सर्वांत मोठे प्रवासवर्णन आपल्याकडून साकारले आहे. एका नास्तिकावर देवाने एवढी कृपा करणे योग्य नाही.

 
- रवी वाळेकर, प्रवासवर्णनकार आणि सोलो ट्रॅव्हलर



 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121