मराठीत पुन्हा ऐतिहासिक चित्रपटांची लाट!

Total Views |
Marathi Historical Movies
यंदाचे वर्ष हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास असणार आहे. कारण, विविध विषय आणि आशयांवर आधारित कलाकृती मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागील काही काळात मराठी चित्रपटांतून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. आता शिवरायांच्या सोबतीने त्यांच्या धाडसी मावळ्यांचे, सेनानींचे असेच आणखीन काही ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याविषयी...
 
 
‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’या ऐतिहासिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांनी लिहिले आहेत. राहुल जनार्दन जाधव यांनी दिग्दर्शन आणि अक्षय बर्दापुरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या वीरांगना म्हणजे ‘महाराणी छत्रपती ताराराणी.’ मुघलांना सळो की पळो करून सोडणार्‍या ताराराणी महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणार्‍या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यापाठोपाठ कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा ’मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटातून शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
स्वराज्य कनिका जिजाऊ

 
राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्मलेले नररत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनीती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण शिवरायांमध्ये होते. ‘शिवबा ते शिवराय’ घडवताना माता जिजाऊंनी अनेक वादळं पेलली. पण, या वादळांत त्यांच्यातील स्वराज्याची तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खर्‍या उतरून जिजाऊंनी स्त्रीशक्ती व मातृशक्तीचे चिरंतन उदाहरण दिले. जगाला दिशा देणार्‍या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ’स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा ऐतिहासिक चित्रपट येणार आहे. यात पटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे. सहा ‘फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स’ निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.
 
‘वेडात मराठे वीर दौडले सात’

 
महेश मांजरेकर दिग्दर्शित ’वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक पटात दि. २४ फेब्रुवारी, १६७४ साली प्रतापराव गुजरांसह सात वीर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचा इतिहास दाखवला जाणार आहे. हा बहुभाषिक ऐतिहासिकपट असून यात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दीपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
 
राजा शिवाजी
 
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक कथेमध्ये बलाढ्य शक्तींविरूद्ध बंड करत स्वराज्य स्थापन करणारा असा असाधारण वीर योद्धा ते ‘राजा शिवाजी‘ यांचा अचंबित करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर जीवंत होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत रितेश अभिनयदेखील करताना दिसणार आहे.
 
कर्तव्यपूर्ण राजकारणी जिजाऊ दिसणार


जिजाऊंची भूमिका साकारत असल्यामुळे मोठी जबाबदारी आहे. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वांत मोठं नाव ज्या जिजाऊंचं आहे, त्यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं हे माझं भाग्यच! जिजाऊंबद्दल माहिती घेण्यासाठी फार संशोधन करावे लागले. त्यांच्यावर ज्या इतिहासकारांनी लिखाण केले आहे, त्यातून त्यांच्यातील गुण, स्वभाव धर्म आणि बराच अभ्यास करून आम्ही सादर केले. आजवर अनेक ऐतिहासिकपटांमधून जिजाऊ कर्तव्यपूर्ण राजकारणी कशा होत्या, हे दाखवले आहेच; पण त्या एक व्यक्ती म्हणून कशा होत्या हेदेखील यातून दिसणार आहे.
 
- तेजस्विनी पंडित, अभिनेत्री

ऐतिहासिक पटांच्या यादीत हा चित्रपट इतिहास रचेल

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील शौर्यवान महाराजांनंतर ज्यांनी स्वराज्य सांभाळलं, त्या मोगलमर्दिनी ताराराणी यांच्यावर ऐतिहासिक पट तयार करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच आहे. संशोधन करून, ४० दिवस चित्रीकरण करून आम्ही या ऐतिहासिक पटात ८० टक्के व्हिएफएक्सचा वापर केला आहे. त्यामुळे नक्कीच ऐतिहासिक पटांच्या यादीत हा चित्रपट एक नवा इतिहास रचेल, अशी आम्हाला खात्री आहे.
 
- अक्षय बर्दापुरकर, निर्माते
 
या ऐतिहासिक पटाच्या निमित्ताने मी खरा मावळा झालो...

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, यावेळी त्यांच्यासोबत जे मावळे होते, त्यांचीही जीवनगाथा रुपेरी पडद्यावर आली पाहिजे, हा अट्टहास ’वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा होता. मुळात अभिनयाची संधी मला मिळत असताना शिवरायांच्या मावळ्याची भूमिका साकारण्यास मला मिळाली, हे अहोभाग्य आहे. त्यामुळे ’वेडात मराठे वीर दौडले सात’च्या निमित्ताने मी खर्‍या अर्थाने मावळा झालो होतो आणि शिवबांच्या स्वाधीन स्वत:ला मी केले होते.

 
- उत्कर्ष शिंदे, अभिनेता


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.